तरुण भारत

खरेदी की आरोग्य? निर्णय तुमचा…

प्रतिनिधी/ बेळगाव

तीन दिवसांचा कडक लॉकडाऊन व चार दिवस सकाळी प्रचंड गर्दी यामुळे कोरोना नियंत्रणात येण्याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. शुक्रवारपासून लॉकडाऊन लागू झाला खरा. परंतु सोमवार उजाडताच पहाटेपासूनच शहरात सर्वत्र लोकांची खरेदी आणि अनेक कारणांसाठी होणारी गर्दी ही लॉकडाऊनच्या नियमांना पोषक ठरणार नाही.

Advertisements

हिरवागार ताजा भाजीपाला हे बेळगावचे वैशिष्टय़ आहे. येथील ताज्या आणि चवदार भाज्यांचा लौकिक गोवा आणि महाराष्ट्रातही पोहोचला आहे. परंतु अलीकडच्या काही दिवसात प्रामुख्याने कोरोनाच्या काळात शहरात भाजी विक्रेत्यांच्या संख्येत अगणित वाढ झाली आहे, तितकीच खरेदीदारातही वाढ झाली आहे. यंदा दुसऱया लाटेमध्ये कोरोनाने गंभीर परिस्थिती निर्माण केली आहे. ती लक्षात घेता एकदाच जाऊन आठवडय़ाची भाजी घेऊन येणे किंवा अन्य पर्याय तयार ठेवणे हे सहज शक्य आहे. पण प्रत्येक कडक लॉकडाऊननंतर बाजारपेठेत आश्चर्य वाटण्याजोगी गर्दी होत आहे. ही गर्दी डॉक्टर, पोलीस आणि आरोग्यतज्ञ यांच्या मते चिंता निर्माण करणारी आहे.

कडक लॉकडाऊन आणि त्यानंतर होणारी कमालीची गर्दी यामुळे लॉकडाऊनच्या मूळ हेतूलाच बगल दिली जात आहे. औषधे आणि दूध या व्यतिरिक्त सर्व तऱहेची खरेदी जोपर्यंत पूर्णतः बंद राहणार नाही तोपर्यंत लॉकडाऊनला अर्थ राहणार नाही आणि कोरोनासुद्धा नियंत्रणात येणार नाही. दुसरे म्हणजे शहरातील काही उपनगरांमध्ये पूर्णतः जवळजवळ सर्व व्यवहार सुरू आहेत. या भागात मुलांचे बाहेर येऊन क्रिकेट खेळणे व अन्य खेळ खेळणे सुरू आहे. तिसरी लाटही मुलांच्या दृष्टीने चिंता निर्माण करणारी ठरू शकते, हे तज्ञांनी आणि डॉक्टरांनी वारंवार स्पष्ट केले आहे. मुले कंटाळली आहेत. शाळा नाही, मित्र-मैत्रिणी नाहीत, त्यामुळे त्यांचा मोबाईल वापर वाढला आहे हे वास्तव आहे. परंतु सध्य परिस्थितीत त्यांना यापासून दूर करणेही कठीण आहे. मात्र, त्यांचे सामाजिक अंतर व फेसमास्कच्या नियमांचे पालन न करता खेळण्याचे वाढलेले प्रमाण कदाचित धोकादायक ठरू शकते.

सामाजिक अंतर न पाळल्यास कोरोनाचा धोका

लॉकडाऊनमुळे आर्थिक घडी बसविण्याचे संकट सर्वांसमोरच आहे. भाजी विक्रेत्यांची भाजी वाया जाता कामा नये हे तर महत्त्वाचे. परंतु भाजी विक्री करताना कोणतेही सामाजिक अंतर त्यांच्याकडून राखले जात नाही, ही खरी समस्या आहे. सामाजिक अंतर न पाळल्याने कोरोनाचा धोका वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. भाजी विक्री जरूर व्हायला हवी, परंतु ती कोविड-19 च्या नियमांचे पालन करूनच होणे आवश्यक आहे. अन्यथा, सकाळी 6 ते 10 या वेळेत होणारी गर्दी जोपर्यंत नियंत्रणात येऊ शकत नाही तोपर्यंत बेळगावचा पॉझिटिव्हिटी रेट कमी होऊ शकणार नाही.

प्रशासनाने वॉर्डवार भाजी विक्री अथवा हातगाडीवरून ती वॉर्डांत पोहोचविणे यासारख्या काही उपाययोजना अंमलात आणण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे. होपकॉम्सतर्फे सध्या तसा उपक्रम सुरू आहे. मुख्य म्हणजे जितकी गर्दी करू तितका लॉकडाऊनचा कालावधी वाढत राहणार आहे. त्यामुळे कडकडीत लॉकडाऊन मान्य करून किमान एक आठवडा जर सर्वांनीच संयम बाळगला तर पुन्हा लॉकडाऊन करण्याची वेळ आपण टाळू शकतो. विकेंड लॉकडाऊन संपल्या संपल्या सोमवारी पुन्हा बाजारपेठेत दाखल होणाऱया प्रत्येकाने याचा विचार करणे आवश्यक आहे. 

Related Stories

बेळगावसह पाच जिल्हय़ांत आजपासून लसीची ‘ड्राय रन’

Patil_p

जिल्हय़ात मंगळवारी 44 नवे रुग्ण

Amit Kulkarni

मंगळवारी शहराच्या उत्तर भागात वीजपुरवठा खंडीत

Patil_p

अयोध्यानगर येथे कचराकुंडी नसल्याने परिसर अस्वच्छ

Amit Kulkarni

शिवप्रतिष्ठानच्या मदत केंद्राला भरभरून प्रतिसाद

Amit Kulkarni

अवैध बिपीएल कार्डे तातडीने रद्द करा

Rohan_P
error: Content is protected !!