तरुण भारत

कोव्हॅक्सिनची चौथ्या टप्प्यातील चाचणी लवकरच

विवादामुळे घेतला निर्णय, खरा प्रभाव तपासणार 

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

Advertisements

भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन या स्वदेशी लसीचे चौथ्या टप्प्यातील परीक्षण लवकरच केले जाणार आहे. संस्थेने तशी घोषणा बुधवारी केली. दुसरी भारत उत्पादीत लस कोव्हिशिल्डच्या तुलनेत ही लस कमी प्रभावी आहे, असा निष्कर्ष काही डॉक्टरांनी काढला होता. या पार्श्वभूमीवर हे परीक्षण होणार आहे.

चौथ्या टप्प्यातील हे परीक्षण ‘रियल वर्ल्ड इफेक्टिव्हनेस’ या पद्धतीचे होईल. याचा अर्थ असा की, ज्या लोकांनी ही लस घेतली आहे, त्यांच्यावर या लसीचा नेमका परिणाम कसा झाला आहे, त्यांच्या शरिरात प्रतिजैविके (अँटीबॉडीज) किती प्रमाणात निर्माण झाली आहेत, तसेच हे प्रमाण इतर उपलब्ध लसींच्या तुलनेत कमी आहे का, यासंबंधात हे परीक्षण होणार आहे.

निष्कर्ष पूर्वग्रहदूषित

नुकताच तज्ञांनी केलेल्या अभ्यासाचा एक अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यात, कोव्हॅक्सिन ही लस कोव्हिशिल्डपेक्षा कमी प्रभावी असल्याचे सांगण्यात आले आहे. कोव्हिशिल्डमुळे अधिक प्रमाणात प्रतिजैविके तयार होतात. तर कोव्हॅक्सिनची क्षमता त्यापेक्षा कमी आहे. मात्र दोन्ही लसी कोरोनावर परिणामकारक आहेत, असा निष्कर्ष या अहवालात काढण्यात आला होता. भारत बायोटेकने हा निष्कर्ष नाकारला असून तो हेतूपुरस्सर आणि पूर्वग्रहदूषित असल्याचे म्हटले होते.

दोन्ही लसींचा हा तुलनात्मक अभ्यास संख्यात्मक पद्धतीचा नाही. तसेच तो शास्त्रीय पद्धतीने करण्यात आलेला नाही. लस कोणतीही असली तरी प्रत्येक व्यक्तीमध्ये प्रतिजैविके तयार होण्याचे प्रमाण कमी जास्त असू शकते. त्यामुळे केवळ काही जणांची चाचणी करून आधीच ठरवून ठेवलेले उत्तर काढणे योग्य नव्हे, असे भारत बायोटेकने हा अहवाल प्रसिद्ध झाल्यावर प्रतिपादन केले होते.

खरा प्रभाव तपासणार

चौथ्या टप्प्यातील परीक्षण हे प्रभावाचे परीक्षण असेल व ते व्यापक प्रमाणात करण्यात येईल. हे परीक्षण पूर्णपणे शास्त्रीय पद्धतीने आणि आंतरराष्ट्रीय मापदंडांनुसार करण्यात येईल. आतापर्यंत कोटय़वधी लोकांनी कोव्हॅक्सिन घेतलेली आहे. तथापि, किरकोळ तक्रारी वगळता (ज्या कोणत्याही लसीच्या संदर्भात उद्भवतात) कोणतीही गंभीर तक्रार आलेली नाही. प्रतिजैविके कमी प्रमाणात निर्माण होत असती तर आतापर्यंत तक्रारी आल्या असत्या, असे भारत बायोटेकने स्पष्ट केले आहे. चौथ्या टप्प्यातील परीक्षणानंतर खरी परिस्थिती लोकांच्या समोर येईल आणि शंका दूर होतील अशा विश्वास कंपनीने व्यक्त केला आहे.

Related Stories

कोरोना पसरवल्याच्या संशयातून तबलिगीला जमावाची मारहाण, उपचारादरम्यान मृत्यू

prashant_c

राजस्थानमध्ये 740 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

pradnya p

हजारो वर्षांपासून भारत-श्रीलंकेचे संबंध

Patil_p

दिल्लीत 29 टक्के लोकांमध्ये प्रतिजैविकं

Patil_p

व्हीआयटी देशातील सर्वोत्कृष्ट 12 इन्स्टिटय़ूटमध्ये समाविष्ट

Patil_p

मराठा आरक्षण सुनावणी लांबणीवर

Patil_p
error: Content is protected !!