तरुण भारत

क्रेसिकोव्हा, साकेरी यांची उपांत्य फेरीत धडक

सित्सिपस, व्हेरेव्हही शेवटच्या चारमध्ये, गॉफ, स्वायटेक, मेदवेदेव्ह यांचे आव्हान समाप्त

वृत्तसंस्था/ पॅरिस

Advertisements

ग्रीसचा स्टेफानोस सित्सिपस, जर्मनीचा अलेक्झांडर व्हेरेव्ह, झेकची बार्बरा क्रेसिकोव्हा यांनी प्रेंच ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत एकेरीची उपांत्य फेरी गाठली तर रशियाचा डॅनील मेदवेदेव्ह, अलेजांड्रो डेव्हिडोविच फोकिना आणि महिलांमध्ये अमेरिकेची युवा खेळाडू कोको गॉफ व विद्यमान चॅम्पियन पोलंडच्या इगा स्वायटेकचे आव्हान संपुष्टात आले.

पाचवे मानांकन मिळालेला 22 वर्षीय सित्सिपस व सहावे मानांकन मिळालेला 24 वर्षीय व्हेरेव्ह यांच्याकडे भविष्यातील खेळाडू म्हणून पाहिले जाते. सित्सिपसने द्वितीय मानांकित मेदवेदेव्हवर 6-3, 7-6 (7-3), 7-5 असा विजय मिळविला. प्रकाशझोतातील लढत असल्याने हा सामना नाईट कर्फ्यूमुळे प्रेक्षकांशिवाय खेळविण्यात आला. व्हेरेव्हने फोकिनाचा 6-4, 6-1, 6-1 असा सहज फडशा पाडत शेवटच्या चारमध्ये स्थान मिळविले. सित्सिपस व व्हेरेव्ह यांच्यातच उपांत्य लढत होणार आहे. सित्सिपसची ही ग्रँडस्लॅमची उपांत्य फेरी गाठण्याची सलग तिसरी व एकूण चौथी वेळ आहे तर व्हेरेव्हची ग्रँडस्लॅममधील उपांत्य फेरी गाठण्याची तिसरी व येथील पहिलीच वेळ आहे. या स्पर्धेत उपांत्य फेरी गाठणारा तो जर्मनीचा दुसरा खेळाडू आहे. याआधी 1996 मध्ये मायकेल स्टिचने असा पराक्रम केला होता.

या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दोन सर्वात तरुण टेनिसपटू खेळण्याची ही 2008 नंतरची पहिलीच वेळ आहे. त्यावर्षी नदाल व जोकोविच यांनी असा बहुमान मिळविला होता. सित्सिपस व व्हेरेव्ह दोघांनी एटीपी फायनल्स स्पर्धा एकेकदा जिंकली असून चारपैकी एक ग्रँडस्लॅम तरी जिंकण्याचा या दोघांचा इरादा आहे. ‘ग्रँडस्लॅम जिंकणे हेच तर प्रत्येक टेनिसपटूचे मुख्य ध्येय असते. गेली काही वर्षे मी स्वतःवर फारच दडपण आणत होतो. मेदवेदेव्ह व सित्सिपसच्या आगमनाआधी माझ्याकडे भविष्यातील स्टार खेळाडू म्हणून पाहिले जात होते. पण मी स्वतःवर अपेक्षांचा खूप दबाव आणला. माझ्यात अजिबात संयम नव्हता. पण आता हळूहळू परिस्थिती कशी हाताळायची याची जाण येऊ लागली आहे,’ असे झ्वेरेव्ह म्हणाला.

सित्सिपसने मेदवेदेव्हविरुद्ध पहिला सेट सहज घेतल्यानंतर दुसऱया सेटमध्ये मेदवेदेव्हला सूर सापडला आणि त्याच्याकडून कडवा प्रतिकार झाल्याने हा सेट टायब्रेकरपर्यंत लांबला. मात्र सित्सिपसने टायब्रेकरमध्ये बाजी मारली आणि तिसऱया सेटमध्येही 7-5 असा विजय मिळवित सामना संपविला.

क्रेसिकोव्हाची आगेकूच

झेक प्रजासत्ताकच्या बिगरमानांकित बार्बरा क्रेसिकोव्हाने या स्पर्धेची पहिल्यांदाच उपांत्य फेरी गाठली आहे. ग्रँडस्लॅममधील पाचव्या प्रयत्नांत तिला हे यश मिळविता आले. तिने अमेरिकेच्या 17 वर्षीय कोको गॉफचा 7-6 (8-6), 6-3 असा पराभव केला. जागतिक क्रमवारीत 33 व्या स्थानावर असणाऱया क्रेसिकोव्हाने संथ सुरुवातीतून सावरल्यानंतर पाच सेट पॉईंट्स वाचविले आणि समतोल न राखण्याच्या गॉफच्या त्रुटीचा लाभ घेत सेट व नंतर सामना जिंकून शेवटच्या चारमध्ये आगेकूच केली. मारिया साकेरीशी तिची उपांत्य लढत होईल. क्रेसिकोव्हा दुहेरी मुकुट साधण्याच्या मार्गावर असून तिने महिला दुहेरीत कॅटरिना सिनियाकोव्हासमवेत उपांत्य फेरी गाठली आहे.

25 व्या मानांकित गॉफची ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत खेळण्याची ही पहिलीच वेळ होती. मात्र दबावाखाली ती हळूहळू कोसळत गेली. तिच्याकडून 41 अनियंत्रित चुका झाल्या आणि सातवेळा डबल फॉल्ट केले. क्रेसिकोव्हाने या स्पर्धेचे जेतेपद मिळवल्यास 1981 नंतर असे यश मिळविणारी ती झेक प्रजासत्ताकची पहिली खेळाडू होईल. 81 मध्ये हॅना मंडलिकोव्हाने ही स्पर्धा जिंकली होती. येथील सामन्यावेळी 5000 प्रेक्षकांना प्रवेश देण्यात आला होता. आणि त्यांनी चीअरअप केल्याने क्रेसिकोव्हाही खुश झाली होती. नंतर त्याबद्दल तिने त्यांचे आभारही मानले. या स्पर्धेत उपांत्य फेरीपर्यंत मजल मारू शकेन, असे स्वप्नातही वाटले नव्हते. पहिल्या सेटमध्ये पिछाडीवर पडल्यानंतर प्रत्येक फटका मारताना टेनिसचा आनंद लुटायचा, हे धोरण ठेवले आणि त्याला यशही मिळाले, असे ती म्हणाली.

विद्यमान चॅम्पियन स्वायटेकला धक्का

अन्य एका उपांत्यपूर्व सामन्यात 17 व्या मानांकित मारिया साकेरीने विद्यमान विजेती व आठव्या मानांकित पोलंडच्या स्वायटेकला 6-4, 6-4 असा पराभवाचा धक्का देत या स्पर्धेची पहिल्यांदाच उपांत्य फेरी गाठली. क्रेसिकोव्हाशी तिची उपांत्य लढत होईल. या सामन्याआधी स्वायटेकने रोलाँ गॅरोवर सलग 22 सेट्स जिंकले होते. साकेरीने तिच्या या घोडदौडीला ब्रेक लावला. 

Related Stories

भारताचे सहा कनिष्ठ बॅडमिंटनपटू टॉप टेनमध्ये

Patil_p

भारतीय पुरूष हॉकी संघ युरोपच्या दौऱयावर अपराजित

Patil_p

पंतप्रधान मोदींच्या भारतीय संघाला शुभेच्छा

tarunbharat

आयपीएलसाठी पर्यायांचा शोध

Patil_p

सचिन, लाराने लुटला गोल्फचा आस्वाद

Patil_p

2008 युवा विश्वचषकात विल्यम्सन लक्षवेधी

Patil_p
error: Content is protected !!