तरुण भारत

पर्यावरण संरक्षणात स्त्रिया

आपणासमोर उभ्या असलेल्या प्रतिकुलतेला सामोरे जात पर्यावरण संरक्षण आणि संवर्धन क्षेत्रात महिलांनी भरीव योगदान दिलेले अहे. ‘जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगाते उद्धारी’ असे जे म्हटले जाते ते खरे असून एक गृहिणी, माता, भगिनी, सखी अशा विविध रूपात वावरणारी स्त्री पर्यावरण क्षेत्रातही अग्रेसर ठरलेली आहे. राजस्थानात वैष्णाई समाजातल्या पुरुषांच्या बरोबरीने तिथल्या स्त्रियांनीही खेजडी या पवित्र वृक्षांच्या संरक्षणासाठी आहुती दिलेली आहे. उत्तराखंडातल्या चमोलीत रेनी या गावातल्या गौरादेवीने ‘चिपको’ आंदोलनात 1974 च्या सुमारास महिला मंगल दलाचे नेतृत्व करून जंगलतोडीला रोखले. रिया राना या स्त्रीनेसुद्धा पर्यावरण संरक्षणासाठी लढय़ात आपले योगदान दिलेले आहे.

उत्तराखंडातल्या डेहराडूनात वावरणाऱया वंदना शिवा यांनी समाजात जैविक संपदा, नैसर्गिक साधनांचा योग्य रितीने वापर केला जावा आणि पारंपरिकरित्या कृषी व्यवसाय व्हावा आणि इथल्या पिकांच्या वाणांचे संवर्धन व्हावे यासाठी चळवळ उभारली. आपल्या पर्यावरणीय विचारधारेच्या समर्थनासाठी त्यांनी वीस पुस्तकांचीही निर्मिती केलेली आहे. भारताला जो जैवविविधतेचा समृद्ध वारसा लाभलेला आहे त्याचे रक्षण व्हावे म्हणून सातत्याने प्रयत्न आरंभलेले आहेत. त्यांच्या अभिनव अशा नवधान्य चळवळीमुळे पारंपरिक वाणाच्या संचायिका देशभरात सुरू झाल्या आणि त्यामुळे बहुराष्ट्रीय कंपन्यांचे षड्यंत्र उघडकीस येण्यास मदत झाली.

Advertisements

मेधा पाटकर यांनी ‘नर्मदा बचाव’ आंदोलनाद्वारे नर्मदेवरती उभ्या राहिलेल्या सरदार सरोवर प्रकल्पाच्या विरोधात बुलंदपणे आवाज उठवला. जंगलनिवासी जनजातींच्या हक्कांच्या आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी त्यांनी उभारलेला लोकलढा आजही चालू आहे. मेनका गांधी यांनी ‘पीपल फॉर ऍनिमल’ या संस्थेच्या माध्यमातून मूक प्राण्यांवर होणाऱया अन्याय, अत्याचाराला वेळोवेळी वाचा फोडलेली आहे. जनावरांविषयी समाजात आदरभाव निर्माण व्हावा म्हणून त्यांनी आपल्या वाणी आणि लेखणीद्वारे लोकजागृतीवर भर दिलेला आहे. तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या कारकिर्दीत आपल्या देशात वन्यजीवन संरक्षण कायदा 1972, पर्यावरण संरक्षण कायदा 1986 लागू करण्यात आले. व्याघ्र प्रकल्पामुळे नष्ट होणाऱया वाटेवरती असणाऱया पट्टेरी वाघांच्या संरक्षणाला प्राधान्य लाभले. विज्ञान आणि पर्यावरण केंद्राच्या प्रमुख या नात्याने वावरताना सुनीता नारायण यांनी पर्यावरण संरक्षणात विशेष योगदान दिलेले आहे. ‘डाऊन टू अर्थ’ या अंकाद्वारे त्यांनी देशभरातल्या पर्यावरणीय समस्यांना वाचा फोडण्याचे कार्य समर्थपणे चालविलेले आहे.

विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या साहाय्याने कृषीक्षेत्रात प्रगती करण्यासाठी रासायनिक खते, कीटकनाशके, जंतूनाशके आदी घटकांच्या वारेमाप वापरामुळे जो पर्यावरणाचा ऱहास सुरू झाला त्याचा ऊहापोह करण्यासाठी अमेरिकेतल्या राचेल कॅर्सन यांनी केलेल्या ‘सायलंट स्प्रिंग’ या पुस्तकाने समाजात पर्यावरणीय दृष्टिकोन विकसित होण्यासाठी क्रांतिकारी भूमिका बजावलेली आहे. आफ्रिकेतल्या केनियासारख्या राष्ट्रात जीवशास्त्राचे अध्ययन केलेल्या वंगारी माथाई यांनी 1977 पासून नियोजनबद्ध वृक्षारोपण आरंभून हरित पट्टय़ाचे संरक्षण करण्यासाठी यशस्वीरित्या मोहीम राबविली. त्यांच्या कार्यासाठी शांततेचे प्रतिष्ठित नोबेल प्राप्त करणाऱया त्या आफ्रिकेतल्या पहिल्या महिला ठरल्या होत्या. इंग्लंडच्या जेन गुडाल यांनी कुमार अवस्थेत टांझानियातल्या जंगलात असणाऱया चिंपांझीच्या सामाजिक आणि कौटुंबिक स्नेहबंधाचे 60 वर्षे संशोधन करून त्यांच्या संरक्षणासाठी मोहीम राबविली. आजही ‘रुटस् ऍण्ड शूटस्’ संस्थेमार्फत या क्षेत्रात त्या सक्रिय आहेत, ही प्रेरणादायी बाब आहे. डायना फोसी यांनी आफ्रिकेतल्या खंडात गोरीलाचा अस्तित्व आणि नैसर्गिक अधिवास सुरक्षित व्हावा यासाठी मोहीम आरंभली. जंगली श्वापदांची शिकार आणि जंगलतोडीच्या विरोधात लढताना त्यांची गूढरित्या हत्या करण्यात आली.

इसातूव सीशे यांनी गांबियामध्ये टाकाऊ वस्तूंचा वापर पुन्हा कसा होईल यासाठी राबविलेली चळवळ सफल केली. मारिना सिल्वा यांनी ब्राझीलमधील पर्जन्य जंगलांचे रक्षण व्हावे यासाठी 1980 पासून प्रतिकूल सामना करत चळवळ चालू ठेवली. मे बोइवे यांनी हवामान बदलाविषयी जागृती आरंभून कर्बवायूचे उत्सर्जन नियंत्रण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. सिल्विया इर्ले यांनी सागरी जीवांच्या संरक्षणासाठी झोकून देऊन कार्य केलेले आहे. जगभरात पर्यावरण जागृती आणि शिक्षणासाठी महिलांनी प्रेरणादायी झुंज दिलेली आहे. त्यातून महिलांचे सामर्थ्य लक्षात येते. आपल्या देशाच्या राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला त्याच्या परिसरातील पर्यावरण, वन्यजीव आणि परिसंस्था यांच्या रक्षणाला जबाबदार धरलेले असताना ज्या पद्धतीने पर्यावरणाचा ऱहास होत आहे, हे पाहिले तर आगामी काळात त्याच्या गंभीर दुष्परिणामांची शिकार होण्याची पाळी आमच्यावरती येणार आहे आणि यासाठी प्रत्येकाने पर्यावरण संरक्षण आणि संवर्धन हे आपले कर्तव्य मानले पाहिजे. जगभरात पुरुषांच्या बरोबरीने स्त्रियांनी पर्यावरणाच्या रक्षणाची जबाबदारी स्वीकारून त्यांच्या क्षेत्रात भरीव योगदान देण्याचे आव्हान अगदी लीलया पेलून दाखविलेले आहे. आज संपूर्ण जग कोविड-19 महामारीच्या संकट छायेत वावरत आहे. याला खरे कारण मानवी समाजाने वेळोवेळी निसर्गाला आव्हान देत प्रगतीचा वारू गतिमान ठेवताना पर्यावरणीय नियमांची पायमल्ली पदोपदी आरंभलेली आहे. आज आमच्या या अराजक आणि आततायी प्रवृत्तीवरती नियंत्रण घालून निसर्ग आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी स्त्रिया महत्त्वाची भूमिका बजावू शकतात, हे त्यांनी आपल्या निर्भीड आणि उत्तुंग कार्याने दाखवून दिलेले आहे. ‘गतिमान संतुलन’चे संपादक आणि पर्यावरणविषयक विपुल लेखन करणारे आणि शाश्वत विकासाचे सच्चे पुरस्कर्ते दिलीप कुलकर्णी यांनी पुणेसारख्या महानगरातले जीवन सोडून जेव्हा रत्नागिरी जिल्हय़ातल्या दापोली जवळच्या कुडावळेसारख्या एका ग्रामीण भागात पर्यावरण स्नेही जीवन जगण्याचे व्रत अंगिकारले तेव्हा त्यांना ध्येयपूर्तीसाठी सशक्त साथ लाभली ती त्यांच्या सुविद्य पत्नी पूर्णिमा कुलकर्णींची. त्यामुळेच सुखसोयींच्या अतिरेकाला त्यागून साधे, सुंदर जीवन जगणे आणि आपल्या मूलभूत गरजा निसर्ग स्नेही ठेवण्यात या दांपत्याला यश लाभलेले आहे. आज प्रत्येक स्त्रीने आपल्या पती, मुलगा, मुलगी, सखा, सखी यांना आपण स्वीकारलेल्या पर्यावरण स्नेही जीवनाचा भाग बनविण्याचा प्रयत्न केला तर आपल्या समाजात विलक्षण बदल घडणे शक्य आहे. स्त्री आपल्या धर्मसंस्कृतीने शक्तीरुपिणी दुर्गेच्या रूपात पाहिलेली आहे. हा बाणा इथल्या माताभगिनींना अंगी भिनविला तर केरकचरा, सांडपणी, मलमूत्र विसर्जन यांची विल्हेवाट व्यवस्थित लावून, परिसर स्वच्छ, सुंदर करून, जीवन निरोगी, सुदृढ करणे शक्य आहे. प्रत्येक स्त्रीने समोर असलेल्या समस्यांना भिडून त्यांचे निराकरण क्हावे, यासाठी प्रयत्न आरंभले तर शाश्वत विकासाची क्रांती दूर नसणार.

Related Stories

कोरोनासंदर्भात शिक्षण धोरण

Patil_p

जीवा संशयो वाऊगा तो त्यजावा…

Patil_p

कोरोनाविरुद्धची रणनीतीः प्रश्नचिन्हेच प्रश्नचिन्हे

Patil_p

धडा देणे आवश्यकच

Patil_p

अतिरिक्त भार नसलेला चाकोरीबद्ध!

Patil_p

देशहित धाब्यावर

Patil_p
error: Content is protected !!