तरुण भारत

मुख्यमंत्र्यांच्या खेळीने हायकमांडही गारद

पक्षाने सुचविले तर राजीनामा देऊ, असे सांगत पक्षालाच कोंडीत पकडण्याचा डाव येडियुराप्पा यांनी खेळला आहे. महाराष्ट्रातील सत्ता भाजपने गमावली आहे. आता कर्नाटकातही गमावू नका, असे अप्रत्यक्षपणे सुचविण्याचे काम येडियुराप्पा यांनी केले आहे.

कर्नाटकात कोरोना रुग्णसंख्या घटती आहे. गेल्या महिन्यात रोज 50 ते 55 हजार पॉझिटिव्ह रुग्ण आढळत होते. आता ही संख्या 9 ते 10 हजारांवर उतरली आहे. त्यामुळे अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली आहे. लॉकडाऊनमुळे ठप्प झालेला गावगाडा पुन्हा सुरू करावा लागणार आहे. लॉकडाऊनचा फटका गरीब, कष्टकरी, शेतकरी वर्गाबरोबरच साऱयांनाच बसला आहे. आर्थिक स्थिती पूर्वपदावर येण्यासाठी अवधी लागणार आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री येडियुराप्पा एकापाठोपाठ एक बैठका घेत आहेत. पुढच्या आठवडय़ात लॉकडाऊन उठविण्यात येणार असला तरी रुग्णसंख्या अधिक असलेल्या काही जिल्हय़ात लॉकडाऊन आणखी किमान एक आठवडा राहणार आहे. 1-2 दिवसात यासंबंधीचा निर्णय जाहीर होणार आहे.

Advertisements

ऐन कोरोना संकटात सत्ताधारी पक्षातील लाथाळय़ा चव्हाटय़ावर आल्या होत्या. अजूनही त्या थांबलेल्या नाहीत. नेतृत्वबदलासाठी एक गट प्रयत्नशील आहे तर येडियुराप्पा हेच आपले नेते आहेत, असे सांगत मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी एक मोठा गट उभा आहे. शिस्तीच्या पक्षातील नेत्यांचा कलगीतुरा काही थांबेना. या परिस्थितीला कंटाळून की काय मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी नवा डाव खेळला आहे. जोपर्यंत हायकमांडची आपल्यावर मर्जी आहे तोपर्यंतच आपण मुख्यमंत्रीपदावर राहणार आहे. नवी दिल्लीतील नेते ज्या दिवशी ठरवतील त्या दिवशी राजीनामा देण्याची आपली तयारी आहे, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी मौन सोडले आहे. त्यामुळे नेतृत्वबदलासाठी प्रयत्न करणाऱया असंतुष्टांबरोबरच भाजप हायकमांडही बुचकळय़ात पडले आहे. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यावर कोणती प्रतिक्रिया द्यायची, अशा भ्रमात आता खुद्द हायकमांडच अडकले आहे. काही आमदारांनी आमच्या समस्या मांडण्यासाठी संसदीय पक्ष बैठक बोलवा, अशी भूमिका घेतली आहे.

संसदीय पक्ष बैठकीत नेता ठरविला जातो, ही गोष्ट खरी असली तरी तो नेता कोण असावा याचा निर्णय शेवटी त्या त्या पक्षाचे हायकमांड घेत असते. भाजप असो किंवा काँग्रेस आजवर हीच प्रथा चालत आलेली आहे. ज्याच्या मागे आमदारांचे संख्याबळ आहे, त्याच नेत्याची निवड होईल, असे नाही. संख्याबळाबरोबरच हायकमांडची मर्जीही लागते. संसदीय पक्षाचा नेता कोण असणार, हे दिल्लीहून आलेला लिफाफा उघडल्यानंतरच कळत असते. दिल्लीश्वरांचा निरोप आल्यानंतर त्या नेत्याचा जयजयकार होतो.

सध्या कोरोना संकटाचा काळ आहे. रुग्णसंख्या कमी होत असली तरी संकट अद्याप टळलेले नाही. अशा परिस्थितीत भाजपमधील एक गट मुख्यमंत्री हटावसाठी सक्रिय आहे तर दुसऱया गटाने बंडखोरांवर कारवाई करण्यासाठी सहय़ांची मोहीम सुरू केली आहे. सत्ताधारी पक्षातील या घडामोडींचा आपल्याला फायदा होणार, या विचारात काँग्रेसचे नेते आहेत.

दक्षिण भारतात भाजपला सत्तास्थानी पोहोचविण्यासाठी येडियुराप्पा यांचे योगदान मोठे आहे. त्यांच्याशिवाय निवडणुका जिंकता येत नाहीत. त्यामुळे आणखी उर्वरित कार्यकाळापर्यंत तरी त्यांना कायम ठेवणे हायकमांडला क्रमप्राप्त वाटते. हा निर्णय पक्षाच्या हिताचा ठरणार आहे. भाजप हायकमांडलाही कर्नाटकात नेतृत्वबदल करायचाच आहे. येडियुराप्पा यांच्यानंतर पक्षाची धुरा कोण सांभाळणार हा प्रश्न असला तरी त्या त्यावेळी नवे नेतृत्व उभारी घेतेच. उतरत्या वयात अपमानास्पद वागणूक देऊन येडियुराप्पा यांना बाजूला काढले तर दक्षिणेत भाजपला मोठा धक्का बसणार आहे. म्हणून पुढच्या सार्वत्रिक निवडणुकांपर्यंत तरी त्यांना धक्का पोहोचवू नका, अशी बहुतेक आमदारांची मागणी आहे.

पक्षाने सुचविले तर राजीनामा देऊ, असे सांगत पक्षालाच कोंडीत पकडण्याचा डाव येडियुराप्पा यांनी खेळला आहे. महाराष्ट्रातील सत्ता भाजपने गमावली आहे. आता कर्नाटकातही गमावू नका, असे अप्रत्यक्षपणे सुचविण्याचे काम येडियुराप्पा यांनी केले आहे. सी. पी. योगेश्वर यांच्या नेतृत्वाखालील गट नेतृत्वबदलासाठी आग्रही आहे. गेल्या निवडणुकीत भाजपलाही पूर्ण बहुमत मिळाले नाही. निजद-काँग्रेसला खिंडार पाडून तेथील 17 आमदारांना आपल्या पक्षात घेऊन येडियुराप्पा यांनी सत्ता स्थापन केली आहे. यापूर्वी भाजपला रामराम ठोकून येडियुराप्पा यांनी स्वतंत्र पक्ष काढला होता. त्यावेळी भाजपला केवळ 40 जागांवर समाधान मानावे लागले. म्हणून पुन्हा येडियुराप्पा यांची घरवापसी झाली. त्याची जाणीव त्यांचे समर्थक करून देत आहेत.

येडियुराप्पा मुख्यमंत्री झाले, तेव्हापासूनच नेतृत्वबदलाची ओरड सुरू आहे. आपल्या पक्षांतर्गत विरोधकांबरोबरच हायकमांडला संदेश देण्यासाठीच येडियुराप्पा यांनी राजीनामा देण्याचा आव आणला आहे. त्यांचा सत्तेचा कार्यकाळ सुखात गेला नाही. महापूर, कोरोना परिस्थिती हाताळण्यातच त्यांचा कार्यकाळ खर्ची झाला. आता दुसरी लाट आटोक्मयात येते तोच पावसाळय़ाला सुरुवात होणार आहे. पुन्हा पूर परिस्थिती हाताळण्यासाठी सरकारला सज्ज रहावे लागणार आहे. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता भाजपला विरोधकांची गरज नाही, अशी स्थिती आहे. कारण पक्षातच विरोधी पक्ष निर्माण झाला आहे. ही परिस्थिती नाजूकपणे हाताळली नाही तर पक्षाच्या प्रति÷sला धक्का बसणार आहे. काँग्रेस याच परिस्थितीची वाट पहात आहे. ज्या ज्यावेळी सत्ताधारी पक्षातच त्यांच्या विरोधकांची संख्या वाढते त्या त्यावेळी विरोधी पक्षांचा फायदा होतो. याच परिस्थितीचा फायदा घेण्यासाठी सिद्धरामय्या आणि डी. के. शिवकुमार टपून बसले आहेत. भाजपसारख्या मोठय़ा पक्षाला इतर राज्यात केलेले राजकीय प्रयोग कर्नाटकाच्या राजकीय पटलावर करता येईना, अशी स्थिती आहे. कारण येथील राजकीय परिस्थिती वेगळीच आहे. व्यक्तीकेंद्रित राजकीय व्यवस्थेत नेतृत्वबदल करताना सावधपणे वाटचाल करावी लागणार आहे. 14 जून रोजी लॉकडाऊन संपणार आहे. लॉकडाऊननंतर या घडामोडी तीव्र होणार आहेत. आता जे काही करायचे आहे ते हायकमांडलाच करावे लागणार आहे.

Related Stories

महाशक्तीची कुजकी मनोवृत्ती

Patil_p

इस्लामपूरचे ‘सडक’ नाटक

Patil_p

…तोच खरा नवरात्रोत्सव ठरेल

Patil_p

वाढता छुपा धोका

Patil_p

साल 2021-22 – ऑनलाईन शिक्षणावरची भिस्त

Patil_p

उषेला गौरीचा आशीर्वाद

Patil_p
error: Content is protected !!