तरुण भारत

दुसऱया कसोटीत इंग्लंडची खराब सुरुवात

पहिल्या दिवशी चहापानाअखेर 4 बाद 152, रोरी बर्न्सचे नाबाद अर्धशतक, मॅट हेन्रीचे 2 बळी

वृत्तसंस्था /बर्मिंगहम

Advertisements

सलामीवीर रोरी बर्न्सच्या नाबाद अर्धशतकानंतरही यजमान इंग्लंडला न्यूझीलंडविरुद्ध येथील दुसऱया कसोटी सामन्यात 4 बाद 152 धावांवर समाधान मानावे लागले. गुरुवारी पहिल्या दिवसाच्या खेळात चहापानासाठी खेळ थांबवण्यात आला, त्यावेळी रोरी बर्न्स 176 चेंडूत 9 चौकारांसह 73 तर डॅन लॉरेन्स 11 धावांवर खेळत
होते.

यजमान संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर बर्न्स व डॉम सिबली यांनी 30 षटकात 72 धावांची सलामी दिली. घरच्या मैदानावर मागील 14 कसोटी सामन्यात पहिल्या डावात अर्धशतकी सलामी मिळण्याची इंग्लंडसाठी ही पहिली वेळ ठरली. यापूर्वी, 2018 मध्ये ऍलिस्टर कूक व केटॉन जेनिंग्ज यांनी भारताविरुद्ध अर्धशतकी सलामी दिली होती.

उपाहारासाठी खेळ थांबवला गेला, त्यावेळी इंग्लंडने बिनबाद 67 अशी आश्वासक सुरुवात केली होती. मात्र, त्यानंतर दुसऱया सत्रात इंग्लडला चक्क 4 गडी गमवावे लागले आणि त्यांची पाहता पाहता 4 बाद 152 अशी घसरगुंडी उडाली.

डॉम सिबलीला हेन्रीने यष्टीरक्षक ब्लंडेलकरवी झेलबाद करत इंग्लंडला पहिला धक्का दिला. सिबलीने येथे 84 चेंडूत 35 धावांचे योगदान दिले. त्याच्या खेळीत 5 चौकारांचा समावेश राहिला. वन डाऊन पोझिशनवरील झॅक क्राऊली (0) व अनुभवी कर्णधार जो रुट (4) यांचे स्वस्तात बाद होणे मात्र इंग्लंडला जोरदार धक्के देऊन गेले. वॅग्नरच्या इनस्विंगवर क्राऊलीचा अंदाज सपशेल चुकला आणि तिसऱया स्लिपमधील मिशेलने सोपा झेल टिपत त्याची खेळी संपुष्टात आणली.

जो रुट देखील मॅट हेन्रीच्या जाळय़ात अलगद अडकला. हेन्रीच्या अप्रतिम आऊटस्विंगवर रुटचा प्रंटफूटवर येत फटका खेळण्याचा प्रयत्न फसला आणि यष्टीरक्षक ब्लंडेलने झेल पूर्ण केला. फिरकीपटू एजाझ पटेलने ओलि पोपला देखील स्वस्तात तंबूचा रस्ता दाखवला. बॅकफूटवर जाऊन चेंडू कट करण्याच्या प्रयत्नात त्याने यष्टीमागे झेल दिला. न्यूझीलंडतर्फे हेन्रीने 13 षटकात 36 धावात 2 बळी असे पृथक्करण नोंदवले तर नील वॅग्नर व एजाझ पटेल यांनी प्रत्येकी 1 फलंदाज बाद केला.

संक्षिप्त धावफलक (चहापानाअखेर)

इंग्लंड पहिला डाव : 56 षटकात 4-152 (रोरी बर्न्स 176 चेंडूत 9 चौकारांसह खेळत आहे 73, सिबली 84 चेंडूत 5 चौकारांसह 35. मॅट हेन्री 2-36, लॉरेन्स खेळत आहे 11, नील वॅग्नर, एजाझ पटेल प्रत्येकी 1 बळी).

न्यूझीलंड संघात चक्क 6 बदल!

इंग्लंडविरुद्ध 2 सामन्यांच्या या मालिकेत न्यूझीलंडने येथील दुसऱया व शेवटच्या लढतीसाठी आपल्या संघात चक्क 6 बदल केले. भारताविरुद्ध कसोटी चॅम्पियनशिप फायनलच्या पार्श्वभूमीवर काही खेळाडूंना विश्रांती देणे आवश्यक असल्याने  व 2 खेळाडू दुखापतग्रस्त असल्याने त्यांनी हा निर्णय घेतला.

केन विल्यम्सन दुखापतीमुळे बाहेर फेकला गेला असल्याने त्याची जागा विल यंगने घेतली तर दुखापतीशी झगडणाऱया यष्टीरक्षक बीजे वॅटलिंगची जागा टॉम ब्लंडेलने घेतली. टॉम ब्लंडेलसाठी हा 11 वा कसोटी सामना असून तो 6 व्या स्थानी फलंदाजीला उतरेल, असे व्यवस्थापनाने स्पष्ट केले. याशिवाय, अन्य 4 बदल करत डॅरेल मिशेल, मॅट हेन्री, एजाझ पटेल व ट्रेंट बोल्ट हे या लढतीत समाविष्ट केले गेले. बोल्ट यापूर्वी पहिल्या कसोटीत खेळू शकला नव्हता. इंग्लिश संघात निलंबित ओलि रॉबिन्सनची जागा ओलि स्टोनने घेतली.

इंग्लंडतर्फे सर्वाधिक कसोटी सामने खेळणारे खेळाडू

सामनेखेळाडूकालावधी
162जेम्स अँडरसन2003 पासून आतापर्यंत
161ऍलिस्टर कूक2006 ते 2018
148स्टुअर्ट ब्रॉड2007 पासून आतापर्यंत
133ऍलेक स्टीवर्ट1990 ते 2003

Related Stories

मँचेस्टर सिटीच्या विजयात स्टर्लिंगची हॅट्ट्रिक

Patil_p

सुशीलकुमारविरुद्ध अजामिनपात्र वॉरंट

Patil_p

भारत-ब्रिटन पुरूष हॉकी सामना बरोबरीत

Patil_p

बिग बॅश स्पर्धेत बेअरस्टोचे पदार्पण

Patil_p

उत्तेजक प्रकरणाची सुनावणी ऑनलाईनद्वारे

Patil_p

भारतीय नेमबाजांकडून निराशा

Patil_p
error: Content is protected !!