तरुण भारत

सिटी स्कॅनसाठी फोंडय़ातील सामान्य रुग्णांना भुर्दंड

एका सिटी स्कॅनसाठी अडीच ते पाच हजार : आयडी इस्पितळात ही सुविधा उपलब्ध करा : डॉ. केतन भाटीकर यांची मागणी

प्रतिनिधी / फोंडा

Advertisements

 फोंडय़ातील आयडी म्हणजेच उपजिल्हा इस्पितळात दिवसाकाठी उपचारासाठी येणाऱया किमान 20 ते 25 रुग्णांना सिटी स्कॅन करुन घेण्यासाठी मडगाव किंवा पणजी येथील खासगी इस्पितळात जावे लागते. त्यासाठी एकावेळी अडीच ते पाच हजार रुपये मोजावे लागतात. सर्वसामान्य रुग्णांना गरजेच्यावेळी सिटी स्कॅनसारखी सुविधा उपलब्ध होऊ नये, हे फोंडावासियांचे दुर्दैव असून अत्यावश्यक वैद्यकीय सुविधा पुरविण्यास सरकारला आलेले अपयश असल्याची टिका फोंडय़ातील मगो नेते डॉ. केतन भाटीकर यांनी केली आहे.

दिवसाकाठी 20 ते 25 रुग्णांना सिटी स्कॅनची गरज

फोंडय़ातील उपजिल्हा इस्पितळात दिवसाकाठी चारशे ते पाचशे रुग्ण विविध आजारांवर उपचार करुन घेण्यासाठी येतात. सध्या कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे बऱयाच रुग्णांना सिटी स्कॅन करुन घेण्याचा सल्ला येथील डॉक्टरांकडून दिला जातो. मात्र ही सुविधा फोंडय़ात कुठेच उपलब्ध नाही. मडगाव व पणजी येथे खासगी  इस्पितळात ती उपलब्ध आहे. एकावेळी सिटी स्कॅन करुन घेण्यासाठी रुग्णाला अडीच ते पाच हजार रुपये मोजावे लागतात. बहुतेक रुग्णांना हा अवाढव्य खर्च परवडणारा नाही. कोराना महामारीमुळे गेले वर्षभर लोकांचे काम धंदे बंद आहेत. अनेकांच्या नोकऱया गेलेल्या आहेत, अशा परिस्थितीत हे महागडे उपचार सर्वसामान्य रुग्णांना अतिरिक्त भुर्दंड ठरत आहेत. उपजिल्हा इस्पितळात सीटी स्कॅन, एमआरआयसारख्या अत्यावश्यक वैद्यकीय यंत्रणा उपलब्ध करुन देण्याची मागणी आपण सातत्याने करीत आहे. मात्र सरकार त्या अद्याप पुरवू शकलेल्या नाहीत, असे डॉ. भाटीकर यांनी सांगितले.

‘आयव्हर्मेक्टिन’वर उधळायला पैसे आहेत, मात्र सिटी स्कॅनसाठी नाहीत ? 

सरकारकडे आयव्हर्मेक्टिन सारख्या गोळय़ांवर उधळायला रु. 22 कोटी 50 लाख आहेत. मात्र रुग्णांना गरजेचे असलेले सिटी स्कॅन मशिन उपलब्ध करुन द्यायला निधी नाही. मुख्यमंत्री कोविड साहाय्य निधीत शेकडो दात्यांनी जमा केलेली कोटय़वधी रुपयांची रक्कम कुठे गेली, असा प्रश्नही डॉ. भाटीकर यांनी उपस्थित केला आहे. कारोनाच्या दुसऱया लाटेने शेकडो लोकांचे बळी घेतले. आता तिसरी लाट येण्याचे संकेत आरोग्य यंत्रणांनी दिलेले आहेत. ही तिसरी लाट लहान मुलांसाठी धोकादायक ठरु शकते असेही सांगितले जाते. अशावेळी फोंडा उपजिल्हा इस्पितळात सिटी स्कॅन सारखी यंत्रणा सज्ज ठेवावी लागेल. फोंडा तालुक्यातील जनतेच्या आरोग्यबाबत सरकार गंभीर असल्यास तातडीने सिटी स्कॅन उपलब्ध करण्याची मागणी डॉ. भाटीकर यांनी केली आहे.

Related Stories

सरकारची स्थानिकांप्रती असंवेदनशीलता पुन्हा उघड

Amit Kulkarni

किर्लपाल भागातील पाण्याची समस्य सोडविणार

Omkar B

मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर एसीजीएल कामगारांचा संप स्थगित

Amit Kulkarni

फोंडय़ाचे नगराध्यक्ष व्यंकटेश नाईक यांचा राजीनामा

Omkar B

गोवा मराठी अकादमीच्या कविता स्पर्धेचा निकाल जाहीर

Omkar B

नऊशे जणांना 250 कोटींचा गंडा घालणारी महिला गजाआड

Patil_p
error: Content is protected !!