तरुण भारत

मुलांसाठी ‘सहा मिनिटांची चाल’

कोरोना ओळखण्यासाठीची नवी पद्धत : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची नवी मार्गदर्शक तत्वे : पाच वर्षांखालील मुलांना मास्कची सक्ती नको : पाणी, सरबत भरपूर प्यायला द्यावे :आरटीपीसीआर चाचणी आवश्यकच

प्रतिनिधी / पणजी

Advertisements

कोरोनाच्या तिसऱया लाटेत मुलांना अधिक धोका संभावत असल्याने केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या आरोग्य सेवा महासंचालकांनी नवी मार्गदर्शक तत्वे जारी केली असून कोरोना ओळखण्यासाठी ‘सहा मिनिटांची चाल’ ही नवी पद्धत अवलंबण्याचा आदेश दिला आहे. त्या व्यतिरिक्त पाच वर्षांखालील मुलांना मास्कची सक्ती करण्यात येऊ नये, त्यांना आवडेल ते पेय किंवा सरबत भरपूर प्रमाणात देऊन शरीर कोरडे पडणार नाही याची खबरदारी घेण्याची सूचना केली आहे. मुलांशी सकारात्मक बोलल्याने ती लवकर बरी होतील, असा सल्ला दिला आहे.

जी मुले लहान आहेत व 5 वर्षांखालील आहेत त्यांना मास्क वापरण्याची सक्ती असू नये. त्यांना साजेल असा मास्क उपलब्ध नसल्यास कोणतीही जबरदस्ती नको मात्र ही मुले परत परत तोंडात हात घालणार नाहीत, त्यांचे हात स्वच्छ धुतलेले असतील याची खबरदारी घेण्याचा आदेश देण्यात आला आहे. जी मुले 6 ते 11 वर्षाच्या वयोगटातील असतील त्यांना पालक किंवा डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली मास्क वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

सहा मिनिटांची चाल

लहान मुलांना कोरोनाची बाधा झाली आहे की नाही याची चाचणी कशी करायची, यावरही या मार्गदर्शकसूचित प्रकाश पाडला आहे. 12 वर्षांवरील मुलांना एखाद्या खोलीत किंवा खोलीबाहेर सहा मिनिटे सतत चालायला लावावे. त्यावेळी त्यांच्या श्वासावर लक्ष ठेवावे. धाप किती लागते, श्वास घ्यायला त्रास होतो, शरीराचा रंग बदलतो, मुले चिडचिडी होतात, चालायला मागत नाहीत, खोकला यायला प्रारंभ होते यावर नजर ठेवावी व असा कुठलाही त्रास जाणवत असेल तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घेण्याची सूचना करण्यात आली आहे.

डॉक्टरांनी सुद्धा तीच चाचणी घ्यावी

सहा मिनिटांची चाल फक्त 12 वर्षापेक्षा अधिक वयाच्या मुलांना असून ही चाचणी घेताना त्यांच्या बोटाला ऑक्सिमीटर लावण्यात यावा. सहा मिनिटे त्यांनी खोलीत चालावे. त्यावेळी त्यांचे ऑक्सिजन 94 पेक्षा खाली आल्यास किंवा 3 ते 5 टक्क्यांनी उतरल्यास, धाप लागल्यास, तोल जात असल्याचे आढळल्यास त्यांना लगेच इस्पितळात भरती करण्यात यावे. दर 4 ते 6 तासांनी ही सहा मिनिटांची चालण्याची चाचणी घेऊन अंदाज घ्यावा, अशी सूचना करण्यात आली आहे.

आरटीपीसीआर चाचणी आवश्यक

सर्दी, तापाची कोणतीही लक्षणे असल्यास आरएटी किंवा आरटीपीसीआर चाचणी घेण्यात यावी. ही चाचणी निगेटिव्ह आली तरी लक्षणे असल्यास संशयित कोविड रुग्ण म्हणून पाहावे व उपचार करावेत. त्यांच्याकडे दुर्लक्ष करु नये, अशी सूचना केली आहे.

कुठलेच औषध नको

रुग्णांची आरोग्यस्थिती बिघडून चौथ्या स्थरावर पोहोचली तरच औषधांचा वापर व्हावा, अन्यथा कुठल्याच औषधांचा मारा केला जाऊ नये. तापाची लक्षणे असल्यास 10 ते 15 एमजी पेरासिटॉमोल, खोकला असल्यास गळ्य़ाला आराम देणारे सीरप व कोमट, खाऱया पाण्याच्या गुळण्या घ्याव्यात. परिस्थिती बिकट झाली तरच इस्पितळात पूर्ण देखरेखीखाली कोर्टिकास्टेरोईड थेरेपी व एन्टीकोगुलंट औषध गाईड प्रमाणे वापरण्यास मान्यता आहे.

पाणी किंवा सरबत भरपूर द्या

मुलांना भरपूर पाणी प्यायला द्यावे. त्यांना आवडेल ते पेय किंवा सरबत भरपूर प्यायला द्यावे व शरीर कोरडे पडू देऊ नये. त्यांना आवडेल असा पोषक आहार द्यावा, अशी सूचना करण्यात आली आहे.

सकारात्मक बोला

ज्यांना कोरोनाची लागण झाली आहे त्या मुलांना घाबरवू नका व त्यांच्यासमोर घाबरुन जाऊ नका. मुलांशी सकारात्मक बोला. प्रत्यक्ष बोलणे शक्य नसल्यास सतत फोनवर व्हिडिओ कॉन्फरन्सवर बोलावे. त्यांना मोबाईलवर गेम खेळायला देऊन त्यांचे मनरिजवून त्यांना खूष ठेवण्याचा प्रयत्न करावा, अशी सूचना करण्यात आली आहे.

Related Stories

पर्रीकरांचा ‘शिष्य’ काय करतोय ? युरी आलेमावने उपस्थितीत केला सवाल

Amit Kulkarni

बार्देशात लॉकडाऊनला 100 टक्के प्रतिसाद

Omkar B

केंद्रीय पथकामार्फत वाघांच्या मृत्यूची चौकशी करणार : राणे

Patil_p

रेल्वे दुपदरीकरणानंतर मुरगाव बंदरात कोळसा हाताळणी वाढणार हा प्रचार खोटा

Amit Kulkarni

सांगेतील सरकारी जमिनीतील बेकायदा बांधकामांवर कारवाई

Patil_p

सरकार गोव्याला कोविड ‘डेस्टीनेशन’ करणार

Omkar B
error: Content is protected !!