तरुण भारत

भाजपच्या आमदार, मंत्र्यांचे ‘रिपोर्ट कार्ड’

बी. एल. संतोष, सी. टी. रवी यांनी घेतला कामाचा आढावा

पक्षश्रेष्ठींना सादर करणार अहवाल

Advertisements

‘रिपोर्ट कार्ड’वर ठरणार उमेदवारी

जनता, सरकार, पक्षासाठी काम करण्याचा दिला सल्ला : कोरोना संकटकाळातील कार्याची घेतली सविस्तर माहिती

प्रतिनिधी / पणजी

भाजपचे राष्ट्रीय संघटनमंत्री बी. एल. संतोष व गोवा प्रभारी निरीक्षक सी. टी. रवी यांनी काल गुरुवारी पक्षाच्या बहुतेक सर्व आमदार, मंत्री यांची हजेरी घेऊन त्यांच्या एकंदरीत कामगिरीचा आढावा घेतला. प्रत्येक मंत्री, आमदार यांचे स्वतंत्र ‘रिपोर्ट कार्ड’ तयार केले जाणार असून एकंदरीत अहवाल भाजपच्या पक्षश्रेष्ठींना ते सादर करणार आहेत. त्या रिपोर्टवरच उमेदवारी ठरवण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली. आल्तीनो येथील सर्किट हाऊसमध्ये त्यांनी दिवसभर आमदार, मंत्र्यांच्या गाठीभेटी घेऊन त्यांच्या कार्याचा आढावा घेतला.

 पक्षाचे मंत्री, आमदार यांच्यात कोणतेही मतभेद नाहीत. सर्वजण एकसंध असून पक्षासाठी, सरकारसाठी व जनतेसाठी काम करा, असा संदेश त्यांना देण्यात आला तर पक्षाला अडचणीत आणणाऱया मंत्री, आमदारांची दोन्ही निरीक्षकांनी कानउघडणी करून त्यांना समज देण्यात आली आहे.

भाजपच्या या निरीक्षकांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत, पक्षाचे अध्यक्ष सदानंद तानावडे, पक्षाचे प्रमुख पदाधिकारी तसेच कोअर समितीचे सदस्य यांची भेट घेतली आणि गोव्यातील पक्षीय संघटनात्मक कामाची चौकशी केली. गोव्यातील एकंदरीत राजकीय परिस्थितीचा त्यांनी आढावा घेतला आणि त्याची नोंद केली. आगामी 2022 मध्ये होणाऱया विधानसभा निवडणुकीची तयारी करा, असा सल्लाही त्यांनी आमदार, मंत्र्यांना दिला. कोरोना संकटकाळात केलेल्या सेवा संघटनाची माहिती देखील त्यांनी जाणून घेतली.

अनेक मंत्री, आमदारांची निरीक्षकांशी भेट

उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर, उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर, महसूलमंत्री जेनिफर मोन्सेरात, वीजमंत्री नीलेश काब्राल, कचरा व्यवस्थापनमंत्री मायकल लोबो, आरोग्यमंत्री विश्वजित राणे, नगरविकासमंत्री मिलींद नाईक, सार्वजनिक बांधकाम मंत्री दीपक पाऊसकर यांनी भाजपच्या निरीक्षकांची भेट घेतली. त्यांच्यापैकी नाईक व राणे हे बाहेर आल्यानंतर त्यांनी पत्रकारांना बगल दिली. पत्रकारांच्या विविध प्रश्नांना कोणतीच उत्तरे न देता ते दोन्ही मंत्री घाईगडबडीत निघून गेले. त्यांनी प्रसारमाध्यमांना टाळल्याचे स्पष्टपणे दिसून आले. इतर मंत्री मात्र प्रसारमाध्यमांशी सामोरे गेले. आपापल्या मतदारसंघातील विविध कामे, संघटना बांधणी, विकास प्रकल्प, कोरोना स्थिती, पुढील नियोजन याविषयी विचारणा केल्याची माहिती त्या मंत्र्यांनी दिली.

कोरोना संकटकाळातील माहिती घेतली

तानावडे म्हणाले की, पक्ष संघटनेच्या कामासाठी निरीक्षक गोव्यात आले असून त्यांचा देशभर विविध राज्यात दौरा चालू आहे. संघटना बळकट व मार्गदर्शन करणे यासाठी त्यांची गोवा भेट असून सेवा संघटना या मोहिमेत कोरोना संकटकाळात केलेल्या कामाची माहिती त्यांनी घेतली आणि कौतुक केले.

दोन्ही निरीक्षकांच्या या भेटीनंतर प्रत्येक भाजप आमदार, मंत्री यांना आपापल्या राजकीय भवितव्याचे, आगामी निवडणुकीतील उमेदवारीचे संकेत मिळणार असल्याची माहिती भाजपच्या सुत्रांनी दिली.

कोरोनाकाळात केंद्र, राज्य सरकारचे कार्य चांगले : संतोष

भाजपचे निरीक्षक रवी यांना छेडले असता ते म्हणाले की भाजप पक्ष, सरकार मंत्री, आमदार यांच्यात सर्व काही आलबेल आहे. सर्वजण पक्षासाठी, सरकारसाठी काम करीत आहेत. केवळ निवडणुकीकरीता भाजप काम करीत नाही तर जनतेची सेवा हे कामही चालू असते. गोवा राज्यात आता कोरोना नियंत्रणात आला असून लसीकरणाची सुविधा जनतेसाठी देण्यात आली आहे. भाजपच्या केंद्रातील, गोव्यातील सरकारने कोरोना संकटाच्या विरोधात शक्य ते सर्व काही केले, असे ते म्हणाले.

जिंकण्याची क्षमता हा निकष लावावा : मायकल लोबो

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी देताना जिंकण्याची क्षमता हा निकष लावण्यात यावा, आणि त्यानुसार उमेदवारी मिळावी अशी सूचना भाजपच्या निरीक्षकांना आपण केल्याची माहिती मंत्री मायकल लोबो यांनी दिली. आपणास पुन्हा बोलावण्यात येणार असल्याचे निरीक्षकांनी सांगितले असून कोणता मतदारसंघ हवा याची विचारणा केली जाणार आहे, असेही लोबो यांनी नमूद केले. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी व संघटनात्मक बळकटीसाठी काम करा, असा संदेश निरीक्षकांनी दिल्याचे लोबो म्हणाले.

भाजपच्या उमेदवारीवर निडणूक लढविण्यास तयार : गावडे

  भाजपने उमेदवारी दिली तर त्या पक्षाच्या तिकीटावर आगामी विधानसभा निवडणूक लढवण्यास तयार असल्याची माहिती अपक्ष आमदार व नागरी पुरवठा मंत्री गोविंद गावडे यांनी दिली. मागील निवडणुकीत उतरलो तेव्हा भाजपने पाठिंबा दिला होता, असेही त्यांनी दिनर्शनास आणले. गावडे हे अपक्ष आमदार आहेत व ते भाजपचे आमदार नाहीत, तरीही गोव्यात आलेल्या भाजपच्या दोन्ही निरीक्षकांनी त्यांना भेटीसाठी पाचारण केले आणि त्यांच्या खात्याची, कामाची चौकशी केली व एकंदरीत प्रगतीचा आढावा घेतला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी वरीलप्रमाणे खुलासा केला.

Related Stories

साळगावकरचे चर्चिलवर ‘पंचतारांकित’ गोल; स्टिफनची हॅट्ट्रिक

Amit Kulkarni

कुर्टी-फोंडा येथील फुटलेली जलवाहिनी जोडली

Amit Kulkarni

राज्यातील कोरोना गैरव्यवस्थापनावर स्टॅनफर्ड संशोधकांचे शिक्कामोर्तब

Patil_p

मेळावलीसीयांची भावना सरकारने समजून घ्यावी

Patil_p

म्हादईप्रश्नी गोव्यावर अन्याय होऊ देणार नाही

tarunbharat

झाडावर चढलेल्या बिबटय़ाच्या बछडय़ाला जीवदान देण्यात यश

Amit Kulkarni
error: Content is protected !!