तरुण भारत

मराठा आरक्षणासाठी नक्षलवाद्यांनी काढलं पत्रक, खासदार संभाजीराजे म्हणाले…

ऑनलाईन/टीम

मराठा आरक्षणाला अनेक समाजाकडून पाठिंबा मिळत यातना आता गडचिरोलीतील नक्षलवाद्यांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा देणारे पत्रक जरी केले आहे. या पत्रकानंतर मराठा आंदोलनाचे नेतृत्व करणारे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मराठा समाजासाठी सहानुभूती दाखवल्याबद्दल मी तुमचा आदर करतो. पण तुम्ही शिवबांचे खरे वैचारिक वारसदार असाल तर मुख्य प्रवाहात सामील व्हा, असे आवाहन संभाजीराजे यांनी नक्षलवाद्यांना केले आहे.

राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला असतानाच आता गडचिरोलीत नक्षलवाद्यांकडून पुन्हा एक पत्रक काढत मराठा समाजाने दलाल नेत्यांपासून सावध राहावे, असा इशारा दिला आहे. भाकपा माओवादी कमिटी सचिव सह्याद्रीने हे पत्रक काढले आहे. नक्षलवाद्यांच्या या पत्रकाची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे.

खासदार संभाजीराजे यांनी नेमकं काय म्हटलंय पत्रात…
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची साक्ष देऊन मराठा समाजाला भुरळ पाडण्याचा प्रयत्न नक्षलवादी संघटना करत असल्याचे माझ्या वाचनात आले. ‘मराठ्यांनो, आम्ही तुमची वाट पाहत आहोत’ असेही ते म्हणाले. उलट मराठा समाजाचा घटक किंवा त्याच स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा वंशज या नात्याने, मी त्यांनाच आवाहन करतो. “नक्षलवाद्यांनो या आम्हीच तुमची वाट पाहत आहोत. या सामील व्हा मुख्य प्रवाहात.” भारताने लोकशाही व्यवस्था स्वीकारली आहे. शिवाजी महाराजांचा राज्यकारभार बारकाईने पाहिला, तर अष्टप्रधान मंडळ स्थापून, त्यांनी लोकशाहीचेच बीजारोपण केले होते. त्यांचेच नववे वंशज राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी one of the pillar of Indian Democracy असे संबोधित केले होते. त्यांचा रक्ताचा आणि वैचारिक वारसदार या नात्याने मी आपल्याला आवाहन करू इच्छितो, डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाच्या नागरिकांच्या, इथल्या हजारो वर्षांच्या संस्कृतीला अनुसरूनच भारतात लोकशाही राज्य व्यवस्था केली. तुम्ही सुद्धा तिचे पाईक व्हा.

मराठा समाजाने शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेत भूमिका निभावली होतीच. त्यांच्या नंतर सुद्धा परकीय शक्तींचा पाडाव करण्यासाठी मराठा समाजाने आपले सातत्याने बलिदान दिलेले आहे. शिवाजी महाराजांनी घालून दिलेला आदर्श देश स्वतंत्र झाल्यानंतर सुद्धा कायम ठेवला आहे. आजही मराठा समाज ह्या लोकशाहीचे रक्षण करण्यास सर्वात पुढे आहे. महाराष्ट्राचे हे सह्याद्री पुत्र हिमालयाचे रक्षण करण्यासाठी आपल्या छातीचा कोट करून सीमेवर उभे आहेत.

मला मान्य आहे, की स्वातंत्र्यानंतर मराठा समाजावर अन्याय झाला आहे. त्याबाबत आम्ही याच लोकशाही व्यवस्थेत लोकशाही मार्गानेच आमचे हक्क मागत आहोत. न्यालयीन लढाई, आंदोलने, मोर्चे, चर्चा, लाँग मार्च इ. मार्ग आम्ही स्विकारत आहोत. अवघ्या जगाने आमच्या मूक मोर्चांची दखल घेतली होती. शिवाजी महाराजांचे स्वराज्य अठरा पगड जाती, बारा बलुतेदार यांचे होते. यापुढेही सर्वांना सोबत घेऊन आम्ही पुढे जाऊ. आम्हाला विश्वास आहे की आम्ही आरक्षणही मिळवू आणि समाजाचे इतर प्रश्नही सोडवू.

कुठलीच व्यवस्था परिपूर्ण नसते, तिच्यात उणीवा असणारच. लोकशाही बाबत पण काहींचे वेगळे मत असू शकतात. परंतु जगभरात आज ती व्यवस्था स्वीकारली गेली आहे. भारताने सुद्धा तिचा यशस्वी स्वीकार केला, यशस्वी वाटचाल सुद्धा करत आलो आहोत. काही उणीवा आजही असतील पण आपण त्यामध्ये सुधार करण्यासाठी प्रयत्न करायचे असतात. क्रांतीचा विचार हा चांगलाच आहे. पण तो विधायक मार्गाने जाणारा असावा. काही लोक या लोकशाही व्यवस्थेत चांगले नसतीलही, पण म्हणून संपूर्ण व्यवस्थाच कुचकामी आहे, असे नसते. लोकांना शिक्षित करून, चांगल्या वाईट गोष्टींची जाणीव करून देऊन मत पेटीच्या साहाय्याने पर्याय उभा करून देण्यातच संपूर्ण राष्ट्राची भलाई आहे.
छत्रपती संभाजीराजे

Advertisements

Related Stories

पश्चिम महाराष्ट्रातील 12.46 लाख कृषी वीजग्राहकांना वीजबिल कोरे करण्याची संधी

Abhijeet Shinde

आत्मनिर्भर भारत रोजगार योजनेच्या कालावधीत वाढ

Patil_p

भारतातील नेजल वॅक्सिन मुलांसाठी ठरणार गेमचेंजर

datta jadhav

अडचणीवर मात करून कामे पूर्ण करण्याचे ठेकेदारापुढे आव्हान.

Patil_p

शिये येथून दुसऱ्या दिवसाच्या जलसमाधी पदयात्रेला सुरुवात

Abhijeet Shinde

नीरव मोदीच्या कोठडीत 6 ऑगस्टपर्यंत वाढ

datta jadhav
error: Content is protected !!