तरुण भारत

बेल्जियमची रशियावर एकतर्फी मात

वृत्तसंस्था/ सेंट पीटर्सबर्ग

रोमेलू लुकाकूने नेंदवलेल्या दोन गोलांच्या बळावर बेल्जियमने युरो चषक 2020 स्पर्धेची विजयी सुरुवात करताना यजमान रशियावर 3-0 असा सहज विजय मिळविला. गट ब मध्ये फिनलंडनेही विजय मिळविला असला तरी सरस गोलांमुळे बेल्जियमने या गटात आघाडीचे स्थान मिळविले आहे.

Advertisements

फिफा क्रमवारीत अग्रस्थानी असणाऱया बेल्जियमने या सामन्यात मानांकनाला साजेसा खेळ केला. प्रमुख खेळाडू केविन डी ब्रुईन संघात नसतानाही त्यांनी दर्जेदार खेळ केला. रशियाला मात्र घरच्या मैदानावर खेळत असूनही झगडावे लागले. रेड डेव्हिल्स म्हणून ओळखला जाणारा बेल्यिजम संघ सर्व स्पर्धांत मिळून गेल्या 10 सामन्यात अपराजित राहिला असून त्यांनी खेळलेल्या गेल्या 24 सामन्यांत फक्त एका सामन्यात त्यांना पराभव स्वीकारावा लागला आहे. याशिवाय गेल्या 31 सामन्यात त्यांनी किमान एक गोल नोंदवलेला आहे.

येथील सामन्यात बेल्जियमने 10 व्या मिनिटाला रशियावर आघाडी घेतली. लियांडर डेनडॉन्करकडून बॉक्स क्षेत्रात मिळालेल्या चेंडूचा लाभ घेण्यात आंद्रेई सेम्योनोव अपयशी ठरला. मात्र लुकाकूने चेंडूवर लगेचच ताबा घेत मोका साधला. त्याने जमिनीलगत फटका मारत चेंडूला गोलजाळय़ाची अचूक दिशा दिली. लुकाकूचे हा गोल सेलिब्रेट करणे मात्र सर्वांना भावले. तो टीव्ही कॅमेऱयाजवळ गेला आणि हॉस्पिटलमध्ये आयुष्याची लढाई लढत असणाऱया एरिकसनला ‘ख्रिस, ख्रिस आय लव्ह यू’ असे म्हणून मानवंदना देत माणुसकीचे दर्शन घडविले. लुकाकू व एरिकसन इंटरमिलान क्लबकडून एकत्र खेळतात. ‘आम्ही दोघे बराच काळ एकत्र असतो. त्यामुळे एरिकसनला जे घडले त्याने मी हादरून गेलो. मी खूप वेळ अश्रू ढाळत होतो. हा सामना जिंकला असला तरी मन एरिकसनच्या विचारातच होते, त्यामुळे पूर्णपणे एंजॉय करणे खूपच कठीण गेले,’ अशी भावूक प्रतिक्रिया लुकाकूने दिली.

बेल्जियम चेंडूवर ताबा ठेवण्यात सरस होते तर रशियाला सामन्यावर पकड मिळविण्यासाठी झगडावे लागत होते. 2018 मध्ये त्यांच्याच देशात झालेल्या विश्वचषक स्पर्धेत रशियाने उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली होती. 26000 हून अधिक घरच्या प्रेक्षकांसमोर त्यांना आपला खेळ उंचावता आला नाही. त्यांचे प्रशिक्षक स्टॅनिस्लाव चेर्चेसोव्हही गोंधळल्याचे दिसत होते. त्यांचा प्रमुख स्ट्रायकर आर्टेम इतरांची साथ मिळत नसल्याने एकाकी पडल्याचे दिसून आले. या स्थितीचा फायदा बेल्जियमने अचूक उठविला आणि 34 व्या मिनिटाला आघाडी वाढविली. रशियाचा गोलरक्षक अँटोन शुनिनने थॉर्गन हॅझार्डचा फटका हाताने थोपविण्याचा प्रयत्न केला. पण त्याने तटवलेला चेंडू थॉमस मेयुनियरकडे गेला आणि त्याने तो जाळय़ात धाडण्यात कोणतीही चूक केली नाही. मध्यंतरानंतर रशियाने दडपण वाढविण्याचा थोडासा प्रयत्न केला. पण बेल्जियमने त्यांना सहजतेने रोखण्यात यश मिळविले. 88 व्या मिनिटाला लुकाकूने वैयक्तिक दुसरा व संघाचा तिसरा गोल नोंदवून बेल्जियमच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. बेल्जियमचा पुढील सामना डेन्मार्कविरुद्ध 17 जून रोजी तर रशियाचा पुढील सामना फिनलंडविरुद्ध 16 जूनला होणार आहे.

आजचे सामने

1) स्कॉटलंड वि. झेक प्रजासत्ताक

वेळ ः सायंकाळी 6.30 वाजता

स्थळ ः हँपडेन पार्क, ग्लासगो.

2) पोलंड वि. स्लोव्हाकिया

वेळ ः रात्री 9.30 वाजता

स्थळ ः सेंट पीटर्सबर्ग.

3) स्पेन वि. स्वीडन

वेळ ः मध्यरात्री 12.30 वाजता

स्थळ ः सेव्हिले. प्रक्षेपण ः सोनी सिक्स वाहिन्यावर.

Related Stories

टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेचे थाटात उद्घाटन

Amit Kulkarni

एक महिन्याचे वेतन क्रीडामंत्र्यांकडून जाहीर

tarunbharat

महिला बॉक्सर्सचे एचपीडी राफाएल यांचे इटलीस प्रयाण

Patil_p

क्रिकेटपटूंना कोरोनाची सवय करून घ्यावी लागेल : गंभीर

Patil_p

प्रॅपर्ट बनली चॅम्पियन्स लीग स्पर्धेत पंचगिरी करणारी पहिली महिला

Patil_p

भारत-इंग्लंड मालिका लांबणीवर? लवकरच घोषणा शक्य

Patil_p
error: Content is protected !!