तरुण भारत

फोंडय़ातील ‘मॅन विथ गोल्डन आर्म’ रक्तदाते

करूनी दान रक्ताचे, ऋण फेडावे सामाजाचे

महेश गांवकर / फोंडा

Advertisements

कोरोना महामारीपासून सावरण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लसीचा वेग वाढू लागल्याने रक्तपेढय़ामध्ये मोठय़ा प्रमाणात रक्तटंचाई भासू लागली आहे. जीएमसी रक्तपेढीतर्फे युवकानी रक्तदान करावे असे आवाहन करण्यात येत आहे. त्यामुळे सद्या राज्यभरातील विविध संस्थाही रक्तदानासाठी सरसावल्या आहेत. फेसबुकच्या माध्यमातूनही ही मोहीम राबविण्यात आलेली असून तात्काळ गरजवंताना रक्त पुरवठा करण्याकडे आज लोकांचा कल दिसून येतो. आजची युवापिढी मोबाईलवेडी अशी बोटे दाखविण्यात येते मात्र सर्वाधिक रक्तदान करणारी मंडळीही युवापिढीच असल्याचे निदर्शनास येत आहे. रक्तदान हेच श्रेष्ठ दान हे प्रमुख उद्दिष्ट मनाशी बाळगून रक्तदान करणाऱया 18 ते 65 वर्षाच्या गटातील असंख्य रक्तदात्यांना लाख मोलाचा सलाम व आजच्या जागतिक रक्तदान दिनाच्या त्यांना हार्दीक शुभेच्छा!

     फेंडय़ाचा ‘मॅन विथ गोल्डन आर्म’-सुदेश नार्वेकर

  रक्तदान हे श्रेष्ठदान असे म्हटले जाते. पाच वर्षातून एकदा लोक मतदानाचा हक्क बजावून आपले सामाजिक दायित्व संपले यात धन्यता मानणाऱया युगात फोंडयात असा एक देवमाणूस आहे जो पन्नासीकडे झुकलेला आहे तरी तो नित्यनेमाने वर्षातून तीनवेळा रक्तदानाचा आपला हक्क बजावत आहे. रक्ताच्या तुटवडय़ावेळी लोकांना पावणारा देवमाणूस म्हणजे फेंडय़ातील ‘मॅन विथ गोल्डन आर्म’ सुवर्ण बाहू असलेला   सुदेश नार्वेकर. त्याने आजपर्यंत 95 वेळा रक्तदान केले असून तो स्वतः आपण रवतदान हा हक्क म्हणून बजावत असल्याचे अभिमानाने सांगतो.अडल्या नडलेल्यासाठी त्यांनी मुंबई, बंगळूर, पुणे, बेळगांव येथे धाव घेत रूग्णांसाठी रक्तदान केलेले आहे. महिन्याकाठी त्याला सुमारे 50 कुटूंबियांकडून रक्ताची आवश्यकतेसाठी फोन येत असतात. यावेळी तो बांबोळी येथील रक्तपेढी व रक्तदात्यांना संपर्क करून त्याना मदत पुरवित असतो. एखाद्यावेळी स्वतःच्या वाहनाने रक्तदात्यांना बांबोळी येथे रक्तदानासाठी पोचत सामाजिक दायित्व निभावीत आहे. याकामी त्याला बांबोळी रक्तपेढीत कार्यरत डॉ. मल्ल्या, डॉ. पास्कॉल डिकॉस्ता, डॉ. साईश, डॉ, क्लेर, डॉ, सचिन पालयेकर, डॉ. संजय कोरगावकर यांची महत्वाची मदत लाभत असल्याचे ते सांगतात. 

 उच्च माध्यमिक काळापासून रक्तदानः 18पासून स्टिल काऊटींग…

   राज्यभर मागील 31 वर्षात त्याने सुमारे 82 रक्तदान शिबिरे आयोजित करण्यासाठी महत्वाची भूमिका पार पाडलेली आहे. प्रथम उच्च माध्यमिक विद्यालयीन शिक्षण घेत 1990 च्या काळातील एक प्रसंगामुळे तो रक्तदान करण्यात पडले. मडगांव येथून येत असताना साकवार-बोरी येथे एका दुचाकीच्या अपघातातील जखमी रक्तबंबाळ अवस्थेत त्याला आढळला. त्याला फेंडा उपजिल्हा इस्पितळात दाखल केल्यानंतर रक्तस्रावामुळे रक्ताची गरज भासली. यावेळी त्यानी स्वतः रक्तदान करीत या सेवेची नांदी केली. 18 वर्षापासून सुरू केलेले हे व्रत आज 49 व्या वर्षीही सांभाळत असून ताठ कणा असेपर्यंत रक्तदान करीत राहणार असल्याचे मनोगत तो काल पीओपी संस्थेतर्फे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात वावरताना बोलत होते. देवमाणसाने आज पर्यत 95 वेळा रक्तदान करून शेकडो लोकांचे जीव वाचविलेले आहेत. तंदुरूस्त माणसाने सामान्यपणे तीन महिन्यातून एकदा रक्तदान करणे फायद्याचेच असते असे उद्गारही त्यांनी काढले, कायम तंदुरूस्त राहण्यासाठी त्याचा हिरव्या पालेभाज्यावर जास्त भर असतो. 

‘आज मला-उद्या तुला’ या भावनेने रक्तदान करा-ऍड. अनिरूद्ध सिनाय बोरकर

   फोंडय़ातील युवा रक्तदात्यापैकी ऍड. अनिरूद्ध सिनाय बोरकर यांनीही एका मित्राने रक्तासाठी मारलेल्या हाकेवेळी 21 व्या वर्षी कॉलेज विद्यार्थी असताना प्रथम रक्तदान केल्याचे सांगितले. त्याच्या म्हणण्यानुसार ‘आज मला-उद्या तुला’ हा रक्तदानामागील फंडा आहे. एखाद्याच्या रक्तदानामुळे कित्येक रूग्णांना नवजीवन मिळू शकते. रक्ताची गरज कोणाला कधी उदभवू शकते याची शाश्वती नसते. त्यामुळे आजच्या युवकांनी निरंतन वर्षाकाठी दोनदा रक्तदान करावे. सरकारच्या सहाय्याने कुणी धनाढय़ाने एका खासगी रक्तपेढी उभारण्यासाठीही प्रयत्न व्हावेत असा मनोदय त्यांनी व्य़क्त केला.

रक्तदानातून समाजसेवा साधावी- सदाशिव मंगेशकर

   यावेळी बोलताना बांबोळी रक्तपेढी विभागाचे एसएसडब्ल्यू सदाशिव मंगेशकर यांनी सांगितले की आपत्कालीन परिस्थितीत रूग्णाचे प्राण वाचविण्यासाठी रक्तपेढीतून रक्त घेतले जाते. त्याचा परतावा रक्तदानातूनच करावा असा आमचा होरा असतो मात्र फक्त 100 पैकी 20 जणांचे नातेवाईक रक्तदान करीत असतात तेव्हा वाईट वाटते. कोरोना काळानंतर किती दिवसांनी रक्तदान करावे यासंबंधी स्पष्ट करताना लस घेतल्यानंतर 14 दिवसांनी रक्तदान करणे शक्य असते. सद्यपरिस्थितीत रक्तदान शिबिरात येणाऱया स्वयंसेवकाने कोरोना लस घेतली आहे की नाही हे जाणून घेतल्यानंतर रक्तदानाची प्रक्रिया सुरू करीत असतात. बहुतेक दोन्ही डोस पुर्ण झाल्यानंतरच नागरिकांनी रक्तदान करावे. बांबोळी रक्तपेढीशी जोडलेल्या सुमारे 50 सामाजिक संस्था आहेत. धार्मिक देवस्थान समितीतर्फेही रक्तदान शिबिराचे आयोजन होणे गरजेचे आहे. कारण त्याच्याकडे सभागृह व इतर सामुग्री व भाविकांची मोठी फळी असते. त्याच्या आवाहनाला अनेक रक्तदाते मिळू शकणे सहज शक्य असल्याचे मत त्यांनी मांडले. बांबोळी रक्तपेढीतर्फे रक्तदान शिबिरासाठी सात जणांचा चमू कार्यरत असतो. दोन डॉक्टर, पारिचारीका, तांत्रिक सहाय्यक, सहाय्यक, चालकाचा समावेश असतो. एका वेळेला रक्तदात्याकडून 350 मि.लि. जमा केले जाते. बांबोळी रक्तपेढीत प्रत्येक रक्तगटाचा 1000 युनिटचा साठा उपलब्ध असल्यास रक्तसाठा मुबलक असल्याचे मानता येते. कोरोना काळात हे प्रमाण कमी होत असल्यामुळे कायम रक्तदान शिबिरावर भर देत असल्याचे बांबोळी रक्तपेढीचे एमएसडब्ल्यू मंगेशकर यांनी सांगितले. 

   जागतिक आरोग्य संघटनेतर्फे 1997 पासून 14 जून हा जागतिक रक्तदान दिन म्हणून साजरा करण्यात येतो. तसेच मानवी रक्ताचे एग्लुटीनच्या आधारे ए, बी, ओ असे वर्गीकरण करणाऱया नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ कार्ल लैडस्टाईन यांचा वाढदिवस आहे.

रक्तदान शिबिरात अग्रेसर डॉ. कौतुक व केतन भाटीकर बंधू

   फोंडय़ातील सामाजिक कार्यकर्ते व आरोग्यसंबंधी विषयावर नेहमीच उपजिल्हा इस्पितळातील असुविधांवर फोंडावासियांचे प्रश्न मांडणारे डॉ. केतन भाटीकर हे ‘स्पार्क ’ या आपल्या आस्थापनाच्या माध्यमातून रक्तदान मोहीम राबविण्यात अग्रेसर आहेत. त्याच्या दिमतीने त्याचे बंधू डॉ. कौतुक भाटीकर यांचाही मोलाची साथ त्यांना लाभत आहे. सुमारे दोन हजारहून अधिक रक्तदाते त्यानी जोडलेले आहे. डॉ. कौतुक भाटीकर यांनी विविध संस्थाच्या माध्यमातून आपली समाजपयोगी उपक्रम राबवित असतात. एकदा केलेल्या रक्तदानातून दोन ते तीन जणांचे प्राण वाचविणे शक्य असते असा विचार करून नागरिकांनी राजकीय पक्षाची रक्तदान शिबिर असा भेदभाव न करता माणूसकीच्या दृष्टीकोनातून रक्तदान शिबिरात सहभागी व्हावे व दुसऱयांनाही प्रोत्साहन करावे असे आवाहन भाटीकर डॉक्टर बंधूनी केले आहे.

Related Stories

मंत्री नीलेश काब्राल गोमेकॉत दाखल

Amit Kulkarni

पणजी मधील घोटाळे आणि गुन्हेगारीचे प्रमुख बाबूशच आहेतः

Patil_p

साळगावात कोरोना टीका उत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद

Amit Kulkarni

अधिवेशनात खाण महामंडळ विधेयक संमत करणार

Amit Kulkarni

केपेतील इच्छुक उमेदवारांचा पालिका संचालकांना घेराव

Amit Kulkarni

मांद्रे मतदारसंघात काँग्रेस पक्ष सक्षम

Omkar B
error: Content is protected !!