तरुण भारत

सोनजाई डोंगरावर दोन हजार वर्षापूर्वीची लेणी उजेडात

वाई / प्रतिनिधी : 

वाई तालुक्यातील डोंगररांगामध्ये अनेक रहस्य दडलेली आहेत. त्यापैकी नव्याने उजेडात आलेली सोनजाई डोंगरातील 2 हजार वर्षापूर्वीची लेणी आणि दोन पाण्याच्या टाक्यांचा महेश सावंत आणि त्यांच्या पथकाने शोध लावला आहे. या लेणीचा वापर त्याकाळी बौद्ध भिखु राहण्यासाठी आणि ध्यान धारणा करण्यासाठी करत असावेत, अशी शक्यता भटकंती सह्याद्री परिवाराचे रोहित मुंगसे यांनी वर्तवली आहे.

Advertisements

याबाब माहिती देताना रोहित मुंगसे म्हणाले, वाई परिसरातील बरीचशी प्राचीन ऐतिहासिक ठिकाणे नव्याने उजेडात येत आहेत. वाई शहराच्या दक्षिण बाजूस असणाऱ्या सोनजाई डोंगराला प्राचीन काळापासूनच ऐतिहासिक महत्त्व आहे. किसनवीर कॉलेजच्यावर असणाऱ्या दोन लेण्या, सोनजाई डोंगराच्या पूर्व बाजूस पाचीदेवळ येथील पाच लेण्या, तसेच सोनजाई देवीच्या मंदिरातील असणारे खांब टाके, आजही ही ठिकाणे आपल्या प्राचीनत्वाची साक्ष देत उभी आहेत. त्यात आणखी भर म्हणजे उजेडात आलेली ही नवीन लेणी. वाई-बावधन रस्त्याला, सोनजाई नगरच्या उजव्या बाजूला, हॉटेल मधुरा गार्डनच्या पाठीमागे, सोनजाई डोंगराच्या मध्यावर ही लेणी आहे. ही लेणी कातळ खडकात कोरलेली असून, लेणीच्या चौकटीचे माप २ फूट (रुंदी) x ५ फूट (उंची) आहे. लेणीचे आत मधील माप ११ फूट (लांबी) x ७ फूट (रुंदी) x ५ फूट (उंची) असून, ही लेणी खोल स्वरूपाची आहे.या लेणीचे तोंड उत्तर दिशेला असून, लेणीच्या आतमध्ये पावसाच्या पाझरणाऱ्या पाण्याची साठवणूक व्हावी, म्हणून दगडातच चर कोरलेला आहे. बहुदा या चरातून पाणी पोढीत (पाण्याच्या टाक्यात) जात असावे. 

या लेणीच्या आसपास शोधा-शोध केल्यावर आम्हाला दोन नवीन पाण्याच्या पोढ्या (पाण्याचे टाकी) निदर्शनास आल्या. लेणीच्या उजव्या आणि डाव्या बाजूला कातळात कोरलेल्या, पण पूर्णपणे गाळात बुजलेल्या त्यावर झुडुपे उगवलेली अशा अवस्थेत पोढ्या (पाण्याची टाकी) होत्या. या दोन पोढ्या सापडणे म्हणजे नवीन शोधचं. उजव्या बाजूच्या पोढीतील गाळ काढण्याचा निर्णय आम्ही घेऊन, कित्येक वर्षांपासून या बुजलेली पोढी (पाण्याचं टाकं) मोकळी केली. जवळपास ४ x ४ x ४ फूट (खोलीx लांबीx रुंदी) असलेल्या या पोढीत ४००-५०० लिटर पाणी साठत असावे. लेणीची रचना पाहता, या लेणीत कुठेही बाक कोरलेला दिसत नाही, खोली स्वरूपाची ही लेणी असून, सुरुवातीच्या काळात लेण्यांमध्ये बाक कोरलेले नसतं. यावरून अंदाज लावता येतो की, वाई परिसरातील सुरुवातीच्या काळात कोरली गेलीली ही लेणी असावी. या लेणीचा वापर त्या काळी बौद्ध भिक्खू ध्यानधारणा आणि राहण्यासाठी करत असावेत. जवळपास दोन हजार वर्षांपूर्वी सातवाहन कालखंडात, इसवीसन पहिल्या किंवा दुसऱ्या शतकात ही लेणी कोरली गेली असावी. वाई परिसरात सोनजाई डोंगरातील लेणी, पांडवगडावरील लेणी, पालपेश्वर लेणी, केंजळची कडजुबाई लेणी, या लेण्या असून, दोन हजार वर्षांपूर्वी वाई परिसर, हा नक्कीच घाट माथ्यावरील बाजारपेठेचं महत्त्वाचं ठिकाण असावं. वाई परिसरात अजून काही लेण्या दडल्या असण्याची शक्यता आहे, त्याबद्दल शोधमोहीमा चालू आहेत, असे मुंगसे यांनी सांगितले.

Related Stories

मोकाट कुत्र्यांचा चिमुरडीवर हल्ला

Patil_p

कोरोनाविरोधात राजधानीत सातारकरांनी थोपटले दंड

Patil_p

‘बीट मार्शल’ संकल्पना पुन्हा कार्यान्वित

Patil_p

विवाहितेचा जाचहाटप्रकरणी पतीसह 6 जणांवर गुन्हा

Patil_p

सातारा जिल्ह्यात एकाचा मृत्यू, 106 नवे कोरोना बाधित

triratna

सातारा जिल्ह्यात 54 नवे रुग्ण

Shankar_P
error: Content is protected !!