तरुण भारत

कोल्हापूच्या फौंड्री उद्योगाचे भीष्माचार्य, ज्येष्ठ उद्योजक रामप्रताप झंवर यांचे निधन

प्रतिनिधी / पुलाची शिरोली

फौंड्री उद्योगातील भीष्माचार्य, ज्येष्ठ उद्योजक आणि झंवर ग्रुप ऑफ कंपनीचे संस्थापक अध्यक्ष रामप्रताप झंवर यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या आकस्मिक निधनाने कोल्हापूरच्या औद्योगिक क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.

रामप्रताप झंवर यांचा जन्म इचलकरंजी येथे त्यांच्या आजोळी ३ फेब्रुवारी १९३५ ला झाला. त्यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण सांगली जिल्ह्यातील आष्टा येथे झाले. महाविद्यालयीन शिक्षण पुणे येथील फर्ग्युसन कॉलेजमध्ये तर अभियांत्रिकीचे शिक्षण पुण्यातच झाले. बी.ई. मेकॅनिकल झाल्यानंतर किर्लोस्कर वाडी येथील किर्लोस्कर ब्रदर्स या कंपनीत त्यांना लगेच नोकरी मिळाली. पण त्यांनी ती नोकरी सोडून उद्योग सुरू करण्यासाठी कोल्हापुरात आले.

झंवर कुटुंबातील रामप्रताप या तरुणाची नोकरीपेक्षा स्वतःच्या मालकीचा एखादा उद्योग असावा असे स्वप्न होते. हे स्वप्न साकारण्यासाठी त्यांनी नोकरी सोडून छोट्याशा खोलीत भागीदारीत एक वर्कशॉप सुरू केला होता. परंतु किरकोळ कारणामुळे त्यांची भागीदारी संपुष्टात आली. त्याच कलाटणीमुळे व्यवसायाला नवी दिशा मिळून त्यांनी गरुड झेप घेतली.

काहीतरी करायचंच असा ध्यास त्यांच्या मनी असल्याने १९६५ मध्ये उद्यम नगरात त्यांनी भागीदारीमध्ये मे. इंजिनीरिंग डेव्हलपमेंट हा कारखाना सुरू केला होता. यावेळी त्या कारखान्यात डिझेल इंजिनचे कंपोनेंट्स व ऑटो कांम्पोनंन्ट्सचे पार्ट तयार करून त्यांची देशभर विक्री सुरू केली. एका लेथ मशिनवर सुरू केलेल्या कामाला चांगली मागणी मिळू लागली. ‘ ईडी. पद्मा ‘ या ब्रॅंडने त्यांचे पार्टस देशात पोहचले. आपल्या उद्योगाचे स्वप्न प्रत्यक्षात आणावे म्हणून स्वताची मे. आर. एस .झेड हि छोटीशी कंपनी १९८२ मध्ये सुरू केली. तर १९८४ मध्ये किरकोळ कारणामुळे मे. इंजिनीरिंग डेव्हलपमेंट या कंपनीतील भागीदारी संपुष्टात आली. परंतु जोडलेले लोकांनी व नातेवाइकांनी एवढेच नव्हे तर त्याकाळातील कामगारांनी रामप्रताप झंवर यांना भक्कम साथ दिल्याने वयाच्या ५० व्या वर्षी त्यांनी नव्या उमेदीने कामाला सुरुवात केली. आज ही त्यांच्या कंपनीमध्ये त्यांचे जुनी कामगार काम करत आहेत.

जे काही मिळवायचे ते तारुण्यातच मिळवायचे ही ‘म्हण’ रामप्रताप झंवर यांनी खोटी ठरवली. वयाच्या पन्नासाव्या वर्षी १९८५ साली त्यांनी शिरोली औद्योगिक वसाहतीमध्ये श्रीराम फाउंड्री प्रायव्हेट लिमिटेड या नावाने कंपनीची उभारणी केली. व्यवसायात मिळवलेला नावलौकिक ,मित्र परिवार, बँकेतील पत, व दिलदारपणा या भांडवलावर श्रीराम फाउंड्रीची सुरुवात झाली.त्यानंतर झंवर ग्रुप ऑफ कंपनीने आज पर्यंत कितीही संकटे आले तरी मागे वळून पाहिलेले नाही. श्रीराम फाउंड्री नंतर आष्टा लायनर्स प्रायव्हेट लिमिटेड, झंवर एक्सपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड, ईडी स्टील प्रायव्हेट लिमिटेड, आर.एस.झेड इंडस्ट्रीज, अलका इंडस्ट्रीज, निता इंडस्ट्रीज, ऍक्युरेट इंडस्ट्रीज, व कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील कस्तुरी इंडस्ट्रीज असे अनेक उद्योग त्यांच्या नावावर आहेत ते या सर्व उद्योगाचे चेअरमन म्हणून कार्यरत होते.

या सर्व कंपनीमध्ये टाटा, महिंद्रा एस्कॉर्ट या नामांकित कंपन्या बरोबर अमेरिका ,युरोप व इतर देशांमध्ये कास्टिंगची मोठ्या प्रमाणात निर्यात होत आहे. कास्टिंग फिनिशिंग बरोबर निर्यात सप्लाय या उद्योगांमध्ये १९८५ च्या प्रारंभी दर महिना ७० ते ८० टन कास्टिंग काढणाऱ्या झंवर ग्रुपने गरुड भरारी घेत सध्या सुमारे दहा हजार टन कास्टिंग तयार होत आहे. तीन मोठे फाउंड्री युनिट सुमारे बारा मशीन शॉप व अडीच ते तीन हजार कामगार असलेल्या झंवर उद्योगाची उलाढाल चारशे कोटी पर्यंत पोहचली आहे.

ज्येष्ठ उद्योजक रामप्रताप झंवर यांचे अनुभव अनेकांना मार्गदर्शक ठरले आहेत. भागीदारीत असलेला व्यवसाय संपुष्टात आल्यामुळे आपल्या जीवनाला व व्यवसायाला नवी कलाटणी मिळाली. अशा परिस्थितीत आपण धैर्याने तोंड दिले म्हणून यशस्वी झालो असल्याचेही रामप्रताप झंवर हे आपले अनुभव सांगत असत. त्यांनी शिरोली औद्योगिक वसाहत व आष्टा येथील कंपनीमध्ये श्री राम मंदिर उभारले आहे . तसेच कोल्हापुरात श्री लक्ष्मीनारायण मंदिराची उभारणी करताना अनेक धार्मिक व सामाजिक संस्थांना आर्थिक सहाय्य त्यांनी मोठ्या प्रमाणात केले आहे.
कोल्हापूर इंजिनियरिंग असोसिएशनचे अनेक वर्षे अध्यक्षपद भूषविणाऱ्या रामप्रताप जवळ यांना आज पर्यंत टाटा मोटर्स गुणवत्ता पुरस्कार, निर्यात पुरस्कार, फाय फाऊंडेशन पुरस्कार ,समाज भूषण आदी पुरस्कारांनी गौरवले आहे .तसेच ते फाउंड्री क्लस्टरचे सध्या चेअरमन म्हणून कार्यरत होते. उद्योगविश्वातील निरलस तपश्चर्या व अलौकीक कार्याबद्दल रामप्रताप झंवर यांना कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशन च्या वतीने उद्योग श्री पुरस्कार व मानपत्र देऊन गौरवले होते.

रामप्रताप झंवर यांच्या पश्चात पत्नी कस्तुरीबेन, मुलगा नरेंद्र, सून नीताबेन, नातू नीरज व रोहन, नातसूना जिया व अंकिता, पंतू असा मोठा परिवार आहे.

Related Stories

यड्राव येथे कारखान्याला आग​, दहा लाखाचे नुकसान

triratna

कोल्हापूर : रुग्णसंख्या वाढल्यास सीपीआरला मनुष्यबळाची कमतरता

triratna

सात वर्षांपूर्वीच्या मंजूर योजना अद्याप प्रलंबित का ?

triratna

संभाव्य महापुरासाठी कुरूंदवाड पालिका प्रशासन सज्ज

triratna

महे येथे विविध विकास कामांचा शुभारंभ

triratna

पन्हाळा : बंद बंगल्याचे कुलूप तोडून पावणे चार लाख रूपये लंपास

triratna
error: Content is protected !!