तरुण भारत

आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये दिवंगत विनू मंकड यांना स्थान

वृत्तसंस्था/ दुबई

आयसीसीच्या आगामी विश्व कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेतील 18 जून रोजी इंग्लंडमध्ये होणाऱया भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील अंतिम लढतीचे औचित्य साधून विविध देशांच्या दहा क्रिकेटपटूंचा हॉल ऑफ फेममध्ये समावेश करण्यात येणार आहे. कसोटी क्रिकेटमध्ये जागतिक स्तरावर योगदान देणाऱया या क्रिकेटपटूंमध्ये भारताचे माजी दिवंगत क्रिकेटपटू विनू मंकड यांचा समावेश करण्यात आला आहे.

Advertisements

कसोटी क्रिकेटच्या इतिहासामध्ये भरीव योगदान देणाऱया या दहा लिजेंड्सचा आयसीसीतर्फे गौरव केला जाणार आहे. आता आयसीसीच्या हॉल ऑफ फेममध्ये एकूण 103 क्रिकेटपटूंचा समावेश राहील. 18 जून रोजी साऊदम्पटन येथे भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या विश्व कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेतील अंतिम लढत होणार आहे. या लढतीवेळी आयसीसीने एक खास कार्यक्रम आयोजित केला असून या कार्यक्रमात निवडण्यात आलेल्या दहा क्रिकेटपटूंचा आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये समावेश करण्यात येणार आहे.

भारतीय कसोटी क्रिकेटच्या इतिहासात दिवंगत विनू मंकड हे जगातील एक महान अष्टपैलू म्हणून ओळखले जातात. विनू मंकड यांनी आपल्या क्रिकेट कारकीर्दीत 44 कसोटीत फलंदाजीत 31.47 धावांच्या सरासरीने 2109 धावा तर गोलंदाजीत 32.32 धावांच्या सरासरीने 162 बळी घेतले आहेत. तत्कालीन भारतीय कसोटी संघातील विनू मंकड हे सलामीचे फलंदाज तसेच डावखुरे फिरकी गोलंदाज होते. 1952 साली विनू मंकड यांनी इंग्लंडच्या लॉर्डस् मैदानावर दर्जेदार कामगिरी केली होती. विनू मंकड यांनी लॉर्डस्वरील या सामन्यात इंग्लंडविरूद्ध पहिल्या डावात 72 तर दुसऱया डावात 184 धावा झळकविल्या होत्या तसेच त्यांनी या सामन्यात 97 षटकांची गोलंदाजी केली होती. भारतीय क्रिकेट कसोटीच्या इतिहासात विनू मंकड यांनी आपल्या कसोटी कारकीर्दीत कोणत्याही क्रमांकावर फलंदाजी करण्याचा विक्रम केला असून अन्य दोन क्रिकेटपटूंनी असा विक्रम नोंदविला आहे. क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर विनू मंकड यांनी मुंबईत भारताचे माजी कर्णधार आणि आयसीसी हॉल ऑफ फेममधील सदस्य सुनील गावसकर यांना मार्गदर्शन केले होते.

भारतीय क्रिकेट क्षेत्रातील महान अष्टपैलू विनू मंकड हे प्रत्येक भारतीय क्रिकेटपटूंचा आदर्श ठरले आहेत. क्रिकेट क्षेत्रामध्ये स्वतःच्या कामगिरीवर विश्वास संपादन करण्याची लकब विनू मंकड यांच्या शैलीमध्ये दिसून येते. भारतीय क्रिकेट क्षेत्रातील अनेक नवोदितांचे ते आदर्श असल्याची प्रतिक्रिया सुनील गावसकर यांनी व्यक्त केली.

आयसीसीच्या हॉल ऑफ फेममध्ये समावेश करण्यात येणाऱया जागतिक क्रिकेट कसोटी क्षेत्रातील अन्य देशांच्या दहा क्रिकेटपटूंमध्ये दक्षिण आफ्रिकेचे ऑब्रे फॉकनर, ऑस्ट्रेलियाचे माँटी नोबेल (1918 पूर्वी), विंडीजचे सर लियेरी कॉन्स्टन्टाईन आणि ऑस्ट्रेलियाचे स्टँन मॅकेब (1918 ते 1945 च्या कालावधीत), इंग्लंडचे टेड डेक्स्टर आणि भारताचे विनू मंकड (1946 ते 1970 च्या कालावधीत), विंडीजचे डेस्माँड हेन्स आणि इंग्लंडचे बॉब विलीस (1971 ते 1995 च्या कालावधीत), झिंबाब्वेचे अँडी फलॉवर आणि लंकेचे कुमार संगकारा (1996 ते 2016) यांचा समावेश आहे.

लंकेचा कर्णधार आणि यष्टीरक्षक व फलंदाज कुमार संगकाराने क्रिकेटच्या आधुनिक कालावधीत दमदार कामगिरी करताना 134 कसोटीत 57.40 धावांच्या सरासरीने 12400 धावा तसेच यष्टीरक्षणात 182 झेल आणि 20 यष्टीचीत असा विक्रम केला आहे. विंडीजच्या हेन्सने कसोटी क्रिकेटमध्ये 116 कसोटीत 42.29 धावांच्या सरासरीने 7487 धावा जमविल्या तसेच विंडीजच्या कसोटी क्रिकेटमध्ये हेन्स आणि ग्रीनीज ही जगातील सर्वोत्तम सलामीची जोडी म्हणून ओळखली गेली. वनडे क्रिकेटमध्ये हेन्सने आयसीसीच्या चार विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आपला सहभाग दर्शविला. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज बॉब विलीसने 90 कसोटीत 25.20 धावांच्या सरासरीने 325 बळी नोंदविले आहेत. 1981 साली हेडिंग्ले येथे झालेल्या कसोटी सामन्यात बॉब विलीसने 43 धावांत 8 गडी बाद केल्याने इंग्लंडने ऑस्ट्रेलियाला पराभूत केले होते. इंग्लंडच्या अष्टपैलू टेड डेक्स्टर यांनी 62 कसोटीत 47.89 धावांच्या सरासरीने 4502 धावा जमविल्या तसेच गोलंदाजीत त्यांनी 66 बळी मिळविले. क्रिकेट क्षेत्रातून निवृत्त झाल्यानंतर डेक्स्टर हे इंग्लंडच्या निवड समितीचे प्रमुख म्हणून काही काळ कार्यरत होते. एमआरएफ टायर्स आयसीसी क्रिकेटपटू मानांकनाची पद्धत विकसित करण्यामध्ये डेक्स्टर यांचे योगदान महत्त्वाचे समजले जाते.

Related Stories

सर्बियाच्या जोकोव्हिचचा पराभव

Patil_p

राष्ट्रीय कुस्ती शिबिर ऑगस्टच्या पहिल्या आठवडय़ात

Patil_p

विंडीजचा लंकेवर मालिका विजय

Patil_p

अमेरिकेची केनिन उपांत्यपूर्व फेरीत

Patil_p

कॅमेरुन व्हॉईट निवृत्त

Patil_p

द.आफ्रिका लेजेंड्स उपांत्य फेरीत

Patil_p
error: Content is protected !!