तरुण भारत

कोविडच्या काळात कलाकारांकडे पूर्ण दुर्लक्ष : राजदीप नाईक

व्यावसायिक कलाकारांवर उपासमारीची पाळी

प्रतिनिधी / मडगाव

Advertisements

गोव्यात पुन्हा कोरोनाचे प्रमाण हळू हळू नियंत्रणात येत आहे. मात्र कोरोना महामारीच्या काळात कलाकारांचा विषय कोणीच गांभीर्याने घेतलेला नाही. त्यामुळे कलाकारांनाच, कलाकारांचा आवाज सरकार पर्यंत पोचवावा लागतो. काही प्रमाणात मगोचे नेते सुदिन ढवळीकर यांनी कलाकारांच्या विषयावर भाष्य केले होते. कलाकारांना सांभाळून घेण्याची मागणी त्यांनी केली होती. एकटे सुदिन ढवळीकर सोडले तर इतरांनी कलाकारांकडे दुर्लक्ष केले आहे. कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांनी तर कलाकारांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचे गोव्याचे आघाडीचे नाटय़कलाकार राजदीप नाईक यांनी म्हटले आहे.

सोशल मिडियाच्या माध्यमांतून राजदीप नाईक यांनी कलाकारांच्या व्यथा मांडताना म्हटले आहे की, गोव्यात सद्या कोरोना नियंत्रणात येत असला तरी गॅदरींग पुन्हा सुरू होणार की नाही याची कल्पना नाही. परंतु ज्या पद्धतीने नाटय़कलाकार असो किंवा तियात्र कलाकार असो, त्यांच्याशी निगडीत असलेले बँण्ड वादक, पार्श्वसंगीत, रंगमंच व वेशभूषा, प्रकाश योजना पाहणाऱयांवर सद्या उपासमारीची पाळी आलेली आहे. त्या संदर्भात ते कोणाशी बोलू शकत नाही किंवा काही मांगू शकत नाही.

नाटय़प्रयोग सुरू होईल की नाही सांगता येत नाही

सद्या जरी कोरोना नियंत्रणात येत असला तरी गोव्यात पुन्हा कधी नाटय़प्रयोग सुरू होईल यांची कोणतीच कल्पना नाही. नाटय़प्रयोग पुन्हा सुरू होण्यासाठी एक वर्ष जाईल की, दोन वर्षे हय़ाची शाश्वती नाही. तो पर्यंत कलाकारांनी काय करावे हे प्रश्न चिन्ह कलाकारांसमोर आहे.

गोव्यातील कलाकारांच्या व्यथा यापूर्वी दोन-तीन वेळा आपण सोशल मिडिया माध्यमांतून मांडल्या होत्या. जे कलाकार केवळ नाटक, तियात्र किंवा कलेवर आपली उपजीविका चालवितात, त्यांचा सरकारने विचार करावा. अनेकांना वाटत असेल की, नाटक सादर करणे म्हणजे हौस असेल आणि काही प्रमाणात त्यात तथ्य देखील आहे. गोव्यात अनेक हौशी कलाकार आहेत. स्पर्धेत नाटके सादर करणारे कलाकार आहेत. त्यांना या महामारीच्या काळात स्पर्धा झाली नाही किंवा हौशी नाटक सादर करता आले नाही तरी काही फरक पडत नाही.

मात्र, फरक पडतोय तो केवळ नाटक किंवा तियात्र सादरीकरणातून पोट भरणाऱया कलाकारांवर. ज्यांनी नाटक किंवा तियात्र हा व्यवसाय म्हणून ज्या कलाकारांनी स्वीकारला आहे त्यांना. मात्र, सरकारला किंवा या विषयाकडे निगडीत असलेल्यांना वाटत असेल की, या कलाकारांचा काही फायदा होत नसेल किंवा फरक पडत नसेल. तर हा गैरसमज त्यांनी कृपया दूर करावा. केवळ कलेवर अवलंबून असलेले कलाकार उपासमारीचा सामना करीत आहेत. फक्त ते बोलत नाही असे राजदीप नाईक यांनी म्हटले आहे.

फिल्मी निर्मिती योजनेचा सरकारला विसर

गोव्यात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आला. गोव्यात फिल्म कल्चर विकसित व्हावे म्हणून तत्कालिन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी गोवा मनोरंजन सोसायटीच्या वतीने योजना तयार केली. त्या योजनेमुळे गोव्यात अनेकांनी फिल्म निर्मिती केली. पण, दुर्दैवाची गोष्ट म्हणजे 2016 ही योजना शेवटची राबविण्यात आली. त्यानंतर झालेल्या फिल्माची फाईल नेमकी कुठे अडकली आहे त्याची कल्पना गोवा मनोरंजन सोसायटीची अध्यक्ष तथा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व उपाध्यक्ष सुभाष फळदेसाई तसेच फिल्मा संदर्भात निर्णय घेण्यासाठी स्थापन केलेल्या समिती यांना नसावी. या योजनेचे काय झाले व फाईल नेमकी कुठे अडकली याची चौकशी कुणीच केलेली नाही.

आत्ता सरकारची पाच वर्षे पूर्ण झालेली आहे व निवडणुका जवळ आलेल्या आहेत. गोव्यात फिल्म कल्चर विकसित व्हावे म्हणून सुरू केलेल्या योजनेचे काय झाले, ज्यांनी फिल्म निर्मिती केली ते फिल्म निर्माते व फिल्मांनी अभिनय केलेले कलाकार काय करतात, कसे आहेत, त्यांची नेमकी स्थिती कशी आहे याची विचारपूस सुद्धा कोणी करत नाही. मात्र, गोव्याबाहेरील कलाकारांबद्दल पुळका का  येतो ? गोव्यातील कलाकारांची किंमत सरकारला कळत नाही का ? असा सवालही राजदीप नाईक यांनी उपस्थितीत केलाय.

कलाकारांना रियेक्ट होण्याची संधी देऊ नका गेल्या पाच वर्षात सरकारने एक-दोन चित्रपट महोत्सव सोडले तर सरकारने फिल्मांसाठी काहीच केलेले नाही. आत्ता तर निवडणुकीला केवळ सहा महिने शिल्लक राहिलेले आहेत. सरकारने निदान आत्ता तरी कलाकारांचा विचार करावा आणि जर विचार केला नाहीच तर निवडणुकीच्या काळात कलाकारांना ‘रियेक्ट’ व्हावे लागेल. मात्र, ती पाळी कलाकारांवर आणू नये. केंद्र सरकारकडून, राज्य सरकारला 300 कोटी रूपये मिळाले आहेत. त्यांतून कलाकारांना न्याय द्यावा, कारण कलाकारांनी आपल्या आयुष्यांची कमाई फिल्मांत गुंतवणूक केलेली आहे. केवळ फिल्म निर्मिती योजनेचा लाभ मिळणार या आशेने. मात्र, या आशेवर पाणी टाकू नका अशी विनंती राजदीप नाईक यांनी हात जोडून केली आहे. 

Related Stories

आमदार नीळकंठ हळर्णकर यांचा वाढदिवस साध्या पद्धतीने

Amit Kulkarni

बेंगलोरचे खराब प्रदर्शन; आता ईस्ट बंगालकडून झाले पराभूत

Patil_p

जीसीईटी परीक्षा आता 27, 28 जुलै रोजी

Amit Kulkarni

उत्तर गोव्यात कोविड हॉस्पिटल सुरु करा

Patil_p

वास्कोत वादळी वाऱयात माड व झाड कोसळले, वीज पुरवठाही खंडित

Omkar B

फोंडय़ात परप्रांतीय मासे विक्रेत्यांनी उडविला लॉकडाऊनचा फज्जा

Amit Kulkarni
error: Content is protected !!