तरुण भारत

दूध पिणारा गणपती

दोन दशकांहून अधिक काळ लोटला. नोकरीत होतो आणि प्रशासकीय प्रशिक्षणासाठी सांताक्रूजच्या टेनिंग सेंटरला होतो. शेवटचा तास चार वाजता संपला आणि आम्ही कॅण्टीनमध्ये चहासाठी गेलो तेव्हा कोणीतरी बातमी आणली की गणपतीने दूध प्यायला सुरुवात केली आहे. आधी नीट समजले नाही. मग त्या भल्या गृहस्थाने खुलासा केला की चमच्यात दूध घेऊन गणपतीच्या सोंडेला लावलं की ते गायब होतं. देशभर हा प्रकार चालू आहे. आम्ही सगळे रस्त्यावर आलो. सेंटरसमोर पदपथावर एक देऊळ होतं. गणपतीला दूध पाजण्यासाठी भक्तांची रांग लागली होती. मी रांगेत उभा राहिलो. माझा नंबर आला. मी आत गेलो. तिथला पुजारी पातेलं आणि चमचा घेऊन बसला होता. त्याने दुधाने भरलेला चमचा पुढे केला आणि पाच रुपये मागितले. माझ्याकडे पैसे नव्हते. मी बाहेर आलो. पण लोक रांगेने पाच पाच रुपये देऊन दूध पाजत होते. थोडय़ा वेळाने मुख्यमंत्र्यांचे निवेदन आले की त्यांच्या घरातला गणपतीदेखील दूध प्राशन करतो आहे. दुसऱया दिवशी वृत्तपत्रांनीदेखील तोच मथळा दिला होता. त्यावेळी समाज माध्यमे नव्हती. नाहीतर याला आणखीन प्रसिद्धी मिळाली असती. यथावकाश याची शास्त्रीय कारणमीमांसा प्रकाशित झाली आणि ही अफवा थांबली.   

गेल्या आठवडय़ात अशीच अफवा उठली की एका इसमाने कोरोनावरची लस घेतली आणि तो चुंबक-पुरुष बनला. लोखंडाच्या वस्तू त्याच्या शरीराला चिकटू लागल्या. त्याची चित्रफीत प्रकाशित झाली. ती मात्र मजेदार होती. त्याच्या शरीराला स्वयपाकघरातली भांडी आणि काही नाणी चिकटली होती. समाज माध्यमांवर या सर्वाची इतकी खिल्ली उडवली गेली की अफवा चोवीस तास देखील जगली नाही!

Advertisements

आमचा बालमित्र नागजंपी ऊर्फ नाग्याला ती अफवा असल्याचं फार दुःख झालं. तो म्हणाला, “ते खरं असतं तर मजा आलं असतं रे. प्रवास करताना पोलिसांना लसीकरणाच्या सर्टिफिकेटऐवजी अंगाला चिकटलेलं लोखंडाचं तुकडा दाखवलं असतं.’’

“आणखीन एक फायदा झाला असता,’’ मी म्हणालो, “आपण हात केल्यावर रिक्षाचालक थांबत नाहीत. पण लस घेतल्यावर आपण रिक्षाला हात केल्यावर ती आपल्याकडे ओढली गेली असती. मग त्याला आपोआप थांबावं लागलं असतं.’’

नाग्या माझ्याकडं बघतच राहिला!

Related Stories

पाणिग्रहण मूळमाधवो

Patil_p

पावसाचा धडा

Patil_p

नववा गुरु ‘अजगर’

Patil_p

कृषी उत्पादनाशी संबंधित प्रोत्साहन

Patil_p

आजोबा, जरा जपून

Patil_p

अमेरिका-चीन संघर्ष तीव्र होणार

Patil_p
error: Content is protected !!