तरुण भारत

सावर्डे मतदार संघात भाजपाच्या उमेदवारीसाठी चौघे दावेदार

उमेश नाईक / धारबांदोडा

अपेक्षेप्रमाणे काम न केल्यास पाच वर्षे मूक गिळून गप्प बसणे व निवडणुकीच्यावेळी दारात आल्यावर उमेदवारांना जाब विचारणे हे सावर्डे मतदारसंघातील मतदारराजाचे वैशिष्ठ व ओळख आहे. अशा या मतदारसंघात येत्या सन 2022 च्या विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांनी मतदारांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे. अशातच  सत्ताधारी भाजपच्या उमेदवारीसाठी चार दावेदार आहेत.

Advertisements

 सध्या भाजपातर्फे स्थानिक आमदार तथा बांधकाममंत्री दीपक पाऊसकर प्रमुख दावेदार आहेत. याशिवाय माजी आमदार गणेश गावकर, साकोर्डाचे माजी सरपंच शिरीष देसाई हे अन्य दावेदार असून राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर हेही अप्रत्यक्षरीत्या सावर्डेच्या उमेदवारीवर दावा करतात, ही वस्तुस्थिती आहे.

धारबांदोडा पंचायतीचे माजी सरपंच व विद्यमान पंच सदस्य विनायक गांवस व वीज खात्याचे साहाय्यक अभियंते अनिल गांवकर हे अन्य पक्षांच्या उमेदवारीसाठी प्रयत्नशील आहेत. सध्या या सर्व उमेदवारांनी मतदारांच्या गाठीभेटी व चाचपणी सुरु केले आहे.

बांधकाममंत्री दीपक पाऊसकर हे सन 2017 सालच्या निवडणुकीत मगो पक्षातर्फे निवडून आले होते. त्यानंतर दोन वर्षांत त्यांनी भाजपात प्रवेश केला व त्यांना मंत्रीमंडळात महत्त्वाचे खाते मिळाले. त्यात विनय तेंडुलकर यांची महत्त्वाची भूमिका होती. परंपरेनुसार एखादा आमदार पक्ष त्याग करून सत्ताधारी पक्षात आल्यास तोच पुढील निवडणुकीत उमेदवारीचा प्रथम दावेदार असतो. या तत्त्वानुसार सध्या दीपक पाऊसकर हे निर्धास्त आहेत. सार्वजनिक बांधकाम सारखे महत्त्वाचे खाते मिळाल्यानंतर त्यांनी सावर्डे मतदारसंघात अनेक विकासकामे मार्गी लावली. त्यात रस्ते व पिण्याच्या पाण्याचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. मात्र मतदारांकडून सरकारी नोकऱया व रोजगारासंबंधी त्यांच्याकडून मोठय़ा अपेक्षा आहेत. रोजगाराची समस्या काही अंशी निकाली काढल्यास त्यांना त्याचा फायदा होऊ शकतो. मात्र त्यांना भाजपात आणण्यासाठी महत्त्वाची भूमिका बाजावणारे खासदार विनय तेंडुलकर स्थानिक राजकारणात येण्याचा विचार करीत आहेत.  त्यांचा कल सावर्डे मतदारसंघाकडे असल्याचे बोलले जात आहे. पाऊसकर हे अत्यंत संयमी व शांत स्वभावाचे असून ते सहसा कुठल्याच गोष्टीवर भाष्य करीत नाहीत. राजकारणात एखादी गोष्ट मिळविण्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागला नाही हेही तेवढेच खरे आहे. तेंडुलकरांनी केलेल्या उपकाराचे ओझे ते मित्रत्त्वायच्या भावनेने निभावतील की, वेगळा विचार करतील हे येणाऱया काळात स्पष्ट होईल. जर विनय तेंडुलकर यांना सावर्डेत उमेदवारी निश्चित होत असल्यास पाऊसकर निवडणूक लढविणार नाहीत, असाही एक मतप्रवाह आहे.

सध्या राज्यसभा खासदार असलेल्या तेंडुलकर यांनी सावर्डे मतदारसंघाचे माजी आमदार व मंत्रीपदही भूषविले आहे. सध्या ते स्थानिक राजकारणात येऊ इच्छितात. पक्षाने उमेदवारी दिल्यास गोव्यातील कोणत्याही मतदारसंघात लढण्याची आपली तयारी आहे, असे ते सांगत असले तरी प्रत्यक्षात सावर्डे मतदारसंघासाठीच त्यांचा दावा आहे. गेल्या सहा महिन्यात त्यांनी सावर्डे मतदारसंघात निवडणूकपूर्व चाचपणी व कार्यकर्त्यांच्या गाठीभेटीही सुरु केलेल्या आहेत. या भागात त्यांचे अनेक चाहतेही आहेत.

माजी आमदार गणेश गांवकर हे सध्या अन्य एक भाजपा उमेदवारीचे दावेदार आहेत. सावर्डेतून उमेदवारी न मिळाल्यास पक्ष देईल त्या उमेदवारासाठी काम करण्याची आपली तयारी आहे, असे ते सांगतात. मात्र प्रत्यक्षात त्यांचे डावपेच वेगळेच असू शकतात. गणेश गावकर हे अत्यंत धूर्त व अभ्यासू राजकारणी मानले जातात. सावर्डे मतदारसंघात आजही त्यांची स्वतःची वोटबँक आहे. त्यामुळे त्यांना भाजपाची उमेदवारी न मिळाल्यास ते पक्षासोबत राहतील की वेगळा विचार करतील हे प्रत्यक्षात उमेदवारी जाहीर झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे. सावर्डे मतदारसंघात त्यांचा असलेला प्रभाव पाहिल्यास राजकीय समीकरणे बदलू शकतील, असे संकेत मिळतात.

महत्त्वाचे म्हणजे 2017 सालच्या निवडणुकीत केवळ गणेश गांवकर यांना विरोध करण्यासाठी व विनय तेंडुलकर यांना पुढे आणण्यासाठी सावर्डे प्रोगेसिव्ह प्रंटची स्थापना झाली होती. तेंडुलकर यांना उमेदवारी न मिळाल्यामुळे या प्रंटचे सदस्य दीपक पाऊसकर यांना या प्रंटने साथ दिली होती. येणाऱया 2022 च्या निवडणुकीत पुन्हा विनय तेंडुलकर हे इच्छुक आहेत. शिवाय दीपक पाऊसकर हे मुख्य दावेदार आहेत. यातच प्रंटचे सदस्य विनायक गांवस हे निवडणुकीत उतरणार आहेत. या नवीन समिकरणापुढे प्रंटचे भवितव्य पणाला लागणार आहे.

 धारबांदोडय़ाचे माजी सरपंच व विद्यमान पंचसदस्य विनायक उर्फ बालाजी गांवस हे मगो पक्षाच्या उमेदवारीसाठी इच्छुक होते. पक्षाने अगोदरच आपली उमेदवारी जाहीर करावी अशी त्यांची अट होती. तसे होत नसल्याने ते गोवा फोरवर्डच्या संपर्कात आहेत. शिवाय इतर पक्षाकडूनही त्यांना ऑफर असल्याचे समजते. मात्र अमुक एका पक्षाकडून आपण निवडणूक लढविणार असे त्यांनी अद्याप जाहीर केलेले नाही. निवडणूक लढविण्याचे त्यांनी निश्चित केले आहे. नवीन चेहरा, नेतृत्वातील धडाडी म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे. सध्या सावर्डे मतदार संघात त्यांच्या नावाची चर्चा आहे. निवडणूक पूर्व चाचपणी व मतदारांच्या गाठीभेटी घेण्यास त्यांनी सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे गेली 18 वर्षे ते धारबांदोडा पंचायतीच्या राजकारणात सक्रीय आहेत. या कालावधीत पंचायत राजकारणात त्यांनी आमदार किंवा मंत्र्यांना हस्तक्षेप करू दिलेला नाही. त्यामुळे त्यांच्या कारकिर्दीत एकदाही सरपंच किंवा उपसरपंचांवर अविश्वास ठराव दाखल होण्याची वेळ आलेली नाही.

अनिल गांवकर हे अन्य एक इच्छुक उमेदवार आहेत. वीज खात्यात अभियंते असलेल्या गावकर यांनी गेल्या अनेक वर्षात सावर्डे मतदारसंघातील राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. उच्च शिक्षित असल्याने अनेक सुशिक्षित तरुणांशी त्यांचा जवळचा संबंध आहे. ते अनुसूचित जाती जमातीचे असल्याने इतर उमेदवारांवर प्रभाव पाडू शकतात. कोणत्या पक्षातर्फे ते निवडणूक लढविणार ते अद्याप जाहीर केलेले नाही. साकोर्डेचे माजी सरपंच शिरीष देसाई हेही नवीन चेहरा म्हणून भाजपाच्या उमेदवारीसाठी दावा करणार आहेत. मात्र त्यांच्या या दाव्याला पक्ष किती प्रतिसाद देईल यावर त्यांचे राजकीय भवितव्य अवलंबून आहे.

भाजपाने युतीची दारे खुली ठेवली असल्याने कदाचित मगो पक्षाशी युती झाल्यास त्याचा परिणाम इतर उमेदवारांवर होणार आहे. तसे झाल्यास राजकारणातील समीकरणे बदलणार असून इच्छुक उमेदवारांनाही अन्य पर्याय शोधावे लागतील. सावर्डे मतदारसंघाच्या इतिहासात एकवेळा अपक्ष उमेदवार सोडल्यास आजवर भाजपा व मगो या दोनच पक्षांना मतदारांनी कौल दिलेला आहे.

Related Stories

पणजी संस्कृती भवनमध्ये आज ‘लग्नफेरे’

Amit Kulkarni

कर्नाटकी चोरटय़ास मुद्देमालासह हणजुण पोलिसांकडून अटक

Amit Kulkarni

मास्क न वापरणाऱया मुख्यमंत्र्यांनाही अटक करावी

Omkar B

गोवा बागायतदारचे व्यवस्थापक दत्तप्रसाद पटवर्धनना अपघाती मृत्यू

Omkar B

चावडीवरील हातगाडेवाल्यांचा उघडय़ावरच व्यवहार

Amit Kulkarni

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाचे प्रफुल्ल पटेल यांच्याहस्ते उद्घाटन

Patil_p
error: Content is protected !!