तरुण भारत

तरी असेल गीत हे…

आज ‘आहे’ रे आणि उद्या ‘नाही’ रे वर सध्या आपली सर्वांचीच आयुष्ये झुलत आहेत. माझ्यापर्यंत हे आजाराचे संकट येऊन कोसळलेले नाही म्हणून घरात बसणाऱया प्रत्येकाला मनातून माहीत असते की मी कधीही या गटातून बाहेर जाऊन त्या गटात असू शकतो. आणि जेव्हा निदान पॉझिटिव्ह असे होते आणि एरवी अत्यंत होकारात्मक असणारा हा ऊर्जादायी शब्द एखाद्याचे रूपांतर रुग्णामध्ये करतो तेव्हा ताबडतोब त्याचे विलगीकरण केले जाते. या सक्तीच्या एकांतवासात प्रवेश झाल्यावर मग बऱयाच गोष्टी नव्याने लक्षात यायला लागतात. आपण खरंच यातून बाहेर पडू का? नाहीच पडू शकलो तर आपल्या मागे आपल्या कुटुंबातील सदस्यांचे काय होईल? कसे होईल? आपल्या चिमुकल्या बाळाला कोण बघेल? वयस्कर आई-वडील, सासू सासरे यांना आधार कोण देईल? आणि एक वास्तव समोर येते. कितीतरी सुप्रसिद्ध कलाकार या कोरोनाने नेले. कितीतरी अभ्यासक, संशोधक, शिक्षक, डॉक्टर अगदी सगळय़ा क्षेत्रातले लोक या वरवंटय़ाखाली आले. आणि त्यांच्या पाठी काय हाहाकार उडाला आहे तेही आपण पाहतो आहोत. पण मी जाता राहील कार्य काय या भा. रा. तांब्यांच्या एका गीतातील ओळी आठवल्याशिवाय राहत नाहीत. सूर्य उगवायचा थांबत नाही की चंद्र मावळायला विसरत नाहीत. ऋतुचक्र फिरत जाते, जग पुढे पुढे जात राहते. अमुक एक व्यक्ती नाही म्हणून कुणीच नाही थांबत. डोळे भरून पाहिलेले हे सुंदर जग आपल्याशिवायही तसेच चालते हे त्या मृतात्म्याने पचवावे आणि आपल्या गतीने पंचत्त्वात विलीन व्हायला निघून जावे म्हणून तर दिवसकार्याची संकल्पना नसेल आली?

सगेसोयरे डोळे पुसतील,उठुनि आपुल्या कामी लागतील  उठतिल बसतिल हसुनि खिदळतिल मी जाता त्यांचे काय जाय? असे भा. रा. तांब्यांनी उगीच नाही म्हटले. त्यामुळे शेवटच्या कडव्यातले त्यांचे उद्गार अशा जगास्तव काय कुढावे? मोही कुणाच्या का गुंतावे? हे निश्चितच अंतर्मुख करून जातात. मग समोर दिसणारे प्रत्येक दृश्य अधाशासारखे डोळय़ात साठवत सुटावे असे वाटते. न जाणो उद्या पहायला मिळेल न मिळेल. आपल्याशिवायचे जग आपल्याला पचत नाही कारण आपल्याशिवायही ते चालूच राहणार आणि आपण एकटेच कुठल्यातरी तिसऱयाच मितीत जाणार याची केवढी तरी भीती असते. त्यामुळे ‘मेलो तर सुटेन रे देवा’ म्हणणाऱयांना मृत्यूची एक झलक जरी दिसली तर, सुटकेलाही मन घाबरते  जो आला तो रमला..अशी त्यांची अवस्था होते. ज्यांच्या आयुष्याला एक निश्चित ध्येय असते आणि जे मनाचे स्थिर, पक्के म्हटले जातात त्यांनी ठरवलेलेच असते. ‘गाता गाता जाईन मी’ आणि ‘गेल्यावरही या गगनातील गीतांमधुनी राहिन मी’ पण अशाच एखाद्या विचित्र परिस्थितीत जेव्हा मृत्यूशी हुतुतू खेळायची वेळ त्या माणसांवर येते तेव्हा त्यांचा मोठा कस लागतो. ज्या लोकांनी खरोखरच आयुष्य मनापासून वाहून टाकलेले असते त्यांची चलबिचल होत नाही. जर त्यातून ते कालांतराने बाहेर आले तर धीरोदात्तपणाची एक नवीन झळाळी त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर चढते आणि नाही बाहेर पडले तरीही शेवटपर्यंत आपल्या ध्येयाशी प्रामाणिक राहणारे म्हणून त्यांची कीर्ति वाढतेच वाढते. पण अगदी ध्येयवादी किंवा कलाप्रेमी, कलाकार कुणीही असो, जर माणूस म्हणून त्याची धीराची बैठक पक्की नसेल तर मात्र उलटसुलट विचारांनी ती व्यक्ती हैराण होऊन जाते. ते स्वाभाविकही आहे म्हणा! पण हा सगळा आपुलाचि वाद आपणांसी घालत बसताना आपल्याला खूप काही गोष्टी नव्याने कळतात. आजपर्यंत जी गाणी, जे साहित्य शब्दांचे बुडबुडे म्हणून वाचून सोडून दिलेले असते त्यातले वास्तव येऊन धडका देऊन जात असते. या अफाट, विशाल जगात माणूस म्हणजे किती नगण्य जीव आहे. माणसाला कळायचे राहिलेले विश्व किती अथांग आहे याची जाणीव होते. अशा कसोटीच्या क्षणी माणूस आपोआपच स्वतःकडे आणि स्वतः मिळवलेले यश, संपत्ती, कीर्ती आदींकडे त्रयस्थपणे पहायला शिकत असावा. कितीही प्रशस्त घर असले तरी ते सोडून विलगीकरणात रहायची वेळ आल्यावर गृहेषु अतिथिवत् वसेत् चा खरा अर्थ कळत असेल. स्वतःच्या घरात आपण माझे माझे म्हणत राहतो ते कितीसे आपले असते हेही या निमित्ताने कळते. कलाकार मंडळींचा हेवा अशासाठी वाटतो की हे सगळे कळण्यासाठी त्यांना ‘कोरोना’ची गरज नसते. तालासुरांशी दोस्ती जमवायला सुरुवात केल्यापासूनच हे कळण्याची सोय झालेली असते.

Advertisements

पु. ल. देशपांडे म्हणून गेले आहेत की एखाद्या माणसाशी आपले का जमावे आणि एखाद्याशी का जमू नये याला काही गणित नाही आणि सगळय़ात वाईट जर काही असेल तर ज्या व्यक्तींसाठी माणूस जीव टाकतो त्यांना ते माहीत असून आणि चाहत्याच्या भावनेचा आदर करणे शक्मय असूनदेखील त्यांनी प्रतिसाद देण्यात कोताई करणे. या चिंतयामि सततं मयि सा विरक्ताः याचे दुःख किती भयंकर असते ते त्या जीव लावणाऱयालाच माहीत असते. अशावेळी या भावनेच्या उडालेल्या ठिकऱया गोळा करणे किती जड जात असेल? मानसशास्त्र म्हणते की इथे एक संरक्षण यंत्रणा वापरली जाते. तिचे नाव उदात्तीकरण. आपल्या सर्व अशा भावभावनांना जर कलेच्या रूपात उतरवले तर प्रत्येक कडू भावना ही रसिकांच्या समोर गोड होऊन जाते. सादरकर्ते निघून जातात पण त्यांनी सादर केलेली कला चिरंजीव होते. वेदना, आक्रोश हेही जेव्हा नाटक फिल्म गाणी यातून दाखवले जातात तेव्हा पाहणाऱयांच्या मनावर त्याचा होणारा परिणाम दीर्घकाळ टिकून राहतो. जेव्हा कुठेतरी काहीतरी संपून जात असते, विरह घडत असतो, काहीतरी तुटत असते, कुणीतरी नाहीसे होऊन जात असते. तेव्हाच एखादी अजरामर कलाकृती जन्माला येण्याचीही ती तयारी असू शकते. प्रश्न एवढाच असतो की जो भोगतो त्याने रडत रडत संपून जायचे की काळावर कलाकृतीची लेणी घडवायची? घडवण्याचा प्रयत्न केला तर दुःख विसरता येते आणि गोव्याच्या कवयित्री राधा भावे म्हणतात तसे    दुःखालाही चिमटीमध्ये धरता येते.

 आणिक त्याचे फूलपाखरू करता येते.

 सध्याच्या अशा या अनिश्चिततेच्या काळात, उद्याची चिंता असतानाही माणसे जगत आहेत. आयुष्यात रंग भरत आहेत. खडक भेदून अंकुरासारखी फुटत आहेत. अक्षरशः रस्त्यावरच्या जगण्यालाही फुले धरत आहेत. नाकारावे तरी कसे? महायुद्धाच्या छायेतली माणसे कशी जगत होती असतील याचा अनुभव सध्या सगळेजण घेत आहेत. कारण भोवतालची परिस्थिती ही एखाद्या जैविक युद्धापेक्षा वेगळी नाही. हजारो लाखो कोविड योद्धे जीवावर उदार होऊन आपले काम पार पाडत आहेत. अशावेळी आयुष्यातल्या वैयक्तिक दुःखाच्या डागण्या रुग्णांनी स्वतःला देत राहू नये म्हणून हा प्रपंच! आयुष्य हे सुंदर आहेच पण ते क्षणभंगुरतेचा शापही घेऊन येते. अशावेळी आपण शांताबाई शेळकेंना आठवावे. त्या जे म्हणून गेल्या ते शंभर टक्के खरे आहे. त्या आपली वेळ आल्यावर निघून गेल्या पण त्यांनी म्हटल्याप्रमाणे त्यांची गीते उरली आहेत.

स्वयें मनात जागते न सूरताल मागते

 अबोल राहुनी स्वतः अबोध सर्व सांगते

उन्हे जळात हालती तिथे दिसेल गीत हे

असेन मी नसेन मी तरी असेल गीत हे.

   ऍड. अपर्णा परांजपे  ः 8208606579

Related Stories

महाराष्ट्रातील संकटग्रस्त खासगी वनक्षेत्र

Amit Kulkarni

ब्रह्मसायुज्य

Patil_p

शांततेच्या दिशेने…

Patil_p

या श्रमिकांनो, परत फिरा रे।।।…

Patil_p

पुढती परतोनि न पाहे मागें

Patil_p

कोरोनाच्या जनुकीय बदलाचे आव्हान

Patil_p
error: Content is protected !!