तरुण भारत

नोकर भरतीवरील बंदी उठवली

माजी मुख्यमंत्री पार्सेकरांनी घातली होती बंदी नोकरभरती बंदीमुळे रिक्त पदांच्या संख्येत भर

प्रतिनिधी / पणजी

Advertisements

राज्य सरकारने नोकरभरतीवरील बंदी उठवली असून त्या संदर्भातील आदेश जारी करण्यात आला आहे. त्यामुळे नोकर भरती करण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. विधानसभा निवडणुकीवर डोळा ठेवून सदर बंदी हटविल्याची चर्चा सुरु आहे.

या अगोदर 5 वर्षापूर्वी म्हणजे नोव्हेंबर 2016 मध्ये माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या सरकारने ही बंदी घातली होती. त्यामुळे मागील 5 वर्षे तशी फारशी मोठी नोकरभरती झाली नाही. तथापि आता विधानसभा निवडणूक जवळ येऊन ठेपल्याने नोकरभरती ठरवून त्याचा लाभ निवडणुकीत मिळवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.

गेली पाच वर्षे होती बंदी

सर्व सरकारी खाती, अनुदानित संस्था, स्वायत्त संस्था, महामंडळे, पीएसयू अशा सर्व क्षेत्रातील नोकरभरती गेली सुमारे 5 वर्षे बंद होती. त्या काळात अनेक खात्यातील अनेक कर्मचारी, अधिकारी निवृत्त झाले व पदे रिकामी राहिली. परंतु बंदी असल्याने भरती करण्यात आली नाही. काहीजणांना पदोन्नती मिळाली तरी देखील अनेक पदे अजूनही तशीच रिकामी आहेत. अनेक खात्यांमध्ये अनेक पदांवर माणसे नसल्यामुळे अनेक कामे प्रलंबित आहेत, तर काही अधिकाऱयांना दोन तीन पदांचा अतिरिक्त कार्यभार देऊन प्रशासन चालवले जात असल्याचे समोर आले आहे.

पगार खर्च नियंत्रणासाठी होती बंदी

सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी सर्व सरकारी कर्मचारी, अधिकारी व इतरांना लागू करण्यासाठी ती बंदी घालण्यात आली होती. नोकरभरती चालूच ठेवली असती तर सातव्या आयोगानुसार पगाराचा सर्व खर्च भरमसाठ वाढणार होता. तो मर्यादित ठेवण्यासाठी बंदी घालण्यात आली होती. त्या बंदीचा फेरविचार करणार म्हणून अनेकदा सांगण्यात आले खरे, परंतु प्रत्यक्षात त्याचा फेरविचार नंतर झालाच नाही.

नोव्हेंबर 2016 पासून नोकरभरती बंद

नोव्हेंबर 2016 मध्ये लागू करण्यात आलेला नोकरभरती बंदीचा आदेश मागे घेण्यात आल्याचे नवीन आदेशात नमूद करण्यात आले आहे. तसेच बंदी उठवण्याची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने होणार आहे. एकंदरीत परिस्थिती व आढावा लक्षात घेऊन सदर बंदी उठवण्यात आल्याचे आदेशात म्हटले आहे.

आता परीक्षा, मुलखती सुरु होणार

मध्यंतरीच्या काळात अनेक जागांसाठी जाहिराती देण्यात आल्या, तेव्हा अनेक ठिकाणी अर्ज सादर करण्यासाठी मोठी गर्दी उसळली. अर्ज घेऊन ते फाईलबंद करण्यात आले, परंतु पुढील कार्यवाही काहीच झाली नाही. आता त्यासाठी परीक्षा, मुलाखती सुरू होणार असल्याचे सरकारी सुत्रांनी सांगितले.

येत्या काही महिन्यात कार्यवाही सुरू

शिक्षण, आरोग्य व इतर काही प्रमुख खात्यांमध्ये मोठय़ा प्रमाणात जागा खाली असून त्यांची भरती न झाल्यामुळे त्याचे विपरित परिणाम खात्याच्या कारभारावर दिसून आले आहेत. त्याचा फटका खात्याच्या कार्यक्षमतेला बसल्याचे समोर आल्याने शेवटी सरकारने हा बंदी उठवण्याचा निर्णय घेतल्याचे सुत्रांनी नमूद केले. या नोकरभरतीचा जास्तीतजास्त फायदा घेण्यासाठी सत्ताधारी पक्ष, व सरकार सज्ज झाले असून येत्या काही महिन्यात त्याची कार्यवाही सुरू हाईल, अशी माहिती सुत्रांनी दिली.

Related Stories

सृष्टी निर्माता ब्रह्मदेवाचा आज ब्रह्मकरमळीत ब्रह्मोत्सव

Patil_p

मोदींच्या नेतृत्वाखाली भारताची कृषिक्षेत्रात प्रगती

Amit Kulkarni

राज्यात पाऊस पुन्हा सक्रीय

Patil_p

मुख्यमंत्र्यांनी केली करासवाडा मुख्य पाईपलाईन, रस्त्याची पाहणी

Amit Kulkarni

बेकायदेशीर घरांचीही होणार कर वसुली

Omkar B

चर्चिलची अग्रस्थानावरील आघाडी चार गुणांची

Amit Kulkarni
error: Content is protected !!