तरुण भारत

पुन्हा अब्रूचे धिंडवडे

घटना उत्तर प्रदेशच्या गाझियाबाद जिल्हय़ातील आहे. तशी नवी किंवा फार महत्त्वाची आहे असे नव्हे. तथापि, ही घटना आणि तिच्यावर उमटलेल्या प्रतिक्रिया अनेकांचे वैचारिक आणि तात्विक पितळ उघडे पाडणारी आहे. त्यामुळे या घटनेचे आणि तिच्या परिणामांचे विश्लेषण महत्त्वाचे ठरते. झाले होते असे की, 5 जून 2021 या दिवशी उत्तर प्रदेश राज्यातल्या गाझियाबाद जिल्हय़ातील लोनी या गावी अब्दुल समद सुफी नामक एका प्रौढ मुस्लीम व्यक्तीला चार पाच लोकांकडून मारहाण करण्यात आली. त्याची दाढी कापण्यात आली. या घटनेचा व्हीडिओ काढण्यात आला आणि तो सोशल मीडियावरून प्रसारित करण्यात आला. प्रसारित करताना एक युक्ती करण्यात आली. व्हीडिओचा आवाज बंद (म्यूट) करण्यात आला. या मुस्लीम व्यक्तीवर काही हिंदूंनी ‘जय श्रीराम’ म्हणण्याची सक्ती केली. त्याने नकार दिल्यानंतर त्याला अशी मारहाण करण्यात आली, असे या घटनेचे रसभरीत वर्णन करण्यात आले. त्यामुळे अशा प्रसंगांच्या शोधात असणाऱया तथाकथित पुरोगाम्यांचे आणि विचारवंतांचे चांगलेच फावले. त्यांनी या घटनेला (त्यांच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे) फुगव फुगव फुगवले. पहा, कसा अल्पसंख्याकांवर अन्याय होत आहे, पहा कसा रामाच्या नावाने त्यांच्यावर अत्याचार होत आहे, अशा अनेक टिप्पण्या करण्यात आल्या. पुरोगामी विचारसरणीशी संलग्नता सांगणाऱया वेबसाईट्स आणि वाहिन्यांनी या घटनेला वारेमाप प्रसिद्धी देऊन हिंदूधर्म, प्रभू रामचंद्र आणि हिंदुत्ववादी संघटना यांच्या विरोधातील आपला वैचारिक कंडू शमवून घेतला. काही सिलिब्रिटीजनी तर ‘हिंदू म्हणून जन्माला आल्याची लाज वाटते’ अशा पठडीबाज प्रतिक्रिया देऊन टाकल्या. कोण अधिक धर्मनिरपेक्ष हे सिद्ध करण्याची जणू त्यांच्यात स्पर्धाच लागली. पण म्हणतात ना, असत्य फार वेगाने पसरते, पण त्याचे आयुष्य थोडे असते. याचे प्रत्यंतर पुढील काही दिवसातच आले. गाझियाबाद पोलिसांनी याच व्हीडिओच्या आधारे 9 जणांवर गुन्हा दाखल केला. यापैकी चार जणांना आतापर्यंत अटक झाली आहे. पण तथाकथित पुरोगाम्यांच्या दुर्दैवाने अटक करण्यात आलेले चारही जण मुस्लीमच आहेत. व्हीडिओत मारहाण करताना जी माणसे दिसतात तीच अटक केलेली माणसे असल्याने भाजपच्या पोलिसांनी मुद्दामच मुस्लीमांना अटक केली असा कांगावा करण्याची सोय पुरोगाम्यांसाठी उरली नाही. अजूनही पाच जणांच्या शोधात पोलीस आहेत आणि त्यांना लवकरच अटक होण्याची शक्यता आहे. मग मुस्लीमांनीच एका प्रौढ मुस्लीमाला मारहाण करण्याचे कारण काय? आतापर्यंतच्या तपासकामातून पुढे आलेला प्रकार असा आहे, या प्रकरणात ज्याला मारहाण झाली ती व्यक्ती तावीज किंवा ताईत बनवून देण्याचा व्यवसाय करीत होती. मारहाण करणाऱयांपैकी एकाने हा ताईत त्या व्यक्तीकडून घेतला होता पण तो अंगावर परिधान केल्यानंतरही त्याच्या घरात दुर्घटना घडली होती. त्याचा राग म्हणून त्याने आपल्या काही साथीदारांसह या ताईत बनवून देणाऱयाला मारहाण करून, त्याची दाढी कापून त्याची विटंबना केली होती. पोलिसांनी मारहाण झालेल्या व्यक्तीचीही चौकशी केली. त्याने पोलिसांसमोर मात्र, आपल्यावर जय श्रीराम म्हणण्याची सक्ती करण्यात आली असे सांगितले नाही. त्यानेच घडलेला खरा प्रसंग सांगितला, अशी माहिती मिळाली आहे. मुख्य म्हणजे पोलिसांनी या प्रसंगाचा खरा (म्हणजेच आवाजासहीत) व्हीडिओ हस्तगत केला. आता तो न्यायालयात सादर केला जाईल. त्या व्हीडिओतील आवाजावरून ही मारहाण नेमकी का झाली हे उघड होते, असे पोलिस म्हणतात. हे सत्य उघड झाल्यानंतर मात्र, येन केन प्रकारेण हिंदूंची आणि रामाची बदनामी करणाऱयांची तारांबळ उडाली. ज्या वेबसाईटवर आवाज बंद करून केलेला तो व्हीडिओ मोठय़ा आविर्भावात प्रसारित केला गेला त्यांनी तो त्वरित काढून घेतला. आता तो प्रसारित करणाऱयांपैकी, शेअर करणाऱयांपैकी आणि त्यावर हिंदूविरोधी प्रतिक्रिया व्यक्त करणाऱयांपैकी अनेकांविरोधात गुन्हय़ांच्या तक्रारी दाखल करण्यात आलेल्या आहेत. त्यात  चित्रपटसृष्टीत अभिनय सोडून इतर कारणांसाठी स्वतःला गाजवत असलेल्यांचाही समावेश आहे. आता त्यांची चौकशी होईल. पण सत्य बाहेर आल्यानंतर त्यांच्या अब्रूचे (जर असलीच तर) धिंडवडे आता त्याच सोशल मीडियावरून निघत आहेत. असे होण्याची ही पहिलीच वेळ नाही. मागेही उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि कर्नाटक या राज्यांमध्ये चर्चेसवर हल्ले झाल्याची आणि ते हिंदुत्ववादी संघटनांनी केल्याची वृत्ते मोठय़ा प्रमाणात प्रसारित झाली होती. त्यावर तथाकथित पुरोगामित्व आणि तथाकथित धर्मनिरपेक्षतेचा खोटा कैवार घेणाऱया आणि त्यांचा व्यर्थ बडिवार माजविणाऱया वृत्तवाहिन्यांवर तावातावाने चर्चाही झाल्या होत्या. पण त्याही प्रकरणांमध्ये हल्ले करणारे हिंदू नव्हते हे कालांतराने सिद्ध झाले होते. अशा घटना कोण घडविते आणि मग त्याची जबाबदारी कशी निरपराध लोकांवर ढकलली जाऊन त्यांची बदनामी केली जाते, हे साऱयांच्या परिचयाचे झाले आहे. अशी वारंवार तोंडे फोडून घेऊनही अशी कटकारस्थाने करणाऱयांना आणि त्यांना वारेमाप प्रसिद्धी देणाऱयांना त्याचे काही वाटत नाही. कारण ते कोडगे झाले आहेत. ‘निर्लज्यम् सदासुखी’, किंवा ‘स्वतःचे नाक कापले गेले तरी चालेल, पण दुसऱयाला अभद्र दर्शन झाले पाहिजे’ अशी ही काही निवडक आणि नमुनेदार पुरोगाम्यांची प्रवृती आहे. सर्वसामान्यांनी त्यांच्या अपप्रचारापासून सावध राहण्याची आवश्यकता आहे. अशी प्रकरणे अपघाताने किंवा चुकून घडत नाहीत. त्यामागे मोठे कारस्थान असण्याची शक्यता दाट आहे. बनावट किंवा बदल केलेले व्हीडिओ पसरविणे, लस टोचून घेण्यासाठी आलेल्यांना प्रत्यक्षात लस न टोचता लस टोचण्याचे नाटक करून लसीची कुपी कचरा पेटीत टाकणे, या प्रकारांकडे दुर्लक्ष करणे सामान्यांसाठी अंतिमतः महागात पडणार आहे. सरकारनेही अशा प्रकारांचा (मग ते कोणाकडूनही घडविले जात असोत) कोणत्याही दबावाखाली न येता पर्दाफाश करून कठोर कारवाई करण्याचीही तितकीच आवश्यकता आहे.

Related Stories

रामें जिंकिला ग्लह निर्धारिं

Patil_p

तबेला, घोडे आणि शिंगरू!

Patil_p

अभिमान आणि माज

tarunbharat

रुततात काटे येथे, आक्रंदतात युवा

Patil_p

सर्पदंशावर प्रभावहीन प्रतिसर्पविष

Patil_p

पडद्यामागील ‘सूत्रधार’…

Patil_p
error: Content is protected !!