तरुण भारत

भारताची आजपासून कसोटी अजिंक्यपदासाठी लढत

बालमुकुंद पतकी

 आजपासून इंग्लंडमध्ये भारताचा न्यूझीलंडविरुद्ध जागतिक अजिंक्यपदासाठी कसोटी सामना सुरू होत आहे. भारतीय संघाचा इथपर्यंतचा प्रवास कसा झाला हे जाणून घेणे औत्सुक्याचे ठरेल. भारताला 1932 साली कसोटी संघाचा दर्जा मिळाला. त्यानंतर आजपर्यंतच्या सामन्यांचा आढावा घ्यायचा झाल्यास तो ‘थोडी खुशी थोडा गम’ अशा शब्दातच घ्यावा लागेल. कसोटी दर्जा मिळाल्यानंतर आपल्याला पहिला विजय मिळाला तो 1952 साली इंग्लंडविरुद्ध मद्रासमध्ये आणि हा क्षण आपल्याला दिला तो विजय हजारेच्या संघाने. त्यानंतर भारताते 1967 मध्ये न्यूझीलंडला (कर्णधार मन्सूरअलीखान पतौडी) आणि 1971 साली वेस्ट इंडिज आणि इंग्लंडला (कर्णधार अजित वाडेकर) त्यांच्याच भूमीत पराभूत करून एक इतिहास रचला. वेस्ट इंडिजच्या मालिकेत आपल्याला सुनील गावसकरच्या रूपात ‘विक्रमवीर’ गवसला. पहिल्याच मालिकेत तब्बल 774 धावा करणारा हा आजवरचा जगातला एकमेव फलंदाज. या मालिका विजयानंतर भारतीय संघाचा दबदबा हळूहळू सुरू झाला. आपल्याला विदेशात पहिलाच मालिका विजय मिळवून देणाऱया कर्णधार अजित वाडेकरचे भारतात खूपच कौतुक झाले. ठिकठिकाणी ‘रेड कार्पेट’ अंथरून त्याचे स्वागत करण्यात आले. पण पुढच्या एका मालिकेत वाडेकरला अपयश आल्यावर क्रिकेटप्रेमींनी निषेधात्मक मोर्चे काढले. भारतीय प्रेक्षकांची ही मानसिकता त्यानंतरच्या अनेक खेळाडू आणि कर्णधारांना अनुभवावी लागली.

Advertisements

पहिल्या गडय़ासाठी 400 हून अधिक धावांची भागिदारी करण्याचा विनू मंकड आणि पंकज रॉयचा विक्रम त्यानंतर अनेक वर्षे भारताच्या नावावर होता. भारतातर्फे आजवर अनेकांनी आपल्या पहिल्याच कसोटी सामन्यात शतक काढण्याचा विक्रम केला आहे. त्यापैकी अनेकांना पुढे पुन्हा शतक काढता आले नाही. पण आपल्या पहिल्या तिन्ही कसोटीत शतक करण्याचा अनोखा विक्रम अझरुद्दीनच्या नावावर आहे. एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक अशीही अझरची ओळख होती. कुशल कर्णधार म्हणूनही त्याने नाव कमावले. पण पुढे ‘मॅच फिक्सिंग’मध्ये अडकल्याने त्याच्यावर बीसीसीआयने आजीवन बंदी घातली. अझरप्रमाणेच ‘कर्नल’ दिलीप वेंगसरकरचा एक अनोखा विक्रम आजवर कोणी मोडू शकलेला नाही. इंग्लंडमधील लॉर्ड्सचे मैदान म्हणजे क्रिकेटची पंढरीच. या मैदानावर खेळण्याची संधी मिळावी ही जगातील प्रत्येक खेळाडूची इच्छा असते. याच मैदानावर दिलीपने शतकांची हॅटट्रिक साधली आहे. 

सचिन तेंडुलकरचा उल्लेख केल्याशिवाय क्रिकेटचा कोणताच लेख पूर्ण होऊ शकत नाही. कसोटी शतकांचा त्याचा विक्रम नजीकच्या काळात कोणी मोडू शकेल असे वाटत नाही. विक्रमांचाच विचार करायचा झाला तर सुमारे 50 हून अधिक विक्रम एकटय़ा सचिनच्या नावावर असतील. पण कर्णधार म्हणून सचिन आपला ठसा उमटवू शकला नाही. सचिनचाच सलामीचा साथीदार विरेंद्र सेहवाग हा वास्तविक स्फोटक फलंदाज म्हणून प्रसिद्ध होता. पण कसोटीत दोन त्रिशतके त्याच्या नावावर आहेत. हा विक्रम भारताच्या अन्य कोणत्याच फलंदाजाला करता आलेला नाही. महत्त्वाच्या ‘वन डाऊन’ क्रमांकावर येऊन कारकीर्द गाजवणाऱया राहुल द्रविडलाही कर्णधार म्हणून ठसठशीत कामगिरी करता आली नाही. पण त्याला भारतीय फलंदाजीचा कणा किंवा ‘द वॉल’ ही उपाधी भारतीय क्रिकेटप्रेमींनी दिली आहे. त्याची कामगिरी या उपाधीला साजेशीच आहे.

विजय मांजरेकर, दिलीप सरदेसाई, सलीम दुराणी, चंदू बोर्डे, एम. एल. जयसिंहा, अब्बासअली बेग, अंशुमन गायकवाड, पतौडी, गुंडाप्पा विश्वनाथ, मोहिंदर अमरनाथ, फारुख इंजिनियर, यशपाल शर्मा, नवज्योतसिंग सिद्धू, के. श्रीकांत, गौतम गंभीर, व्ही. व्ही. एस. लक्ष्मण अशा अनेकांनी संघाची फलंदाजीची फळी यशस्वीपणे सांभाळली. विनू मंकड-अशोक मंकड, लाला अमरनाथ-सुरिंदर आणि मोहिंदर अमरनाथ, पतौडी सिनियर-ज्युनियर, पंकज रॉय-प्रणव रॉय, रॉजर बिन्नी-स्टुअर्ट बिन्नी अशा बाप-लेकांनीही मैदाने गाजवली आहेत. जुन्या पिढीतील विजय मर्चंट, मुश्ताक अली, डी. डी. हिंदळेकर, माधव मंत्री, प्रा. डी. बी. देवधर, नरी कॉन्ट्रक्टर, पॉली उम्रीगर, रणजितसिंह, दुलिपसिंह, सी. के. नायडू, सुभाष गुप्ते, नरेंद्र ताम्हाणे यांच्यासारख्या अनेकांनी भारताचे प्रतिनिधित्व केले. यष्टीरक्षणात फारुक इंजिनियर, किरमाणी आणि महेंद्रसिंग धोनीची कामगिरी सरस म्हणता येईल. क्षेत्ररक्षणात वाडेकर, पतौडी, वेंकटराघवन, एकनाथ सोलकर, अबिदअली, अझरुद्दीन ही नावे ठळकपणे नजरेसमोर येतील. अलीकडे तर संघात 6-7 उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हमखास असतात. गोलंदाजीत भारताने अनेक फिरकीपटू दिले. किंबहुना आजही संघाची ही जमेची बाजू आहे. जसू पटेल, बापू नाडकर्णी यांनी एक काळ गाजवला. चंद्रशेखर, बिशनसिंग बेदी, इरापल्ली प्रसन्ना आणि वेंकटराघवन ही चौकडी तर एकेकाळी भल्याभल्यांना सळो की पळो करून सोडायची. एकाच डावात दहा बळी टिपणारा अनिल कुंबळे, हरभजनसिंग, अर्षद आयुब, शिवलाल यादव, मणिंदरसिंग, लक्ष्मण शिवरामकृष्णन, नरेंद्र हिरवाणी, करसन घावरी (हा तर मुख्यतः वेगवान गोलंदाज), रवी शास्त्राr, दिलीप दोशी अशा अनेकांनी ही आघाडी सांभाळली. कपिलदेवचा उदय होईपर्यंत भारतात वेगवान गोलंदाजच नव्हते. रमाकांत देसाईंचा सन्माननीय अपवाद. एकनाथ सोलकर किंवा अबिद अलीसारख्या मध्यमगती गोलंदाजांनी पहिली 4-5 षटके टाकली की पुढचा सारा भार फिरकीवरच असायचा. कपिलनंतर मात्र मदनलाल, श्रीनाथ, चेतन शर्मा, वेंकटेश प्रसाद, मनोज प्रभाकर यांचा उदय झाला. आज जगातील वेगवान गोलंदाजांच्या यादीत भारताच्या अनेकांचा समावेश अनिवार्य आहे. कपिलदेव तर ‘अष्टपैलू’ म्हणून जागतिक संघात आजही स्थान मिळवू शकतो. ही आम्हाला अभिमानास्पद बाब आहे. भारतीय संघ जागतिक क्रमवारीत अलीकडची अनेक वर्षे पहिल्या क्रमांकावर आहे. साधारण गेली वीस एक वर्षे भारताचा दबदबा वाढत आहे. सौरभ गांगुली, महेंद्रसिंग धोनी आणि आता विराट कोहलीसारख्या कर्णधारकांनी भारताला सलग यशाची गोडी लावली. उत्कृष्ट संघ बांधणीमुळे भारतीय संघ आज ‘नंबर वन’ होऊ शकला. आजपर्यंत अनेकांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. प्रत्येकाच्या वैयक्तिक आणि सांघिक कामगिरीचा आढावा घ्यायचा झाल्यास एक जाडजूड गंथच लिहावा लागेल. आज क्रिकेट सर्वच अंगांनी बदलले आहे. एक दिवसीय आणि टी-20 (त्यातच आयपीएल) मुळे कसोटी क्रिकेटची लोकप्रियता कमी झाली असली तरी क्रिकेटचा खरा आनंद आणि खेळाडूंचा कस ‘कसोटी’तच लागतो याबद्दल कोणाचे दुमत असावे. काळानुरुप क्रिकेटमध्ये अनेक बदल झाले. खेळाडूंना शारीरिक इजा होऊ नये म्हणून अनेक साधने आज उपलब्ध आहेत. खेळाडूंची निवड पद्धत, मैदाने, चेंडू, साईटस्क्रीन, प्रकाशझोतातील खेळ, खेळाडूंचा पोशाख, रेडिओ किंवा टीव्ही समालोचन, जाहिरातींमुळे पडणारा पैशांचा पाऊस, पंच, मिळणारे मानधन वगैरेमध्ये अनेक बदल झाले. चाहत्यांची पसंतीही बदलली. क्रीडाक्षेत्रात भारताने या खेळात जेवढा दबदबा निर्माण केला आहे किंवा विक्रम, चषक मिळविले आहेत तेवढे यश अन्य कोणत्या खेळात अभावानेच मिळवले असेल. अलीकडच्या काळात भारताने ऑस्ट्रलिया आणि इंग्लंडला त्यांच्यात भूमीत नमविण्याची किमया साधली आहे. त्यामुळे आपला संघ आत्मविश्वासाने भरलेला आहे. पण मैदानात समोर न्यूझीलंडसारखा तगडा संघ असल्याने भारतीय संघाची ‘कसोटी’च आहे. आजच्या जागतिक अजिंक्यपदाच्या लढतीसाठी विराट कोहलीच्या संघाला शुभेच्छा देऊया.

Related Stories

।। अथ श्रीरामकथा ।।

Patil_p

पाणीपुरी

Patil_p

कृष्णहृदयीं मुष्टिघात

Patil_p

निर्विघ्नं कुरू मे देव…सुवचने

Patil_p

शिकारीच्या विळख्यात घोरपड

Patil_p

श्रमिकांच्या बलिदानाचे राज्य ते हेच का?

Patil_p
error: Content is protected !!