तरुण भारत

प्रभारींचे पांघरुण, तरीही अवस्था दारुण!

कर्नाटकात संकटांच्या काळातही राजकीय चढाओढ सुरूच आहे. सत्ताधारी भाजपमधील लाथाळय़ा वाढल्या आहेत. यावर पांघरुण घालण्यासाठी पक्षाचे प्रभारी अरुणसिंग सध्या तीन दिवसांच्या बेंगळूर दौऱयावर आले आहेत.

कर्नाटकात कोरोना महामारी आटोक्मयात येत आहे. त्यामुळे साहजिकच वेगवेगळी इस्पितळे व आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी होत चालला आहे. आता गेल्या दोन-तीन दिवसांपासून मोसमी पावसाने जोर धरला आहे. पूर परिस्थिती निर्माण होणार की काय, अशी स्थिती आहे. कोरोना संकटावर मात करण्यासाठी झटलेल्या सरकारी यंत्रणेला आता पुराचा सामना करण्यासाठी सज्ज रहावे लागणार आहे. अशा संकटांच्या काळातही राजकीय चढाओढ सुरूच आहे. सत्ताधारी भाजपमधील लाथाळय़ा वाढल्या आहेत. यावर पांघरुण घालण्यासाठी पक्षाचे प्रभारी अरुणसिंग सध्या तीन दिवसांच्या बेंगळूर दौऱयावर आले आहेत. बुधवारी त्यांनी मंत्र्यांची बैठक घेतली आहे. आमदारांशीही चर्चा करून येडियुराप्पा समर्थक व विरोधक यांच्यातील वादावर पडदा टाकण्याचा त्यांनी प्रयत्न केला असला तरी हा वाद संपण्याऐवजी आणखी चिघळणार, याची सर्व चिन्हे दिसून येत आहेत.

Advertisements

कारण कर्नाटकात नेतृत्व बदल करू नये, यासाठी माजी मंत्री एम. पी. रेणुकाचार्य यांच्या नेतृत्वाखाली सहय़ांची मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत येडियुराप्पा यांना बदलू नये, यासाठी 65 हून अधिक आमदारांनी सहय़ा केल्या आहेत. हायकमांडने सहय़ांची मोहीम थांबवा, अशी सूचना दिल्यामुळे ही मोहीम थांबली असली तरी येडियुराप्पा समर्थक आणि विरोधक यांच्यातील संघर्ष काही थांबेना, अशी स्थिती आहे. एकीकडे बुधवारी सायंकाळी भाजपच्या कार्यालयात अरुणसिंग मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मंत्र्यांची बैठक घेत होते. त्याचवेळी मुख्यमंत्र्यांविरुद्ध गेल्या काही महिन्यांपासून उघडपणे दंड थोपटलेले माजी केंद्रीय मंत्री बसनगौडा पाटील-यत्नाळ, धारवाडचे आमदार अरविंद बेल्लद यांच्यासह काही आमदार समांतर बैठक घेत होते. यावरून सत्ताधारी भाजपमधील लाथाळय़ा कुठेपर्यंत येऊन पोहोचल्या आहेत, हे पहायला मिळते.

एकीकडे मुख्यमंत्री समर्थक व विरोधकात खडाजंगी सुरू असतानाच पंचायत राज व ग्रामीण विकासमंत्री के. एस. ईश्वरप्पा यांनी अन्य पक्षातून आलेल्या 17 आमदारांमुळे भाजपमध्ये ही परिस्थिती निर्माण झाली आहे, असे उघड वक्तव्य केले आहे. ‘ऑपरेशन कमळ’च्या गळाला लागलेल्या 17 जणांना मंत्री केल्यामुळे पक्षात थोडीशी गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. सुरुवातीलाच आपल्या पक्षाला बहुमत मिळाले असते तर ही वेळ आली नसती. सी. पी. योगेश्वर, बसनगौडा पाटील-यत्नाळ आदींच्या उघड वक्तव्यांमुळे गोंधळात आणखीनच भर पडली आहे, असे उघडपणे सांगितले आहे. त्यामुळे पक्षांतरित नेते पार भडकले आहेत. ‘आम्ही पक्षांतर केले म्हणून भाजप सत्तेवर आला आहे. तुम्ही मंत्री झाला आहात, हे विसरू नका’, असे सांगत बी. सी. पाटील, एम. टी. बी. नागराज आदी मंत्र्यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले आहे.

17 पक्षांतरितांनी येडियुराप्पा यांच्या नेतृत्वाला पाठिंबा दिला आहे. संपूर्ण दक्षिण भारतात कर्नाटकात पहिल्यांदा भाजपची सत्ता आली, त्यावेळीही अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. येडियुराप्पा समर्थक व विरोधक यांच्यात चांगलीच जुंपली होती. नंतरच्या काळात त्याचा फटका पक्षाला बसला. सध्याच्या घडामोडी लक्षात घेता त्याचा विसर पडला आहे की काय असे दिसून येत आहे. बुधवारी अरुणसिंग बेंगळूरला आले. पहिल्याच दिवशी त्यांनी कर्नाटकात नेतृत्व बदल नाही, येडियुराप्पा यांच्या नेतृत्वाखाली सरकार चांगले चालले आहे, असे जाहीर करून येडिविरोधकांना नेतृत्वबदल सध्या तरी होणार नाही, याची जाणीव करून देण्याचा प्रयत्न केला आहे. येडियुराप्पा विरोधकांच्या हालचाली लक्षात घेऊन आमदारांनी स्वतंत्र बैठका घेऊ नयेत, अशी सूचना अरुणसिंग बेंगळूरला येण्याआधीच हायकमांडने दिली आहे. तरीही असंतुष्टांच्या बैठका सुरूच आहेत. भाजप हायकमांडने मनात आणले तर कर्नाटकातील तिढा सोडविणे अवघड नाही. कोरोना महामारीमुळे विस्कटलेली राज्याची आर्थिक परिस्थिती, संभाव्य पुराचा धोका याबरोबरच सद्यपरिस्थितीत नेतृत्वबदल केल्यास कर्नाटकाच्या राजकारणावर होणाऱया दूरगामी परिणामांचा विचार करूनच हायकमांडचे इरादे हे ‘ठंडा कर के खाओ’ असे आहेत.

काँग्रेस असो किंवा भाजप आपल्या सत्ताकाळात ज्या ज्यावेळी अंतर्गत लाथाळय़ा वाढल्या आहेत, त्या त्यावेळी त्याचा फटका त्या पक्षांना बसला आहे. एखाद्या पक्षाच्या नेतृत्वात बदल करणे, हा त्या पक्षाचा अंतर्गत विचार असतो. सध्या मुख्यमंत्री समर्थक आणि विरोधक उघडपणे एकमेकांना भिडत आहेत. ही गोष्ट लक्षात घेतली तर कर्नाटकातील राजकीय स्थिती कोणत्या वळणावर येऊन पोहोचली आहे, हे लक्षात येते. नवी दिल्लीहून परतल्यानंतर अरविंद बेल्लद यांनी गृहमंत्री बसवराज बोम्माई यांची भेट घेऊन चर्चा केली आहे. जर कर्नाटकात नेतृत्वबदल झाला तर अरविंद बेल्लद मुख्यमंत्री होणार, अशी चर्चा सुरू झाली आहे. भाजपचे आजवरचे निर्णय लक्षात घेता येडियुराप्पा यांच्यानंतर कर्नाटकाची धुरा कोणत्या नेत्याच्या खांद्यावर असणार, याची पडताळणी पक्षाने सुरू केली आहे. येडियुराप्पा सुचवतील त्यांना ही जबाबदारी मिळणार की एखाद्या तरुण चेहरा समोर येणार, याचीही खलबते होताना दिसून येत आहेत. भाजपने जर घाईगडबडीने नेतृत्वबदलाचा निर्णय घेतला तर कर्नाटकात पुन्हा कुमारस्वामी यांच्या निजदला महत्त्व प्राप्त होणार आहे. यासंबंधी निर्णय झाला नाही तर असंतुष्टांच्या कारवाया आणखी तीव्र होणार आहेत, हे स्पष्ट आहे. अरुणसिंग यांना हे त्रांगडे सोडविण्यात यश येईल का हाही एक प्रश्नच आहे. कारण येडियुराप्पा यांचे गुणगान करणाऱया अरुणसिंग यांनाच बदला, अशीही मागणी जोर धरू लागली आहे.

Related Stories

कहाणी निष्फळ संपूर्ण…!

Patil_p

कोरोनाचा यक्षप्रश्न: सरकार, विरोधक आणि उद्योगजगत संभ्रमित

Patil_p

विरुद्धाचरण कन्याधामीं

Omkar B

वीजबिले, बियाणे, खत प्रश्नी राजकीय औदासिन्य

Patil_p

रुतलेले पर्यटन चक्र पुन्हा सुरु होणार

Patil_p

कर्नाटकात कोरोना नियंत्रणात मात्र हिवाळा धोक्याचा!

Patil_p
error: Content is protected !!