तरुण भारत

विकासाची क्रांती पुढे नेऊया

भारताच्या इतिहासातील आणखी एका महत्त्वाच्या क्रांतीचा समावेश मागाहून झाला, ती म्हणजे गोवा मुक्ती आंदोलनासाठी झालेली क्रांती. 18 जून 1946 रोजी क्रांतीकारक डॉ. राम मनोहर लोहिया बिहारहून दिल्ली, आणि दिल्लीहून गोव्यात आले. पोर्तुगीजांनी गोव्यावर 450 वर्षे आपली सत्ता गोमंतकीयांवर लादली होती. येथील जनता संघटित होऊ नये यासाठी पोर्तुगीजांनी आटोकाट प्रयत्न केले. पोर्तुगीज सरकारची जुलूमशाही  म्हणजे सालझारशाहीने सर्वांनाच जेरीस आणले होते. गोव्यात पोर्तुगीजांविरुद्ध नागरिकांमध्ये चुळबुळ सुरू झाली. अनेकांनी बंड पुकारले. सत्तरीतील दीपाजी राणे यांनी पुकारलेले बंड, दादासाहेब राणे यांनी पुकारलेले बंड, खुद्द काही ख्रिस्ती मंडळीनी देखील पुकारलेले बंड. पोर्तुगीजांनी हे सारे बंड मोडीत काढले. फिरंग्यानी गोमंतकीय वीरांवर सूड उगविले. कित्येकांना ठार मारले. परंतु डॉ. राम मनोहर लोहिया यांनी गोव्यातील युवकांमध्ये क्रांतीची बीजे पेरली. नंतर युवा चळवळ त्याकाळी विश्वनाथ लवंदे यांच्या नेतृत्वाखाली सुरू झाली आणि पोर्तुगीज राजसत्तेला त्यांनी एकापेक्षा एक धक्के दिले. स्वातंत्र्ययोद्धे मोहन रानडे यांनी तर पोर्तुगीजांची काही पोलीस स्थानकेच पेटवून दिली होती. पोर्तुगीजांविरुद्ध बंड पुकारणाऱया हिरवे गुरुजींना तर तेरेखोल किल्ल्यासमोर गोळी घालून ठार करण्यात आले. गोव्याचा क्रांतीलढा हा अनेक वर्षे चालला. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देखील गोव्याला पोर्तुगीजांपासून स्वातंत्र्य मिळविण्यास तब्बल 14 वर्षे लागली. देशाला स्वातंत्र्य मिळवण्याची चिन्हे दिसत होती. गोव्यातील वीरांना तेवढीच प्रेरणा मिळत होती. प्रभाकर सिनारी सारखे अनेक शुरवीर जास्त आक्रमक बनत होते. भारत सरकारने 1961 मध्ये 18 डिसेंबर रोजी गोव्यात भारतीय सैन्य घुसविले आणि पोर्तुगीजांना अखेर मध्यरात्रीच्या सुमारास शरणागती पत्करणे भाग पडले.

गोव्याचा स्वातंत्र्यलढा हा फार मोठा आहे. गोवा मुक्तीसाठी बाळा राया मापारी सारख्या अनेक दिग्गजानी बलिदान दिलेले आहे. दत्तात्रय देशपांडे, टी. बी. कुन्हा, पुरुषोत्तम काकोडकर, डॉ. ज्युलियो मिनेझिस अशा अनेक वीरांचे फार मोठे योगदान आहे. गोवा मुक्तीच्या लढय़ाला तसा पुष्कळ पूर्वी प्रारंभ झाला होता. मात्र 1946 च्या क्रांतीने त्याला मूर्त स्वरुप प्राप्त झाले. आज या घटनेस 75 वर्षे पूर्ण झाली. गोवा मुक्ती लढय़ामध्ये ना केवळ गोमंतकीय, हैदराबाद, महाराष्ट्र, कर्नाटक, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार अशा अनेक प्रांतातून वीरांनी येऊन लढा दिला. असंख्य महिलाही या लढय़ात सामिल झाल्या होत्या. गोवा क्रांतीदिनाच्या अमृत महोत्सवी वर्षात आपण आहोत. या दिनाची महती लक्षात घेऊन आपण विकासाची क्रांती पुढे नेऊया. गोव्याचा स्वातंत्र्य इतिहास महान आहे. गोव्याची 18 जूनच्या क्रांतीची महती देखील महान आहे. ज्या ज्ञान अज्ञातांनी गोवा मुक्ती आंदोलनासाठी झालेल्या क्रांतीमध्ये उडी घेतली, आपले बलिदान दिले, हौताम्य पत्करले, धारातिर्थी पडले त्या शुरवीरांना विनम्र अभिवादन करीत आहोत. गोवा क्रांतीदिन चिरायु होवो. या पवित्र दिनाच्या आपण सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो.

Advertisements

– संपादक

Related Stories

कार्यकर्त्यांनी घरोघरी संपर्क साधला तरच पक्षाचा विस्तार

Patil_p

कोरोनाच्या सावटात खासगी बसमालकांवर उपासमारीची भिती

Omkar B

शिक्षकांचा थेट गावात जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद

Omkar B

आज जागतिक कर्णबधीर दिवस

Patil_p

गांधी मार्केटातील व्यापाऱयांची पालिकेला धडक

Omkar B

कुंडई अपघातातील यतीन वारंग यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंतिमसंस्कार

Omkar B
error: Content is protected !!