तरुण भारत

बहुप्रतिक्षित डब्ल्यूटीसी फायनल आजपासून

पावसाचा व्यत्यय न आल्यास भारत-न्यूझीलंड यांच्यात रोमांचक लढतीची अपेक्षा, 144 वर्षांच्या कसोटी इतिहासातील सर्वात महत्त्वाची लढत

वृत्तसंस्था /साऊदम्प्टन

Advertisements

भारत-न्यूझीलंड हे दिग्गज संघ आजपासून (शुक्रवार दि. 18) खेळवल्या जाणाऱया जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये आमनेसामने उभे ठाकतील, त्यावेळी कसोटी क्रिकेटच्या 144 वर्षांच्या प्रदीर्घ इतिहासातील हा ऐतिहासिक, सर्वोच्च क्षण असेल. जागतिक स्तरावर कसोटी क्रिकेटमधील पहिलेवहिले जेतेपद काबीज करण्यासाठी विराट कोहली व केन विल्यम्सनसारख्या अव्वल दिग्गजांची प्रतिष्ठा यावेळी अर्थातच पणाला लागलेली असणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार, दुपारी 3.30 वाजता पहिल्या दिवसाच्या खेळाला सुरुवात होईल.

कसोटी क्रिकेटमधील सर्वात कठीण जबाबदारी या निमित्ताने रोहित शर्मा व शुभमन गिल या भारतीय सलामीवीरांच्या खांद्यावर असणार आहे. त्यामुळे, या उभयतांची फलंदाजी लक्षवेधी ठरु शकेल. बोल्ट व साऊदीसारखे कसलेले गोलंदाज समोर असल्याने या उभयतांना सर्वस्व पणाला लावून लढणे भाग असेल.

रोहित शर्मा विरुद्ध टेंट बोल्ट, डेव्हॉन कॉनवे विरुद्ध अश्विन किंवा जडेजा, वॅग्नर विरुद्ध रिषभ पंत, अशा अनेक लढती या सामन्यात रंगणे अपेक्षित असून विल्यम्सन आयसीसी कसोटी क्रिकेटची गदा जिंकण्यात यशस्वी ठरला तर ‘नाईस गाईज डोण्ट अल्वेज फिनिश लास्ट’, असेच म्हटले जाईल. विराटसेना देखील मात्र तितक्याच ताकदीने उतरणार असून यामुळे उभय संघात रस्सीखेच रंगली तर त्यात आश्चर्याचे कारण नसेल.

चेतेश्वर पुजारा समोर येईल, त्यावेळी नील वॅग्नर उसळते चेंडू टाकण्याची शक्यता अधिक असेल आणि अजिंक्य रहाणे क्रीझवर उतरताना कसोटी क्रिकेटमधील आपली उपयुक्तता आणखी एकदा अधोरेखित करण्यासाठी कमालीचा आसुसलेला असेल. रविचंद्रन अश्विन यापुढे कसोटी क्रिकेटमधील विश्वचषक खेळण्याची शक्यता बरीच कमी आहे. त्यामुळे, तो विल्यम्सन, रॉस टेलर किंवा हेन्री निकोल्ससारखे मोहरे गारद करण्याचा येथे कसोशीने प्रयत्न करताना दिसून येईल.

इशांत शर्माने ऐतिहासिक वाका खेळपट्टीवर रिकी पाँटिंगसारख्या धुरंधराला अक्षरशः जेरीस आणले होते, त्याला 14 वर्षे उलटली आहेत आणि येथे किवीज फलंदाजांना नेस्तनाबूत करण्यासाठी इशांतसमोर त्याच करिष्म्याची पुनरावृत्ती करण्याचे लक्ष्य असेल.

अलीकडील कालावधीत प्रचंड वेगाने प्रगल्भता आणणारा काईल जेमिसन भारतीय फलंदाजांसाठी कर्दनकाळ ठरु नये, ही देखील स्वतंत्र अपेक्षा येथे करावी लागेल. 6 फूट 9 इंच उंचीच्या जेमिसनने यापूर्वी अनेक दिग्गज फलंदाजांची त्रेधातिरपिट उडवली आहे.

याचप्रमाणे, न्यूझीलंडचा नवा स्टार डेव्हॉन कॉनवे याच्यासमोरही जसप्रित बुमराहच्या लेट अँगल गोलंदाजीचे कडवे आव्हान असेल. शिवाय, मोहम्मद शमीसारखा अनुभवी गोलंदाज किवीज फलंदाजांना अडचणीत आणू शकतो. अश्विन व जडेजाची फिरकी गोलंदाजी हे देखील भारताचे बलस्थान ठरु शकते.

विराटच्या ट्रॉफी कॅबिनेटला प्रतीक्षा आयसीसी जेतेपदाची…

मागील दशकभरापासून जागतिक क्रिकेटमध्ये वरचष्मा गाजवणाऱया विराट कोहलीला कर्णधार या नात्याने आतापर्यंत एकही आयसीसी स्पर्धा जिंकून देता आलेली नसून त्याची उत्तम भरपाई या फायनलमध्ये करण्याचा त्याचा निर्धार असणार आहे. या मालिकेत जेतेपद काबीज केल्यास विराट कोहलीचे आयसीसी जेतेपद मिळवून देण्याचे स्वप्न साकार होईल. शिवाय, कसोटी चॅम्पियनशिपचा पहिला कर्णधार म्हणूनही त्याची सुवर्णाक्षरांनी नोंद होईल. मात्र, यासाठी केन विल्यम्सन अँड कंपनीचा अडसर दूर करण्याचे आव्हान विराटसेनेसमोर यावेळी असणार आहे.

रोहितचे अफलातून ‘फुटवर्क’ विरुद्ध ट्रेंट बोल्टचे ‘बनाना इनस्विंगर’….जुगलबंदी रंगणारच!

2 वर्षांपूर्वी आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत तब्बल 5 शतके झळकवणाऱया रोहित शर्माने त्यानंतर आतापर्यंत फलंदाजीत आणखी बरीच प्रगल्भता आणली आहे. दुसरीकडे, न्यूझीलंडचा डावखुरा स्ट्राईक बॉलर ट्रेंट बोल्ट प्रतिस्पर्धी फलंदाजाच्या बुटाच्या लेसचा वेध घेणारे भेदक ‘बनाना इनस्विंगर’ टाकण्यात माहीर आहे. या उभयतात आजपासून खेळवल्या जाणाऱया फायनल लढतीत उत्तम जुगलबंदी रंगण्याची शक्यता आहे.

केन विल्यम्सनसाठी त्या अपयशाची भरपाई होणार का?

न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सनने जागतिक क्रिकेटमध्ये बरेच यश संपादन केले असून 2019 आयसीसी विश्वचषक स्पर्धेत त्याने न्यूझीलंडला अंतिम फेरीपर्यंत धडक मारुन दिली होती. इंग्लंडविरुद्ध शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या अंतिम लढतीत बरोबरी होऊन सुद्धा बाऊन्ड्री काऊन्टच्या नियमामुळे विल्यम्सनला जेतेपदाने हुलकावणी दिली होती. त्या अपयशाची भरपाई करण्यात विल्यम्सन यशस्वी होणार का, याचे उत्तरही या फायनल लढतीतून मिळणार आहे.

होय! फायनलमध्ये पावसाचा व्यत्यय येऊ शकतो!

साऊदम्प्टनमध्ये मागील काही दिवस उष्ण वातावरण असले तरी येत्या काही दिवसात येथे वरुणराजा बरसू शकतो, असा ब्रिटीश हवामान खात्याने अंदाज वर्तवला आहे. पाच दिवसांच्या खेळात व्यत्यय आल्यास सहावा दिवस राखीव असेल. मात्र, तरीही सामना निकाली न झाल्यास आयसीसीच्या प्लेईंग कंडिशन्सनुसार, दोन्ही संघांना संयुक्त विजेते घोषित केले जाणार आहे.

कसोटी क्रिकेटमधील भारताचे ‘माईलस्टोन्स’

1932 : भारताचे जागतिक कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण. कसोटी दर्जा मिळवणारा सहावा संघ. लॉर्ड्सवरील पहिल्या लढतीत इंग्लंडविरुद्ध 158 धावांनी पराभव.

1952 : जवळपास 20 वर्षात 24 कसोटी सामने खेळल्यानंतर इंग्लंडविरुद्ध चेन्नईत पहिला कसोटी विजय. 8 बळींसह विनू मंकड सामन्याचा हिरो. याच वर्षात भारताने पाकिस्तानविरुद्ध मायदेशात कसोटी मालिकाही जिंकली. या मालिकेत दिल्लीतील कोटला मैदानावर पाकिस्तानचे कसोटी पदार्पण.

1968 : भारताचा विदेशात पहिला मालिकाविजय. टायगर पतौडी यांच्या नेतृत्वाखालील संघाची न्यूझीलंडवर 3-1 फरकाने मात. याच मालिकेत बिशनसिंग बेदी, इरापल्ली प्रसन्ना व बापू नाडकर्णी या त्रिकुटाच्या पर्वाचा उदय.

1971 : पोर्ट ऑफ स्पेन कसोटीत भारताचा विंडीजविरुद्ध ऐतिहासिक विजय. सुनील गावसकर यांच्या पदार्पणाच्या मालिकेत 774 धावांचे योगदान. भारताने 1-0 फरकाने मालिका जिंकली. अजित वाडेकर यांच्या नेतृत्वाखाली इंग्लंडविरुद्धही मालिका जिंकली. लेगस्पिनर चंद्रशेखर भागवत यांचे 38 धावात 6 बळी. भारत 1-0 फरकाने विजयी.

1976 : पोर्ट ऑफ स्पेन कसोटीत भारताचा 403 धावांचा विश्वविक्रमी पाठलाग. गावसकर व गुंडाप्पा विश्वनाथ यांच्या तडाखेबंद खेळीमुळे भारत 4 बाद 406 धावांसह विजयी.

1999 : अनिल कुंबळेचा एकाच कसोटी डावात सर्वच्या सर्व 10 बळी घेण्याचा विक्रम. जिम लेकरच्या विक्रमाशी बरोबरी. फिरोजशाह कोटला मैदानावर भारताचा पाकिस्तानविरुद्ध मालिकेत बरोबरी मिळवून देणारा विजय.

2001 : व्हीव्हीएस लक्ष्मणची कसोटी क्रिकेटमध्ये 281 धावांची सर्वोच्च खेळी व हरभजन सिंगच्या हॅट्ट्रिकनंतर भारत फॉलोऑन मिळाल्यानंतरही विजय काबीज करणारा केवळ दुसरा संघ ठरला. कोलकात्यातील या विजयामुळे भारताची ऑस्ट्रेलियावर मालिकेत 2-1 फरकाने मात.

2004 : भारताने पाकिस्तानी भूमीत आजवरचा एकमेव मालिका विजय नोंदवला. मुल्तान कसोटीत विरेंद्र सेहवागने 309 धावांची झुंजार खेळी साकारली. पाकिस्तानविरुद्ध त्रिशतक झळकावणारा पहिला भारतीय फलंदाज.

2018-19 : विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध 2-1 फरकाने मालिकाविजय. ऑस्ट्रेलियन भूमीतील हा भारताचा पहिलावहिला मालिकाविजय ठरला.

2020-21 : विराट कोहलीसारख्या अव्वल खेळाडू, कर्णधाराच्या गैरहजेरीतही भारताचे इंग्लंड व ऑस्ट्रेलियाविरुद्ध धमाकेदार विजय. अनेक दिग्गज खेळाडू दुखापतग्रस्त असतानाही भारताच्या दुसऱया फळीतील खेळाडूंनी दोन्ही मालिका गाजवल्या.

अंतिम संघ

भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), रिषभ पंत (यष्टीरक्षक), रविंद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, जसप्रित बुमराह.

न्यूझीलंड : केन विल्यम्सन (कर्णधार), ट्रेंट बोल्ट, डेव्हॉन कॉनवे, काईल जेमिसन, टॉम लॅथम, एजाझ पटेल, टीम साऊदी, रॉस टेलर, नील वॅग्नर, बीजे वॅटलिंग, विल यंग.

मैदानी पंच : रिचर्ड इलिंगवर्थ, मायकल गॉफ.

सामनाधिकारी : ख्रिस ब्रॉड.

सामन्याची वेळ : दुपारी 3.30 पासून.

Related Stories

पदार्पणात द्विशतक झळकावणारा कॉनवे सहावा फलंदाज

Amit Kulkarni

ऑलिंपिकला जाणाऱया भारताच्या नेमबाज, प्रशिक्षक, अधिकाऱयांचे लसीकरण

Amit Kulkarni

ऑलिम्पिक टॉर्च रिलेचा मात्सुयामातील टप्पा रद्द

Patil_p

स्पेनचा नदाल शेवटच्या चार खेळाडूंत

Patil_p

विराट कोहलीच्या शुभेच्छा व अपेक्षा….फटाके फोडू नका!

Patil_p

शदमन इस्लामचे अर्धशतक, वारिकनचे 3 बळी

Patil_p
error: Content is protected !!