तरुण भारत

मॅग्नेट मॅन – सत्य काय ?

अलीकडेच नाशिक, जळगाव आणि बेळगाव येथे काही व्यक्तींमध्ये चुंबकीय गुणधर्म आले आहेत अशी बातमी सोशल मीडिया, प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियावर झळकली. हा गुणधर्म शरीरात येण्यापूर्वी काही दिवस अगोदर संबंधित व्यक्तींनी कोविड लसीचा दुसरा डोस घेतला होता. त्यामुळेच आपल्यात चुंबकत्व आले असा दावा संबंधित व्यक्तींनी आणि मीडियानेही केला. काहींनी तर हा दैवी चमत्कार आहे, अशा वार्ता पसरविल्या.

मॅग्नेट मॅनच्या सुरस कथा जगभर अनेक देशात घडल्या आहेत. जगात याबाबत कोणत्याही प्रकारचे कुतूहल आढळत नाही. मॅग्नेट मॅनच्या तथाकथित घटना कोविडची लस येण्यापूर्वीही घडल्या आहेत. ही सर्व माहिती समजून न घेता मॅग्नेट मॅनची प्रसिद्धी करणाऱया समाजमाध्यमांना काय म्हणावे? आपल्या देशात सत्य शोधनापेक्षाही गुढाचा गाजावाजा करून त्याला वारेमाप प्रसिद्धी देणे याचा अर्थ आपला समाज अजूनही वैज्ञानिक दृष्टिकोनापासून दूर आहे, हेच खरे. आपल्याला या लेखात खालील गोष्टींची चिकित्सा करायची आहे.

Advertisements

1) मॅग्नेट मॅनमध्ये खरेच चुंबकीय गुणधर्म सिद्ध झालेत का? 2) हे गुणधर्म कोवीड लसीमुळे आलेत का? 3) मॅग्नेट मॅनमध्ये चुंबकीय गुणधर्म नसतील, तर मग त्याच्या अंगाला धातूच्या वस्तू चिकटतात कशा?

जगभर गाजलेले मॅग्नेट मॅन

विविध देशात स्वतः चुंबकीय मॅन असलेले अनेकजण अवतरलेले आहेत आणि विस्मृतीतपण गेले आहेत कारण त्यांच्यामधील चुंबकत्वाचा फोलपणा जागतिक चिकित्सकांनी उघड केला. भारतात अरुण रायकर हा मध्य प्रदेशातील गृहस्थ. आपल्या शरीरावर दहा किलो वजनाचे धातू त्याच्यातील चुंबक गुणामुळे तोलून धरतो, असा दावा करीत होता. त्याचबरोबर रुमानियामधील ऑरेल, जॉर्जियामधील एटिबार, क्रोशियामधील आयव्हन नावाचा मुलगा, सर्बियातील डॉलीबॉर अशा विविध तथाकथित मॅग्नेट मॅनचा बोलबाला झाला होता. जॉन ग्रीनवुड याने तर त्याच्यामधील चुंबकत्वाच्या सामर्थ्याने स्टॉप वॉचेस थांबविण्याचाही दावा केला होता. सगळय़ात प्रख्याक मग्नेट मॅन म्हणजे मलेशियातील ल्यू थो लिन. हा गृहस्थ अंगभर अनेक किलो वजनांच्या धातूच्या वस्तू शरीरावर तोलून धरत असे. एवढेच नव्हे, तर पोटाजवळ लोखंडी पट्टी प्रेस करून तिला साखळी बांधून तो कारही ओढून दाखवी.

जगभराच्या विचारवंतांनी केलेली चिकित्सा

अमेरिकेतील प्रबोधन चळवळीचे मुखपत्र ‘स्केप्टकिल इन्क्वायरर’चे संपादक बेंजामिन रॅडफोर्ड हे अग्रगण्य चिकित्सक. त्यांनी सर्बियातील बॉग्डन नावाच्या सात वर्षांच्या मॅग्नेट बॉयची तपासणी केली. या मुलाच्या चमत्काराचे मीडियात भरभरून कौतुक झाले. तो वेगवेगळय़ा धातूंच्या वस्तू शरीरभर तोलून धरीत. एवढेच नव्हे तर रिमोर्ट कंट्रोल, सपाट प्लेटा आणि सपाट तव्यासारख्या वस्तू आपल्या छातीवर तोलून धरत होता. लोकांना तर हा चमत्कार वाटत होताच शिवाय या मुलाच्या कुटुंबीयांनी त्याच्यात चुंबकीय शक्ती आली आहे, असा दावा केला. मग काय एस.एन.बी.सी. टी.व्ही.च्या रिपोर्टरने त्याला वारेमाप प्रसिद्धी दिली. बेंजामिन रॅडफोर्ड यांनी या मुलाची चिकित्सा केली. ज्यात धातू नाही असा रिमोट कंट्रोल, तसेच काचेच्या वस्तू या मुलाच्या छातीवर चिकटले. याचबरोबर गुळगुळीत लाकूडही त्याच्या छातीला चिकटले. कोणताही चुंबक लोखंडासारखे धातू सोडल्यास काच किंवा लाकूड यासारख्या वस्तूंना आकर्षित करत नाही. मग बॉग्डनच्या छातीवर रिमोट किंवा काच कशी चिकटली? याचा अर्थ असा की, बॉग्डनच्या शरीरात चुंबकीय शक्ती नाही.

 मॅग्नेट मॅनची चाचणी घेण्याचा आणखी एक अफलातून प्रयोग रॅडफोर्डने केला. चुंबक शक्तीचा दावा करणाऱया व्यक्तीच्या छातीवर चुंबकसूची (कंपास निडल) धरायची. अशी सूची नेहमी उत्तर-दक्षिण दिशेला स्थिर राहते; पण चुंबकाजवळ ती नेल्यास गर्रकन वळते व नव्या दिशेला स्थिर राहते. चुंबक शक्तीचा दावा करणाऱया व्यक्तींच्या बाबतीत चुंबकसुची वळलीच नाही. निष्कर्ष असा की, अशा व्यक्तींमध्ये चुंबकीय शक्ती नाही. बेंजामिन रॅडफोर्ड यांनी बॉग्डन या मुलाप्रमाणेच आपण मॅग्नेट मॅन असल्याचा दावा करणाऱया इतर तथाकथित मंडळींच्या या चुंबक गुणांची अशा व इतर प्रयोगांनी चिकित्सा केली. त्या सर्व व्यक्ती फ्रॉड असल्याचे त्यांना आढळून आले.

अंगावर वस्तू चिकटण्याचे खरे कारण

चुंबकीय शक्तीमुळे जर वस्तू अंगावर चिकटत नसतील, तर मग याचे खरे कारण काय? अंगावर वस्तू तर चिकटलेल्या दिसतातच. याच्या कारणांचा अमेरिकेतील आणि मलेशियातील विद्यापीठातील वैज्ञानिकांनी यशस्वीरित्या शोध घेतला आहे. मॅग्नेट मॅनसारख्या व्यक्तीच्या शरीराचा गुळगुळीतपणा त्याच्या अंगावर केस नसणे, तसेच त्याची त्वचा रबरासारखी इलॅस्टिक आणि थुलथुलीत असणे अशा कारणांचे निरीक्षण केले आहे. अशा व्यक्तींना चटकन घाम येतो. असेही त्यांचे निरीक्षण आहे. घामट त्वचा आणि त्वचेवर दाबलेले चमच्यासारखे गुळगुळीत पदार्थ एकमेकांना कसे चिकटून बसतात, याचे कारण आहे चमच्यासारख्या वस्तू आणि गुळगुळीत त्वचा यांना चिकटवून ठेवणारे घर्षण. हे घर्षण गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध लागू होते. हे घर्षण कसे निर्माण होते? कोणत्याही दोन त्याच प्रकारचे रेणू अगदी जवळ असल्यास त्यांच्यामध्ये जे बल तयार होते, त्यास समाकर्षण बल असे म्हणतात. पेल्यात ठेवलेल्या पाण्याचे रेणू किंवा कोणत्याही द्रवाचे रेणू अशा रितीने बंधित राहतात. उलट दोन भिन्न प्रकारच्या रेणुंमधील आकर्षण म्हणजे विषमाकर्षण बल. घामामध्ये असलेल्या काही घटक रेणुत व चमच्यासारख्या वस्तूच्या पृ÷भागावरील रेणू यांच्यातील विषमाकर्षणामुळे चमचा त्वचेला चिकटून बसतो. जणू काय घामाचे रेणू चमच्याच्या पृ÷भागावरील रेणूंना घट्ट धरून ठेवतात. टेबलावर लाकडी ठोकळा ठेवल्यास त्यांच्यामध्ये जसे विरुद्ध दिशेने घर्षण बल तयार होते, तसेच घर्षण गुरुत्वाकर्षणाच्या विरोधात तयार झाल्याने चमचा तोलून धरला जातो. किती वजन तोलून धरले जाईल, हे त्वचेचा गुळगुळीतपणा, चिकटपणा आणि चिकटवल्या गेलेल्या वस्तूचा गुळगुळीतपणा यावर अवलंबून असते. मलेशियातील ल्यू थो लिन याला अनुवांशिकरित्या अशी वस्तू धरून ठेवणारी त्वचा लाभली होती. त्यामुळेच तो अनेक किलो वजनांच्या वस्तू शरीरावर तोलत असे. निष्कर्ष असा की घामेजलेल्या शरीराचा चिकटपणा व त्यामुळे निर्माण होणारे घर्षण हे मॅग्नेट मॅनने वस्तू तोलून धरण्याचे कारण होय. नाशिकचा तथाकथित मॅग्नेट मॅन हा मॅग्नेट मॅन आहे की नाही, याची वरील ज्ञानाच्या प्रकारात चाचणी घेता येईल. काचेच्या वस्तू किंवा रिमोर्ट कंट्रोल किंवा चुंबकसूचीच्या सहाय्याने त्याचे चुंबकत्व तपासता येईल.

कोव्हिड लस आणि चमत्कार

आता राहिला प्रश्न कोव्हिड लस आणि चुंबकत्व यांच्यामधील संबंधाचा. नाशिक मॅग्नेट मॅनच्या समर्थकांनी कोव्हिड लसीमुळे त्याच्यात चुंबकत्व आले असा दावा केला आहे. वैद्यकीय क्षेत्रातील प्रसिद्ध संशोधक डॉ. संग्राम पाटील यांच्या चिकित्सेनुसार कोव्हिड लसीमुळे चुंबकीय गुणधर्म असलेला कोणताही पदार्थ नाही. त्यामुळे संबंधित व्यक्तीचे शरीर चुंबकीय बनणे शक्मय नाही. निष्कर्ष असा की, नाशिक मॅग्नेट मॅनचे चुंबकत्व हे छद्मविज्ञान होय. त्याची खात्री वर सांगितल्याप्रमाणे आपणास करता येईल. आपल्यापैकी अनेक कार्यकर्ते आपल्या शरीरावर वस्तू तोलून धरण्याचा प्रयोग करू शकतील. त्यांच्यामध्ये कोव्हिड लस टोचून न घेतलेले कार्यकर्ते जरूर असावेत. खरं तर डोकं चालविण्याची आणि मॅग्नेट मॅनच्या संदर्भात माहिती तंत्रज्ञानाच्या आधारे चिकित्सा करण्याची तसदी खोटय़ा गोष्टी पसरवणाऱया माध्यमांनी घेतली असती, तर हा छद्मविज्ञानाचा प्रकार वेळीच रोखता आला असता. कार्यकर्त्यांनी आपापल्या क्षेत्रात प्रात्यक्षिके दाखवून तथाकथित मॅग्नेट मॅनचे बिंग उघड करावे, अशी अपेक्षा.

प्रा. प. रा. आर्डे,

Related Stories

अपघात की हल्ला ?

Amit Kulkarni

मुंबईकर चाकरमानी आमचेच, तरीही…!

Patil_p

कृष्ण कुलदैवत एक

tarunbharat

धोका आजही

Patil_p

कोरोना लढाई निर्णायक वळणावर

Patil_p

देव आहे का?

Patil_p
error: Content is protected !!