तरुण भारत

कोअर कमिटीच्या बैठकीतही येडियुराप्पांची पाठराखण

प्रतिनिधी/ बेंगळूर

नेतृत्व बदलाच्या मुद्दय़ावरून राज्य भाजपमध्ये निर्माण झालेल्या गोंधळावर पडदा टाकण्यासाठी मागील दोन दिवसांपासून बेंगळुरात ठाण मांडलेल्या भाजप प्रभारी अरुणसिंग यांनी शुक्रवारी सायंकाळी पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक घेऊन चर्चा केली. यावेळी अनेक नेत्यांनी मुख्यमंत्री येडियुराप्पा यांची पाठराखण केली असून नेतृत्वबदलाच्या मागणीसाठी दिल्लीवारी करणाऱयांकडे लक्ष देऊ नये तसेच याविषयी उघडपणे वाच्यता करणाऱयांविरोधात कारवाई करावी, अशी मागणी अरुणसिंग यांच्याकडे केली आहे.

Advertisements

भाजप राज्य प्रभारी अरुणसिंग यांनी बुधवारी मंत्र्यांशी तर गुरुवारी दिवसभर आमदारांशी चर्चा केली होती. दरम्यान, या दोन्ही बैठकीतील मुद्दय़ांवर शुक्रवारी सायंकाळी बेंगळुरातील भाजप कार्यालयात पार पडलेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत विचारविनिमय करण्यात आला. राज्यात कोरोना परिस्थितीत नेतृत्वबदलाची मागणी करून काही जणांनी गोंधळ निर्माण केला आहे. अशा नेत्यांवर कारवाई करण्यात यावी. तसेच पक्षातील गोंधळ दूर करावा, अशी मागणी राज्यातील नेत्यांनी केली आहे. तसेच काही नेते मुख्यमंत्री येडियुराप्पा यांना विरोध करून दिल्लीत हायकमांडच्या भेटीसाठी जात असल्याबद्दलही कोअर कमिटीच्या बैठकीत आक्षेप घेण्यात आला.

दिल्लीला जाऊन येणारे काही नेते येथे येऊन प्रसिद्धी माध्यमांसमोर वाटेल तशी विधाने करीत आहेत. त्यामुळे पक्षाच्या प्रतिमेला धक्का पोहोचत आहे. या गोंधळावर हायकमांडने तोडगा काढावा. सरकार आणि पक्षात समन्वय असणे गरजेचे असल्याने उघडपणे पक्ष किंवा सरकारविरोधात बोलणाऱयांना चाप लावा, अशी मागणी केंद्रीयमंत्री सदानंद गौडा यांनी अरुणसिंग यांच्याकडे केली आहे.

कोअर कमिटीच्या बैठकीनंतर अरुणसिंग हे रात्रीच दिल्लीला परत रवाना झाले. सोमवारी ते भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह पक्षातील वरिष्ठ नेत्यांची भेट घेऊन अहवाल सादर करण्याची शक्यता आहे. त्यानंतरच राज्यातील परिस्थिती हाताळण्यासंदर्भात ठोस निर्णय घेतील. राज्यात मुख्यमंत्री बदल करावा का, याबाबतही भाजप हायकमांड सावध भूमिका घेणार आहे. आवश्यकता भासली तर जे. पी. नड्डा स्वतः बेंगळुरात चर्चेसाठी येण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

नेतृत्व बदलाविषयी विधाने करणाऱयांवर कारवाई ः आर. अशोक

नेतृत्व बदलाविषयी उघडपणे विधाने केलेल्यांविरुद्ध काही दिवसांत कठोर कारवाई करण्याचा निर्णय राज्य भाजप कोअर कमिटीच्या बैठकीत घेण्यात आला आहे, अशी माहिती महसूलमंत्री आर. अशोक यांनी दिली आहे. कोअर कमिटीच्या बैठकीनंतर पत्रकारांशी ते बोलत होते. बैठकीत पक्षाच्या नेतृत्वाविषयी चर्चा झालेली नाही. येडियुराप्पा हेच आपले नेते आहेत. अरुणसिंग यांनी देखील राज्यातील मुख्यमंत्री बदलणार नसल्याचे स्पष्टपणे सांगितले आहे. 26 जून रोजी बेंगळुरात पुन्हा कोअर कमिटीची बैठक होईल. तर 1 जुलैपासून 15 जुलैपर्यंत पक्षाच्या जिल्हा कार्यकारिणीची बैठक आयोजिण्याचा निर्णयही घेण्यात आल्याचे आर. अशोक म्हणाले.

Related Stories

हकालपट्टीनंतर प्रशांत किशोर यांनी मानले नितीश कुमारांचे आभार

prashant_c

बंगालमधील सत्तांतर निश्चित – भाजप अध्यक्ष

Patil_p

तरीही महिलांच्या तुलनेत जीवाला अधिक धोका : प्रतिजैविकांप्रकरणी आघाडीवर

Patil_p

कर्नाटकः जीएसटी अधिकाऱ्याला लाच घेताना अटक

triratna

आगामी विधानसभा समविचारी पक्षांसोबत लढणार

datta jadhav

‘इफ्फी’त पुढील वर्षी खासगी क्षेत्रालाही स्थान

triratna
error: Content is protected !!