Tarun Bharat

गोव्याची डाळ कुजली, साखरही वितळली

कोरोना काळात केंद्र सरकारने दिली होती : मदत पोहोचली नाही लोकांपर्यंत,नागरी पुरवठा खात्याचा गलथान कारभार

प्रतिनिधी /पणजी

ऐन कोविड काळात अन्नासाठी दाहीदिशा फिरणाऱया जनतेसाठी केंद्र सरकारने दिलेली तुरडाळ नागरी पुरवठा खात्याने गलथान कारभारामुळे कुजवून टाकली. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर आता आणखी एक प्रकरण उघडकीस आले असून या खात्यामार्फत जनतेला वितरीत करण्यासाठी मोदी सरकारने दिलेली 10. 310 मॅट्रिक टन साखर वितळून गेल्याचा आणखी धक्कादायक अहवाल उघडकीस आला आहे. या खात्याच्या तत्कालीन संचालकाने खात्यात घातलेला गोंधळ आता उघड झाला असून मुख्यमंत्री आता नेमकी कोणती कारवाई करतात हे आता पहावे लागेल.

प्राप्त माहितीनुसार, अत्यंत महागडी अशी तुरडाळ सरकरच्या नागरी पुरवठा खात्याच्या गोदामामध्ये सडून गेल्याने सरकारला सुमारे अडीच कोटी रुपयांचा फटका बसला आहे, शिवाय ज्या शेतकऱयांनी ही डाळ तयार करण्यासाठी अथक प्रयत्न केले आणि घाम गाळले ते वाया गेले. शिवाय गरीबाचा घासही गेला. यामुळे जनतेत प्रचंड संतापाची लाट पसरली आहे. नागरी पुरवठा खात्याने या डाळीची विल्हेवाट लावण्यासाठी आता निविदा काढल्या आहेत. अशा पद्धतीची नामुष्की गोवा सरकारवर पहिल्यांदाच आली आहे.

लाखो रुपयांची साखर वितळली

नागरी पुरवठा खात्याचा आणखी एक गलथान कारभार उघडकीस आला आहे. या खात्याच्या काणकोण, सांगे, सासष्टी, फोंडा, होंडा, सांखळी, पेडणे, पणजी, मुरगाव आणि म्हापसा येथील एकूण 11 गोदामामधील 10.310 मॅट्रिक टन साखर विनावापर आणि अधिकाऱयांनी केलेल्या हेळसांडीमुळे अक्षरशः वितळून गेली आहे.

अधिकाऱयाविरुद्ध सरकार कारवाई करणार ?

या खात्यावर एक निष्क्रीय संचालक काम करीत होता. या पूर्वी हा अधिकारी मडगाव येथे होता, तिथे कर्मचाऱयांशी वाद घालत बसला म्हणून त्याची पणजीत कला अकादमीवर नियुक्ती करण्यात आली होती. जाईल तिथे वादात सापडणारा हा अधिकारी नागरी पुरवठा खात्यावर येऊन बसला. या खात्याची कशी वाट लावली याची एक एक प्रकरणे आता बाहेर पडू लागलीत. या मुळे सरकारला कोटय़वधी रुपयांचा फटका बसला आहे.

प्रथम डाळ प्रकरणावरुन तर आता साखरेमुळे रु. 35 लाखांचा फटका सरकारला बसला असून गरीबांपर्यंत हे खाद्य न पोचवता त्याची नाशाडी करण्यास भाग पडलेल्या या वामनगोठी अधिकाऱयाविरुद्ध आता तरी सरकार कडक कारवाई करणार काय?

दक्षता खात्याकडे पोहचली तक्रार

दरम्यान, नागरी पुरवठा खात्याने 242 मॅट्रिक टन कुजलेल्या तुरडाळ प्रकरणाची एक फाईल दक्षता खात्याकडे पाठविली आहे. कोविडच्या काळात 400 मॅट्रिक टन डाळ खरेदी केली होती. मात्र त्याचे वितरण व्यवस्थित झाले नव्हते. या खात्याचे सचिव संजित रॉड्रीग्स यांनी सदर प्रकरणाची फाईल दक्षता खात्याकडे पाठविली असून त्याची चौकशी करून या प्रकरणाला जबाबदार कोण या संदर्भात अहवाल सादर करण्याची शिफारस केली आहे.

Related Stories

श्रीमद् विद्याधीशतीर्थ स्वामी महाराजांच्या चतुर्मासाला प्रारंभ

Patil_p

कनिष्ठ अधिकाऱयांच्या आशिर्वादाने चेक नाक्यावरून वाहने गोव्यात

Omkar B

सांगे तालुक्यातील सात पंचायतींसाठी 84.86 टक्के मतदान

Amit Kulkarni

बेकायदा रेती उत्खननावरुन प्रशासनास दणका

Amit Kulkarni

गावी जाण्याच्या ओढीने पंचायतीमध्ये मजुरांच्या रांगा

Omkar B

कुंडईतील अपघातात एक ठार ; 6 जखमी

Patil_p