पोलिसांत तक्रार करणार असल्याचे पत्रकारांना दिली माहिती
मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्याकडे तक्रार, पोलिसांत तक्रार करणार असल्याचे पत्रकारांना दिली माहिती
प्रतिनिधी/ सातारा
आम्ही पालिकेकडून फोन आला की लगेच हजर होतो. कुठेही झाड पाडायचे असेल तर खडसायचे असेल तर काम करतो. असे असताना आम्हाला मानधन मात्र कोणाला तीन हजार, केणाला चार हजार, कोणाला दोन हजार देऊन बोळवण केली जाते. प्रत्यक्षात आमचे मानधन हे जास्त आहे. आमच्या मानधनावर डल्ला ठेकेदार मारत आहे, अशी तक्रार वृक्ष विभागातील कंत्राटी कर्मचाऱयांनी सातारा पालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्याकडे केली असून फसवणुकीचा गुन्हा सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी पत्रकारांना कंत्राटी कर्मचाऱयांनी दिली.
शुक्रवारी निवेदन द्यायला आले तेव्हा विशाल गुजले, आकाश बडेकर, दत्तात्रय देडगे, सुनील लाड, आदित्य कांबळे, सुरज बगडेकर, गणेश खुडे, महादेव सकटे यांची उपस्थिती होते. मीडियाशी बोलताना हे म्हणाले, ठेकेदारांकडून आमची पिळवणूक केली जात आहे. प्रत्यक्षात आम्हाला मानधन फार तुटपूंजे दिले जाते. कामावर 50 जण असल्याचे दाखवून मानधन काढले जातात. मानधनातून पीएफ कट केला जातो. प्रत्यक्षात आमचा पीएफ खात्यावर भरला जातो का?, आमचे पूर्ण मानधन आम्हाला दिले जात नाही. ठेकेदारांकडून अधिकाऱयांना पैसे द्यावे लागतात याचे कारण सांगून आमचे पैसे कट करतो. ही आमची फसवणूक आहे. ठेकेदार की अधिकारी आमच्या पैशावर डल्ला मारते आहे. यामुळे आमच्यावर अन्याय होत आहे. याबाबत आम्ही पोलिसात तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.