घरांची पडझड, किनारी भागांतील शॅक्स, तंबू, रेस्टॉरंट्सना तडाखा, बागायतींचे नुकसान, वीज खात्याची 10 लाखांहून अधिक हानी
प्रतिनिधी /काणकोण
ढगांचा गडगडाट आणि सोसाटय़ाच्या वाऱयासहित सोमवारी रात्री काणकोण तालुक्यात पडलेल्या अवकाळी पावसाच्या दणक्याने घरांची पडझड, भातशेती, बागायतींची त्याचप्रमाणे किनारी भागातील व्यवसायांची मोठय़ा प्रमाणात हानी झाली आहे.
किनारी भागांतील पाळोळे, होवरे, आगोंद येथील पर्यटन व्यवसायावर याचा मोठय़ा प्रमाणात परिणाम झाला आहे. किनारपट्टीवरील हंगामी शॅक्सवरील आच्छादने उडून गेली आहेत. कित्येक रेस्टॉरंटमधील खुर्च्या सोसाटय़ाच्या वाऱयाच्या माऱयाने दुसरीकडे जाऊन पडल्या. या शॅक्स तसेच रेस्टॉरंटमध्ये काम करणाऱया कामगारांची तारांबळ उडून कित्येक ठिकाणी वीजवाहिन्यांवर कोसळलेल्या माडांमुळे पाळोळे, होवरे या भागांतील वीजपुरवठा खंडित झाल्याची माहिती पाळोळेचे माजी नगरसेवक दिवाकर पागी यांनी दिली. मात्र वीज खात्याचे कर्मचारी वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी धडपडत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पाळोळे, होवरे या भागांत वादळी वाऱयाच्या माऱयामुळे ज्या ज्या ठिकाणची घरे त्याचप्रमाणे शॅक्स, तंबू यांची हानी झाली त्यांची नगराध्यक्ष सायमन रिबेलो यांनी पाहणी केली.
आगोंद येथे घराची मोडतोड
आगोंद किनाऱयावरील पर्यटन व्यवसायावर या वादाळाचा परिणाम झालेला असून किनाऱयालगत असलेल्या एका शॅक्सची पाण्याची टाकी वाऱयाने अन्यत्र फेकली गेली तसेच या शॅक्सच्या शेजारी असलेले येसू शांताराम पागी या गरीब व्यक्तीच्या घराची हानी झाली आहे. वाऱयाचा वेग इतका जबरदस्त होता की, त्या माऱयाने घराची मोडतोड झाली, सुदैवाने मनुष्यहानी टळली.
वीज खात्याचे सर्वाधिक नुकसान
वादळी वाऱयामुळे एकटय़ा पाळोळे आणि लगतच्या परिसरांत 10 पेक्षा अधिक माड वीजवाहिन्यांवर कोसळले आहेत. इतर भागांत देखील वीजवाहिन्या तुटल्या असून अंदाजे 10 लाख रुपयांपेक्षा अधिक नुकसान वीज खात्याला झालेले आहे, अशी माहिती साहाय्यक अभियंता संजय ना. गावकर यांनी दिली.
बागायतींची भरपूर हानी
या वादळामुळे खोतीगाव, गावडोंगरी त्याचप्रमाणे अन्य भागांत माड, आंबे, केळी, फणसाची झाडे उन्मळून पडून बागायतांची मोठय़ा प्रमाणात हानी झाली आहे, अशी माहिती खोतीगावचे माजी सरपंच दया उर्फ उमेश गावकर यांनी दिली. या परिसरांतील भाज्यांच्या पिकावरही त्याचा परिणाम झाला आहे. नेमकी माहिती अजून मिळालेली नसली, तरी ज्या शेतकऱयांना या वादळाचा फटका बसला आहे ते शेतकरी काणकोणच्या विभागीय कृषी कार्यालयात येऊन नुकसान भरपाई सरकारकडून मिळावी यासाठी अर्ज भरून देत आहेत, अशी माहिती काणकोणचे विभागीय कृषी अधिकारी कीर्तिराज ना. गावकर यांनी दिली.
सोमवारी रात्री आलेल्या वादळी वाऱयाच्या माऱयाने करमल घाटात मोठय़ा प्रमाणात झाडे कोसळली. काणकोणच्या अग्निशामक दलाने घटनेचे गांभीर्य ओळखून रात्रभर काम करून राष्ट्रीय हमरस्ता मोकळा करण्याचे काम केले.
घरांच्या हानीसंदर्भात मदतीचे सोपस्कार
काजुमळ, खोल येथील फ्रान्सिस्क कार्दोज, कुसके, खोतीगाव येथील पांडू पावटो गावकर, सुकटो जानू गावकर, गजानन पावटो गावकर, पणसुलेमळ येथील नवेत चिमोट वेळीप यांच्या घरांची पडझड झाली आहे अािण आपत्कालीन व्यवस्थापन समितीमार्फत त्यांना आर्थिक मदत देण्यासंबंधीचे सोपस्कार काणकोणच्या मामलेदार कार्यालयातून करण्यात आले आहेत, अशी माहिती मामलेदार मनोज कोरगावकर यांनी दिली. दिवनबाग, धवलखाजन येथील काही घरांवरही या वादळी वाऱयाचा परिणाम झालेला आहे.