शाळा सुटल्यानंतर घडली घटना : खानापुरातील कन्नड शाळेतील विद्यार्थ्यांचे दैव बलवत्तर
प्रतिनिधी /खानापूर
शहरातील स्टेशनरोडवरील कन्नड उच्च प्राथमिक शाळेच्या आवारातील वटवृक्षाची फांदी पडल्याने तीन वर्गखोल्या जमीनदोस्त झाल्या. ही घटना गुरुवारी सायंकाळी 6 वाजता घडली. शाळा सुटल्यानंतर झाड कोसळल्याने मोठी दुर्घटना टळली.
कन्नड उच्च प्राथमिक आमदार शाळेत पहिली ते सातवीपर्यंत वर्ग आहेत. यामध्ये 635 पटसंख्या आहे. कन्नड शाळा आवारात वेगवेगळय़ा ठिकाणी वर्गखोल्या आहेत. पहिली ते तिसरी वर्ग भरत असलेल्या ठिकाणी शेजारील सती देवस्थानच्या आवारातील वटवृक्षाची मोठी फांदी या वर्गखोल्यावर पडल्याने तिन्ही वर्गखोल्या जमीनदोस्त झाल्या. सायंकाळी सहानंतर ही घटना घडल्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
मुख्याध्यापिका श्रीमती कुजी यांनी नगरपंचायत, बीईओ कार्यालय, वनखात्याला याबाबत माहिती दिली आहे. या ठिकाणी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी बाबासाहेब माने, नगराध्यक्ष मजहर खानापुरी यांनी प्रत्यक्ष पाहणी करून याबाबत योग्य मदत करण्याचे आश्वासन दिले. सती देवस्थानचे प्रकाश चव्हाण, बाळाराम सावंत, पुंडलिक खडपे, मनोज रेवणकर यांनीही या ठिकाणी भेट दिली. वर्गखोल्यांवर पडलेले झाड हटविण्यासाठी वनखाते व सती देवस्थानचे कार्यकर्ते यांच्या मदतीने झाड बाजूला करण्यात आले.