वार्ताहर /नंदगड
अन्नाच्या शोधात जंगली जनावरे आता शेतवडीत फिरत आहेत. जंगली डुकरांकडून ऊस पिकाची खाऊन तुडवून नुकसान करण्याचा प्रकार नंदगड भागात सुरू आहे. शनिवारपासून दोन दिवस नंदगड,हेब्बाळ गावच्या हद्दीत असलेल्या ऊस पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान जंगली डुकरांकडून करण्यात आले आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग संकटात सापडला आहे.नंदगड गावच्या पश्चिमेला जंगल आहे. या जंगलात रानडुक्कर, अस्वल व अन्य प्राणी आहेत. सध्या जंगलात जंगली जनावरांना खाण्यासाठी मुबलक प्रमाणात खाद्य नाही. नंदगड व हेब्बाळ परिसरात जंगलाच्या बाजूला शेतवडी आहे. या शेतीवाडीत भात पिकाची पेरणी केलेली आहे. तर काही भागात उसाची लागवड करण्यात आली आहे.
उसाचे पीक बऱ्यापैकी आले आहे. याच पिकात संध्याकाळी जंगली डुकरांचा कळप घुसून नुकसान करत आहेत. जंगलाच्या बाजूला असलेल्या अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जंगली जनावरांच्या भितीने पिकांची राखण करण्यासाठी शेतकऱ्यांनी रात्रीच्या वेळी शेतात जाणे टाळले आहे. त्यामुळे जंगली जनावरांचे फावले आहे. ज्या शेतकऱ्याच्या शेतातील ऊस पिकांचे नुकसान झालेले आहे. अशा शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी वन खात्याच्यावतीने करून त्यांना शासनातर्फे नुकसानभरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी केली जात आहे.