सरवडे/प्रतिनिधी
पावसाळ्यापूर्वी व पावसाळ्यात अचानक वीज कोसळून अनेक दुर्घटना घडतात. त्यामध्ये जीवितहानीही मोठय़ा प्रमाणात होते. विशेषतः शेतकरी वर्गाला अशा दुर्घटनांना सामोरे जावे लागते. अशा घटनांपासून बचाव होण्यासाठी दामिनी ऍप उपयुक्त ठरणार असून ते गुगल प्ले स्टोअर वर उपलब्ध आहे. लोकांनी सुरक्षिततेसाठी आपल्या मोबाईल फोनमध्ये हे अँप डाऊनलोड करावे यासाठी शासकीय यंत्रणेकडून जनजागृती केली जाणार आहे.
मान्सून कालावधीत विशेषतः जून व जुलै महिन्यात वीज पडून जीवित हानी होण्याच्या घटना अधिक घडतात. वीज पडून जीवितहानी होवू नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून पृथ्वी मंत्रालयाने ’दामिनी’ ऍप तयार केले आहे. या ऍपची माहिती व उपयोग सर्वांना होण्याच्या दृष्टीने शासनाच्या सर्व यंत्रणा, अधिकारी व कर्मचारी यांनी हे ऍप डाऊनलोड करून त्यांच्या माध्यमातून सर्वांनी वापर करण्याबाबत प्रवृत केले जाणार आहे. हे ऍप जीपीएस लोकेशनने काम करत असून वीज पडण्याचा 15 मिनिटापूर्वी या ऍपमध्ये स्थिती दर्शवण्यात येते. आपल्या परिसरात वीज पडणार असल्याची पूर्वसूचना मिळाल्यास त्या ठिकाणापासून सुरक्षितस्थळी जाता येणार आहे. तर झाड किंवा धोकादायक ठिकाणी असल्यास व विजेची शक्यता वर्तवल्यास दक्षता घेता येणार आहे. वीजेचा धोका टाळण्यासाठी सामान्य नागरिकांना हे ऍप वापरण्याबाबत प्रवृत्त केले जाणार आहे.
शेतकऱ्यांना उपयुक्त
शेतकरी वर्ग शेतात काम करीत असताना अचानकपणे वादळी वारा व वीजांचा कडकडाट सुरू होतो. मे-जूनच्या दरम्यान वीज कोसळण्याच्या घटना अधिक असतात. अशा वेळी शेतात काम करणाऱया शेतकऱयांच्या बाबतीत दुर्घटना घडण्याच्या घटना अनेकदा घडल्या आहेत. त्यामध्ये शेतकरी व जनावरे दगावली आहेत. या ऍपच्या माध्यमातून विजेची माहिती मिळाल्यास सतर्क राहता येणार आहे. त्यामुळे शेतकऱयांसाठी हे ऍप उपयुक्त ठरणार आहे. तर गावातील सर्व स्थानिक शासकीय अधिकारी, कर्मचारी व पदाधिकारी यांनी हे ऍप डाऊनलोड करून हाताळल्यास होणाऱया अलर्टनुसार आवश्यक पूर्वसुचना गावातील सर्व नागरिकांना देवून होणारी जीवितहानी टाळता येणार आहे.