एकमेव अर्ज आल्याने बिनविरोध निवड : आज होणार अधिकृत घोषणा
प्रतिनिधी /मडगाव
मडगाव पालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी भाजपाच्या दामोदर शिरोडकर यांचा एकमेव उमेदवारी अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड पक्की झाली आहे. यामुळे आज बुधवारी नगराध्यक्ष निवडणुकीसाठी बोलाविण्यात आलेली पालिका मंडळाची खास बैठक आता केवळ औपचारिकता ठरणार आहे.
भाजप उमेदवार शिरोडकर यांनी एकूण तीन उमेदवारी अर्ज मुख्याधिकारी मानुएल बार्रेटो यांच्याकडे सादर केले. नगरसेविका डॉ. रोनिता आजगावकर, नगरसेवक कामिलो बार्रेटो आणि नगरसेवक दामोदर वरक यांनी या उमेदवारी अर्जांना अनुमोदन दिले आहे. दुपारपर्यंत शिरोडकर सोडून अन्य कोणाचा अर्ज आला नसल्याचे मुख्याधिकारी बार्रेटो यांनी सांगितले.
आज बुधवारी नगराध्यक्ष निवडीसाठी बैठक होणार आहे. जरी आपला एकमेव अर्ज आला असला, तरी निर्वाचन अधिकारी अर्ज पडताळून जोपर्यंत अधिकृत घोषणा करत नाही तोपर्यंत आपली नगराध्यक्षपदी निवड झाली आहे असे गृहीत धरू शकत नसल्याची प्रतिक्रिया शिरोडकर यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.
अध्यादेश लोकशाही मजबूत करणारा : शिरोडकर
हात उंचावून मतदान करण्यासंबंधीचा अध्यादेश लोकशाही मजबूत करणारा असल्याचे शिरोडकर यांनी सांगितले. महिन्याभरात दुसऱयांदा उमेदवारी अर्ज भरत असल्याने आपणास निवडीबाबत किती विश्वास आहे असे अर्ज भरल्यानंतर लगेच शिरोडकर यांना चिचारले असता ते म्हणाले की, वृत्तपत्रांमध्ये आपणास 16 नगरसेवकांचा पाठिंबा असल्याचे छापून आलेले असून त्यामुळे आपण यावर जास्त भाष्य करण्याची गरज नाही.
गोवा फॉरवर्ड ठरल्याप्रमाणे अलिप्त
गोवा फॉरवर्ड गटाने आधीच जाहीर केल्याप्रमाणे नगराध्यक्षपदाच्या निवडीपासून ते अलिप्त राहिले आहेत. त्यामुळे नगराध्यक्षपदासाठी निवडणूक घेण्याची आता आवश्यकता भासणार नाही. हात उंचावून मतदान करण्यासंबंधी अध्यादेश काढण्यात आला असला, तरी शिरोडकर यांचा एकमेव अर्ज आलेला असल्याने हात उंचावून मतदान करण्याची आवश्यकताही आज भासणार नाही. नगराध्यक्षपदी निवडीची अधिकृत घोषणा आज 12 रोजी सकाळी 11 वा. होणाऱया बैठकीत होणार आहे. यासाठी विकास गावणेकर, अतिरिक्त सचिव (वित्त), सचिवालय, पर्वरी यांची निर्वाचन अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
नगराध्यक्षपदासाठी अर्ज भरताना शिरोडकर यांच्यासोबत अनुमोदन दिलेल्या नगरसेवकांसह सदानंद नाईक, महेश आमोणकर, नुकतेच गोवा फॉरवर्डमधून भाजपात प्रवेश केलेले राजू नाईक हे नगरसेवक तसेच मडगाव भाजप मंडळाचे अध्यक्ष रूपेश महात्मे आणि गोपाळ नाईक उपस्थित होते.
कोणी आला व गेला म्हणून भाजपचे कार्य थांबत नाही : महात्मे
भारतीय जनता पक्षाचे काम हे अविरत चालूच असते. कोणी पक्षात आला व गेला म्हणून ते खंडित होत नसते, असे भाजपाच्या मडगाव मंडळाचे अध्यक्ष रूपेश महात्मे यांनी स्पष्ट केले आहे. भाजपाच्या नेत्यांना सुमारे 17 वर्षे मडगाव पालिकेवर पक्षाचा ध्वज फडकविता आला नव्हता व आमदार दिगंबर कामत यांनी ते एका महिन्यातच करून दाखविले आहे, असे पत्रकारांनी नजरेस आणून दिले असता त्यांनी वरील प्रतिक्रिया व्यक्त केली. आमचे मुळात 9 भाजप नगरसेवक होते व कामत यांच्या प्रवेशामुळे त्यांचे 7 नगरसेवक मिळून भाजपाच्या हातात पालिकेतील सत्ता आली आहे, असे ते म्हणाले. आम्ही पक्षासाठी जे काम करत आलो होतो त्यामुळे 1994 मध्ये दिगंबर कामत विजयी झाले होते याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, असे महात्मे यावेळी म्हणाले. नगरसेवकांना कोणत्याही भीतीपोटी हॉटेलमध्ये ठेवण्यात आले नव्हते. एकत्र आल्यानंतर विचारविनिमय होतो. त्यातून चांगली विकासकामे करण्यासाठी कल्पना सूचतात, असे एका प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी सांगितले.