प्रतिनिधी /बेळगाव
दूधसागर येथील धबधब्याला पोहोचण्यासाठी युवकांचा धोकादायक प्रवास सुरू आहे. दूधसागर धबधब्यानजीक रेल्वे केवळ 1 मिनिट थांबते. या वेळेत रेल्वेत चढणे व उतरण्यासाठी स्पर्धा सुरू असते. यामध्ये अनेकांना अपघातही होत असले तरी ही जीवघेणी स्पर्धा कशासाठी असा प्रश्न सर्वसामान्य उपस्थित करीत आहेत.
मान्सूनला सुरूवात झाली की पश्चिम घाटातील धबधबे प्रवाहीत होतात. लोंढा ते वास्को या रेल्वेमार्गावर कॅसलरॉक नजिक असणाऱया दूधसागर धबधबा पाहण्यासाठी मोठय़ा प्रमाणात पर्यटक जातात. गोव्यातूनही अनेक पर्यटक दूधसागर येथे येतात. दूधसागरला पोहोचण्यासाठी रेल्वेने दूधसागर रेल्वे स्थानकापर्यंत जावे लागते. बेळगावहून वास्कोला जाणाऱया रेल्वेतून पर्यटक दूधसागरला पोहोचतात.
दूधसागर येथे रेल्वेस्थानकावर रेल्वेला थांबा नाही. परंतु घाटमाथा असल्यामुळे काही क्षण या ठिकाणी रेल्वे थांबते. यामुळे पर्यटक या संधीचा उपयोग करत दूधसागर पाहण्यासाठी जातात. परंतु बऱयाचवेळा रेल्वेच्या डब्यांचे दरवाजे आतून बंद केले जात असल्याने रेल्वेत चढण्यासाठी चढाओढ सुरू होते. महिला पर्यटकांची तर धांदल उडत आहे. प्रवासी रेल्वेत चढत असतानाच रेल्वे मार्गस्थ होते. यामुळे मोठा धोका संभवत असून, हे प्रकार वेळीच थांबविणे गरजेचे आहे.
रविवारी होतेय तुफान गर्दी
दूधसागरला पोहोचण्यासाठी बेळगावहून वास्कोला जाणाऱया एक्स्प्रेससाठी रात्री 1 वा. प्रवासी स्थानकात जमत आहेत. विरूद्ध दिशेने जागा मिळेल तिथे तरूण रेल्वेत चढत आहेत. याचबरोबर सकाळी 5.30 वा. जाणाऱया साप्ताहिक रेल्वेलाही प्रवाशांची गर्दी होत आहे. रविवार दि. 3 रोजी दूधसागर येथे बेळगावच्या पर्यटकांची तुफान गर्दी झाल्याचे दिसून आले.