शेतकऱयांच्या जिवाला धोका : इतरत्र हलविण्याची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
बसुर्ते येथील शिवारात ट्रान्स्फॉर्मर कोसळण्याच्या अवस्थेत एका बाजूला कलंडला आहे. त्यामुळे शेतकऱयांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. याबाबत हेस्कॉमकडे तक्रार देऊनदेखील दुर्लक्ष झाल्याने शेतकऱयांतून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
बसुर्ते येथील घुमटे शिवारात हा ट्रान्स्फॉर्मर मागील काही दिवसांपासून मातीत रुतला आहे. कमी उंचीवर असलेला हा ट्रान्स्फॉर्मर शिवारात काम करणाऱया शेतकऱयांसाठी धोकादायक ठरू लागला आहे. पाऊस पडल्याने ट्रान्स्फॉर्मर ठेवलेले विजेचे खांब मातीत रुतले आहेत. त्यामुळे ट्रान्स्फॉर्मर एका बाजूला पूर्णपणे कलंडला आहे. दरम्यान, जमिनीपासून ट्रान्स्फॉर्मरची उंची अगदी कमी असल्याने शेतकऱयांबरोबर जनावरांनादेखील हा ट्रान्स्फॉर्मर धोकादायक बनला आहे. शेतकरी किंवा जनावराचा नकळत स्पर्श झाल्यास मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे हेस्कॉमने याकडे लक्ष पुरवून धोकादायक ट्रान्स्फॉर्मर दुसरीकडे हलवावा, अशी मागणी होत आहे.
खरीप हंगामातील पेरणी कामासाठी शेतकऱयांची धांदल सुरू आहे. दुसरीकडे शेतातच ट्रान्स्फॉर्मर धोकादायक स्थितीत आहे. त्यामुळे शिवारात फिरणेदेखील शेतकऱयांना धोक्याचे ठरत आहे.