वृत्तसंस्था/ कोलंबो
लंकन क्रिकेट मंडळाने फलंदाज धनुष्का गुणतिलका याच्यावर कारवाई केली असून त्याला क्रिकेटच्या सर्वच प्रकारातून निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलियामध्ये गुणतिलकाने एका महिलेवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याने त्याला पोलिसांनी अटक केली होती. तसेच त्याला जामिनही नाकारण्यात आला होता.
ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या आयसीसीच्या टी-20 क्रिकेट स्पर्धेत सहभागी झालेल्या लंकन संघातील तो भरवशाचा फलंदाज म्हणून ओळखला गेला. सुपर-12 फेरीतील शेवटच्या सामन्यात इंग्लंड संघाकडून लंकन संघाला पराभव पत्करावा लागला. लंकन संघाचे आव्हान प्राथमिक फेरीतच संपुष्टात आले. या सामन्यापूर्वी गुणतिलकाला ऑस्ट्रेलियात एका महिलेशी असभ्य वर्तन केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी अटक केली होती. सदर महिलेने गुणतिलकाविरुद्ध रितसर तक्रार नोंदविली होती. गुणतिलकाकडून बेशिस्त वर्तन घडल्याने लंकन क्रिकेट मंडळाने त्याच्यावर ही कारवाई केली आहे. सोमवारी या प्रकरणाच्या झालेल्या सुनावणीवेळी ऑस्ट्रेलियातील न्यायालयाने त्याला जामीनही नामंजूर केला.