वार्ताहर/टाळसुरे
दापोली तालुक्यामधील मुरुड येथे बांधण्यात आलेले साई रिसॉर्ट आणि सी कोच रिसॉर्ट बांधकाम करताना सीआरझेडच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी अनिल परब यांच्यासह अन्य दोघांना दापोली न्यायालयाने समन्स बजावले आहे. त्यानुसार परब यांना न्यायालयात हजर रहावे लागणार आहे.
साई रिसॉर्ट, सी कोच रिसॉर्टचे बांधकाम करताना पर्यावरण संरक्षण कायदा 1986 अंतर्गत सीआरझेड मापदंडांचे उल्लंघन झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी अनिल परब, सदानंद कदम, पुष्कर मुळे यांना दापोली न्यायालयात हजर राहण्याबाबत समन्स बजावले आहे. पर्यावरण आणि वन मंत्रालयाने 17 नोव्हेंबर 2021 रोजी साई रिसॉर्ट आणि सी कोच रिसॉर्टला कारणे दाखवा नोटीस व त्यानंतर कलम 5 च्या तरतुदीनुसारही नोटीस जारी केली होती.
पर्यावरण संरक्षण कायदा 1986 द्वारे 31 जानेवारीच्या आदेशाद्वारे साई रिसॉर्ट व सी कोच रिसॉर्ट यांना निर्देश देऊन अनधिकृत संरचना काढून टाकण्यास सांगितले होते. या आदेशाचे पालन झाले नसल्याने तसेच पर्यावरण व वन मंत्रालयाने बनवलेल्या नियमांचे उल्लंघन झाल्याने 14 डिसेंबरपर्यंत अनिल परब यांसह सदानंद कदम, पुष्कर मुळे यांना दापोली न्यायालयात चौकशीसाठी हजर रहावे लागणार आहे.