प्रतिनिधी / बेळगाव : बेळगावात उद्या महाराष्ट्र एकीकरण समितीचा महामेळावा होणार आहे. यासाठी कोल्हापूरचे खासदार आणि महाराष्ट्र सरकारच्या सीमाप्रश्नी नेमलेल्या तज्ज्ञ समितीचे अध्यक्ष धैर्यशील माने यांना आमंत्रित करण्यात आले आहे. परंतु त्यांना बेळगावात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. जिल्हा दंडाधिकारी नितेश पाटील यांनी आज रविवारी दुपारी पत्रकाद्वारे हा आदेश बजावला.
बेळगावातील टिळकवाडीतील व्हॅक्सिन डेपो मैदानावर महामेळाव्याचे आयोजन केले आहे.त्यासाठी तज्ज्ञ समितीचे अध्यक्ष खा. धैर्यशील माने यांना आमंत्रित करण्यात आले आहे. यासंबंधी माने यांनी कर्नाटक सरकारला आपल्या दौऱ्याचा अधिकृत कार्यक्रमही पाठविला आहे. तरीही कर्नाटक सरकारने त्यांना कायदा व सुव्यवस्था बिघडण्याशी शक्यता असल्याचे कारण देत प्रवेशबंदी केली आहे. जिल्हा दंडाधिकारी नितेश पाटील यांनी सीआरपीसी १९७३ कायद्याच्या कलम १४४ (३) अन्वये प्राप्त अधिकारांतर्गत हा निर्णय घेतला आहे.
खा. माने यांच्या दौऱ्यामुळे बेळगावात कन्नड-मराठी भाषकांमध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता असल्याने खा. माने यांना बेळगावात प्रवेशबंदी करण्यात आले असल्याचे प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगण्यात आले आहे.