गॅस वाहिनीच्या खोदकामात तोडल्या भुमीगत वीज वाहिन्या
प्रतिनिधी / वास्को
इंडियन ऑईल अडाणी गॅस पाईप लाईनच्या खोदकामामुळे भुमीगत वीज वाहिन्या तुटल्याने वास्को शहरासह परीसरातील विविध भागात बुधवारी मध्यरात्रीपासून वीज पुरवठा गायब झालेला आहे. गुरूवारी रात्री उशिरापर्यंत वीज पुरवठा सुरळीत झाला नव्हता. त्यामुळे वास्को व मुरगावमधील नागरिक त्रस्त बनले आहेत.
वास्को शहरात घालण्यात येणाऱया इंडियन ऑईल अडाणी गॅस वाहिनीच्या कामामुळे सध्या वास्कोतील लोकांना अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. संपूर्ण वास्को शहरात गॅस वाहिनी जोडण्यासाठी खड्डे खोदण्यात आलेले असून महिना पूर्ण झाला तरी हे खड्डे उघडेच आहेत. ते बुजवण्या आधीच नवनवीन खड्डे भर रस्त्यावर खोदण्यात येत आहेत. असाच एक खड्डा खोदताना शहरातील फा. जुझे वाझ रस्त्यावरील चेस चेम्बर्स इमारतीसमोरील भुमीगत वीज वाहिन्या तोडण्याचा प्रकार बुधवारी मध्यरात्री घडला. त्यामुळे वास्को शहरासह संपूर्ण मुरगाव मतदारसंघ आणि वास्को मतदारसंघातील बराच भाग अंधारात सापडला. वीज खंडीत झाल्याने उकाडा असहय़ झालेले लोक मध्यरात्रीच घराबाहेर पडून वीज खंडीत झाल्याच्या प्रकाराची चौकशी करू लागले. काहींनी पूर्ण रात्र जागूनच काढली. गॅस वाहिनीसाठी खड्डे खोदण्याचे काम बेपर्वाईने करण्यात येत असून या कामांना लोकांना त्रस्त केलेले आहे. काही दिवसांपूर्वीच हे काम करणाऱयांनी नुकताच डांबरीकरण करण्यात आलेला स्वातंत्रपथ मार्ग कोणत्याही परवान्यावीना खोदून लोकांच्या संतापात भर घातली होती. बुधवारी रात्री वीज वाहिन्या तोडून हे काम करणाऱयांनी कहरच केलेला आहे. पावसाळय़ात या खड्डय़ांची समस्या स्थानिक लोकांना अधिकच धोक्यात टाकण्याची शक्यता आहे.
बुधवारी मध्यरात्री सर्वत्र वीज पुरवठा खंडीत झाल्याचे समजताच वीज खात्याचे अधिकारी संजू म्हालसेकर व त्यांचे कर्मचारी बाहेर पडले. त्यांना पाहणीनंतर भुमीगत वीज वाहिन्या तोडण्यात आल्याचे समजले. त्यामुळे रात्रीच्या वेळीच चालणारे गॅस वाहिनीचे काम बंद ठेवण्यात आले व वीज वाहिन्या पुन्हा जोडण्याचे काम हाती घेण्यात आले. वीज खात्याचे सहाय्यक अभियंते संजू म्हालसेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार भुमीगत वीज वाहिन्या तोडण्यात आल्याने हेडलॅण्ड सडा, बोगदा, बायणा मांगोरहिल वास्को शहर अशा भागातील वीज पुरवठा पूर्णपणे खंडीत झाला. वीज पुरवठा गुरूवारी संध्याकाळपर्यंत सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. वास्कोत अर्ध्या शहरात वीज पुरवठा लवकर सुरळीत करण्यात यश आले. मात्र, अर्धे वास्को शहर आणि इतर भागात गुरूवारी रात्री साडे दहा वाजेपर्यंत वीज पुरवठा सुरळीत झाला नव्हता. भुमीगत वीज वाहिन्या तोडल्या प्रकरणी वीज खात्याने वास्को पोलीस स्थानकात तक्रार केली आहे. पोलिसांनीही घटनास्थळी येऊन पाहणी केली. आमदार दाजी साळकर यांनी या समस्येची घटना येऊन पाहणी केली.