प्रतिनिधी /बेळगाव
विसर्जन तलावावर सर्व सुविधा उपलब्ध करण्यात याव्यात, अशी मागणी करूनही रामेश्वरतीर्थ (जक्कीनहोंडा) तलाव परिसरात दिव्यांची व्यवस्था करण्यात आली नाही. अंधारामुळे मोबाईल टॉर्चच्या प्रकाशात गणेशमूर्ती विसर्जन करण्याची वेळ आली. मात्र दुसरीकडे कपिलेश्वरतीर्थ येथे घरगुती गणेशमूर्ती विसर्जनास बंदी असताना देखील या ठिकाणी दिवस-रात्र चार हायमास्ट सुरू आहेत.
एकीकडे अंधार दुसरीकडे दिवस-रात्र दिवे सुरू असल्याने महापालिकेच्या कारभाराबद्दल नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. गणेशोत्सव मोठय़ा उत्साहाने साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर शहरातील विसर्जन तलावांची स्वच्छता करून या ठिकाणी भाविकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध केल्या जातात. पण यावेळी रामेश्वरतीर्थ परिसरात दिव्यांची सुविधा उपलब्ध करण्याकडे महापालिकेचे दुर्लक्ष झाले होते. दीड दिवसाच्या गणपती विसर्जनावेळी केवळ एका दिव्याच्या प्रकाशात विसर्जन करण्याची वेळ आली. याबाबत तक्रार करूनदेखील मनपाच्या अधिकाऱयांनी दिवे सुरू करण्याकडे दुर्लक्ष केले होते. त्यामुळे पाचव्या दिवशी देखील मोबाईल टॉर्चच्या प्रकाशात श्रीमूर्तीचे विसर्जन करावे लागले.
मात्र, कपिलेश्वर मंदिराशेजारी असलेल्या कपिलतीर्थ तलाव परिसरात चार हायमास्ट रात्रंदिवस सुरू आहेत. जुन्या तलावामध्ये घरगुती गणेश विसर्जन करण्यात येत आहे. मोठय़ा तलावामध्ये घरगुती गणेशमूर्ती विसर्जनास परवानगी देण्यात आली नाही. मात्र, येथील पथदीप दिवसादेखील सुरू ठेवण्यात आले आहेत. मनपा प्रशासनाच्या बेफिकीर कारभाराबद्दल संताप व्यक्त करण्यात येत असून अधिकाऱयांच्या दुर्लक्षाबद्दल नाराजी व्यक्त केली जात आहे.