चहापानाअखेर न्यूझीलंड 4 बाद 128, पॉट्सचे 26 धावात 2 बळी
लंडन / वृत्तसंस्था
यजमान इंग्लंडविरुद्ध लॉर्ड्सवर खेळवली जात असलेली पहिली कसोटी दुसऱया दिवशी चहापानाअखेर रंगतदार स्थितीत पोहोचली होती. आपल्या पहिल्या डावात अवघ्या 132 धावा जमवता आलेल्या न्यूझीलंडने इंग्लंडचा पहिला डाव 141 धावांवर गुंडाळला. मात्र, नंतर चहापानाअखेर किवीज संघाचा दुसरा डावही 4 बाद 128 असा गडगडला. न्यूझीलंडचा संघ त्यावेळी 119 धावांनी आघाडीवर होता. डॅरेल मिशेल 76 चेंडूत 43 तर टॉम ब्लंडेल 39 धावांवर खेळत होते.
डॅरेल मिशेलला यष्टीरक्षक-फलंदाज टॉम ब्लंडेलची उत्तम साथ लाभली. ब्लंडेल चहापानाअखेर 39 धावांवर खेळत होता. या जोडीने पाचव्या गडय़ासाठी 72 धावांची अभेद्य भागीदारी साकारत संघाला थोडीफार सुस्थिती प्राप्त करुन देण्याचा प्रयत्न केला. ही जोडी क्रीझवर एकत्रित आली, त्यावेळी न्यूझीलंडचा संघ 4 बाद 56 असा झगडत होता.
3 कसोटी सामन्यांच्या या मालिकेत ज्याप्रमाणे इंग्लंडचा संघ 132 धावांना उत्तर देताना सर्वबाद 141 असा गडगडला, ते पाहता न्यूझीलंडचा संघ दुसऱया डावात मोठी धावसंख्या रचून यजमान संघावर दडपण आणण्याचा प्रयत्न करेल, असे स्पष्ट संकेत आहेत. ते मॅचविनिंग लीड घेऊ शकणार का, हे उर्वरित खेळात दिसून येईल.
यापूर्वी पहिल्या डावात अवघ्या 13 धावात 4 बळी घेणाऱया डरहॅमचा जलद गोलंदाज पॉट्सने दुसऱया डावातही उपाहारानंतर आपल्या भेदक गोलंदाजीची आणखी एकदा प्रचिती दिली. त्याने 10 षटकात 26 धावात 2 बळी, असे लक्षवेधी पृथक्करण नोंदवले. या सामन्यात दुसऱया डावातही त्याने किवीज कर्णधार केन विल्यम्सनची खेळी संपुष्टात आणली.
स्टार फलंदाज विल्यम्सनला बाद करण्यासाठी त्याला फक्त पाच चेंडू पुरेसे ठरले. शुक्रवारी विल्यम्सनने तिसऱया स्लीपमध्ये जॉनी बेअरस्टोकडे सोपा झेल दिला. विल्यम्सन 15 धावांवर बाद झाल्यानंतर न्यूझीलंडचा संघ 2 बाद 30 अशा अडचणीत होता. त्यानंतर पॉट्सने सलामीवीर टॉम लॅथमला (14) यष्टीमागे झेलबाद केले. चेंडूने बॅटची इतकी स्पष्ट कड घेतली होती की, यष्टीरक्षक बेन फोक्सला अपील करण्याचीही आवश्यकता भासली नाही.
मागील वर्षी लॉर्ड्सवरच द्विशतकाने कसोटी पदार्पण साजरे करणाऱया डेव्हॉन कॉनव्हेला येथे दुसऱया डावातही अपयश पदरी आले. मात्र, त्यानंतर न्यूझीलंडचे रग्बी प्रशिक्षक जॉन मिशेलचा सुपुत्र मिशेलने इंग्लिश कर्णधार बेन स्टोक्सला सलग दोन चौकार फटकावत उत्तम सुरुवात केली. बेन स्टोक्सने टाकलेल्या इनस्विंगरवर मिशेलने मिडविकेटच्या दिशेने दमदार चौकार फटकावत आपल्या डावाला शानदार प्रारंभ केला.
32 षटकाअखेर न्यूझीलंडचा संघ 4 बाद 90 धावांपर्यंत पोहोचला. स्टोक्सने मॅट पार्किन्सनला कसोटी क्रिकेटमधील पहिले गोलंदाजी स्पेल सोपवले. पार्किन्सनने थेट यष्टीवर मारा केला नसला तरी त्याने फलंदाजांना जखडून ठेवण्यात बऱयापैकी यश मिळवले.
त्यापूर्वी, त्याने इंग्लंडच्या डावात फलंदाजीला उतरल्यानंतर पहिल्या डावाअखेर 9 धावांची नाममात्र आघाडी मिळवून देण्यातही मोलाचा वाटा उचलला होता. पार्किन्सन फलंदाजीला उतरला, त्यावेळी इंग्लंडचा संघ 9 बाद 130 धावांसह दोन धावांनी पिछाडीवर होता. नंतर साऊदीच्या (4-55) गोलंदाजीवर दुहेरी धावा घेत त्याने खाते उघडले. या डावात त्याने 8 चेंडूत 8 धावा केल्या. पार्किन्सनच शेवटच्या गडय़ाच्या रुपाने बाद झाला आणि इंग्लंडचा डाव 141 धावांवर आटोपला. दिवसाच्या प्रारंभी इंग्लंडने 7 बाद 116 धावांवरुन डावाला पुढे सुरुवात केली आणि या धावसंख्येत त्यांनी केवळ 25 धावांची भर घातली.
संक्षिप्त धावफलक (चहापानाअखेर)
न्यूझीलंड पहिला डाव ः सर्वबाद 132.
इंग्लंड पहिला डाव ः 42.5 षटकात सर्वबाद 141 (झॅक क्राऊली 56 चेंडूत 7 चौकारांसह 43, ऍलेक्स लीस 77 चेंडूत 2 चौकारांसह 25, स्टुअर्ट ब्रॉड 9, मॅट पार्किन्सन 8, जेम्स अँडरसन नाबाद 7. अवांतर 22. टीम साऊदी 55 धावात 4 बळी, ट्रेंट बोल्ट 21 धावात 3 बळी, काईल जेमिसन 2-20, कॉलिन डे ग्रँडहोम 1-24).
न्यूझीलंड दुसरा डाव ः 43 षटकात 4 बाद 128 (डॅरेल मिशेल 76 चेंडूत नाबाद 43, टॉम ब्लंडेल 78 चेंडूत 4 चौकारांसह नाबाद 39, टॉम लॅथम 14, केन विल्यम्सन 15. अवांतर 3. मॅथ्यू पॉट्स 2-26, जेम्स अँडरसन, स्टुअर्ट ब्रॉड प्रत्येकी 1 बळी).