प्रतिनिधी /बेळगाव
दत्त दिगंबर दैवत माझे, निघालो घेऊन दत्ताची पालखी, अशा भक्तिगीतांच्या पार्श्वभूमीवर शहरातील दत्त मंदिरांमध्ये दत्त जयंती मोठ्या भक्तिभावाने साजरी करण्यात आली.
गोंधळी गल्ली येथील सार्वजनिक उत्सव मंडळातर्फे मंगळवारी पादुका पूजन व पालखी मिरवणूक झाली. बुधवारी अभिषेक, त्यानंतर सायंकाळी 6 वा. दत्तजन्म सोहळा पार पडला. त्यानंतर महाआरती झाली. रात्री 9.30 वा. मुलांसाठी संगीत खुर्ची स्पर्धा पार पडली.
सालाबादप्रमाणे महात्मा फुले रोडवरील श्री दत्त मंदिर येथे दत्त जयंती उत्सव व मंदिराचा वर्धापन दिन सोहळा साजरा करण्यात आला. दि. 4 रोजी मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त सकाळी 7.30 वा. महाअभिषेक व सायंकाळी 6 वा. आरती आणि श्री सत्यदत्त पूजन व महाआरती झाली.
दि. 5 रोजी सकाळी 7.30 वा. श्री स्वामी याग व दुपारी 12.30 वा. महाप्रसाद, बुधवार दि. 7 रोजी श्री दत्त जयंतीनिमित्त सकाळी 7.15 वा. महाअभिषेक, सायंकाळी 6.15 वा. श्री दत्तगुरुंचा पाळणा व महाआरती व रात्री 8 वा. भजन कार्यक्रम पार पडला.
शांतीनगर-टिळकवाडी दत्त मंदिर
शांतीनगर येथील श्री दत्त मंदिर येथे दत्त जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम झाले. सोमवार दि. 5 रोजी सकाळी 7.30 वा. नित्य पूजा, 11 वा. महापूजा व रुद्र स्वाहाकार, 12.30 वा. आरती, सायंकाळी 7.30 वा. आरती व रात्री 9 वा. शेजारती झाली.
दि. 6 रोजी सकाळी 7.30 वा. नित्यपूजा, महापूजा, श्री सुक्त हवन, दुपारी 12.30 वा. आरती, सायंकाळी 7.30 वा. आरती व मंत्रपुष्प, रात्री 9 वा. शेजारती, बुधवार दि. 7 रोजी सकाळी 7.30 वा. नित्यपूजा, 9 वा. दत्त याग, दुपारी 12.30 वा. महापूजा व आरती, सायंकाळी 6 वा. श्रींचा जन्मोत्सव, पाळणा, आरती, मंत्रपुष्प व जागर झाला.
कलमेश्वर गल्ली-अनगोळ
कलमेश्वर गल्ली, अनगोळ येथे दि. 3 रोजी ध्वजारोहण व गीतापठण झाले. या दिवशी तसेच दि. 4 ते 6 डिसेंबरदरम्यान दररोज भजन आणि प्रवचन झाले. दि. 7 रोजी काकडारती, पवमान अभिषेक, गुरुकृपा भजनी मंडळाचे भजन, सुरेश कानेबुवा यांचे कीर्तन व तीर्थप्रसाद झाला. सायंकाळी 6.30 वा. भक्ती संगीताचा कार्यक्रम झाला. शुक्रवार दि. 9 रोजी दुपारी 1 ते 3 या वेळेत महाप्रसाद होणार आहे.
टॅक्सी स्टॅन्ड दत्त जयंती उत्सव मंडळातर्फे दत्त जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम पार पडले. बहुसंख्य भाविकांनी तीर्थप्रसादाचा लाभ घेतला. वडगाव दत्त गल्ली येथील दत्त मंदिर तसेच आनंदनगर-वडगाव येथील दत्त मंदिरातही विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले.
कपिलेश्वर मंदिर
श्रीक्षेत्र दक्षिण काशी कपिलेश्वर मंदिरमध्ये श्री दत्त जयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. सकाळी विशेष रुद्राभिषेक व गुरु चरित्र वाचन झाले. गुरुमूर्तीची आकर्षक आरास करून सजविली. सायंकाळी 6 वा. महाआरती पार पडली. याप्रसंगी मंदिर समितीचे अध्यक्ष सुनील बाळेकुंद्री, राजू भातकांडे, अभिजित चव्हाण, विवेक पाटील, नागराज कट्टी यांच्यासह सेवेकरी व विश्वस्त उपस्थित होते.
अनगोळ दत्त मंदिरात जन्मोत्सव सोहळा
दत्त जयंतीनिमित्त श्री गुरुदत्त सेवा संघ श्री दत्त मंदिर बाबले गल्ली, अनगोळ यांच्यावतीने दत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. भक्तांच्या उपस्थितीत मूर्तीला अभिषेक घालण्यात आला. सायंकाळी दत्त महाराजांना पाळण्यात घालून जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी मंदिर व गाभाऱ्यात फुलांची आकर्षक सजावट केली होती. मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाईही केली आहे. या निमित्ताने विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले आहेत. याचा लाभ भक्तांनी घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
कामत गल्ली दत्त मंदिरात विशेष पूजा
कामत गल्ली येथील स्थळ देवालयमध्ये दत्त जयंतीनिमित विशेष पूजेचे आयोजन करण्यात आले होते. गल्लीतील महिला, बाल गोपाल व नागरिकांनी मिळून दत्त जयंती उत्साहात साजरी केली.