किरकोळ कारणावरून चाकूने वार, उंडाळे येथील घटना
वार्ताहर/ उंडाळे
घरगुती किरकोळ कारणावरून दाजीने मेव्हण्याचा खून पेल्याची घटना शुक्रवारी रात्री उंडाळे (ता. कराड) येथे घडली. धारदार चाकूने सपासप वार करत मेव्हण्याला संपवल्याने खळबळ उडाली. अनंत चतुर्दशीच्या बंदोबस्तात पोलीस व्यस्त असतानाच खुनाच्या घटनेने पोलिसांची धावपळ उडाली. सचिन वसंत मंडले (वय 35, मूळ रा. रेठरे खुर्द, सध्या रा. उंडाळे, ता. कराड) असे खून झालेल्या मेव्हण्याचे नाव आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, मयत सचिन मंडले रेठरे खुर्द येथील आहे. तो दूध व्यवसायासाठी उंडाळे येथील माळीवस्तीत रहात होता. घरगुती कारणावरून त्याच्या बहिणीचा पती अवधूत हणमंत मदने (वय 42, रा. रेठरे हरणाक्ष, जि. सांगली) याच्याशी वाद होत होता. अनंत चतुर्दशीला संशयित अवधूत मदने उंडाळे येथे सचिन मंडले याच्या घरी आला होता. रात्री दहा वाजण्याच्या सुमारास त्यांच्यात घरगुती बोलणे सुरू होते. त्यानंतर ते बोलत रस्त्यावर आले. बोलता बोलता त्यांच्यातील वाद वाढत गेल्यावर अवधूत मदने याने खिशातून चाकू काढत सचिन मंडले याच्यावर सपासप वार केले. अचानक झालेल्या हल्ल्याने सचिन बचावासाठी घरात पळाला. त्याला रक्तबंबाळ अवस्थेत कुटुंबीयांनी रुग्णालयात दाखल केले. मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. सचिनवर वार केल्यानंतर संशयित अवधूत घटनास्थळावरून पसार झाला.
हा प्रकार समजताच कराड तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक आनंदराव खोबरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपज्योती पाटील यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. यावेळी कराड तालुका पोलिसांनी संशयित आरोपी अवधूत मदने याचा शोध घेण्यास सुरुवात केली. मध्यरात्री करवडी येथून त्यास ताब्यात घेण्यात आले. अधिक तपास कराड तालुका पोलीस करत आहेत. गणपती विसर्जन सुरू असतानाच घडलेल्या या खुनामुळे उंडाळे परिसरात खळबळ उडाली.
अवघ्या चार तासात मुसक्या आवळल्या
सचिन मंडले याच्या खुनानंतर पोलिसांनी रेठरे हरणाक्ष, तुपारी येथे छापासत्र सुरू केले. गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सज्जन जगताप, उत्तम कोळी, धनंजय कोळी, महेशकुमार लावंड, हवालदार राजे, दीपक घाटगे, सचिन निकम, संजय काटे यांच्या टीमने संशयिताचा रात्रीत शोध सुरू करत त्याला अवघ्या चार तासांतच गजाआड केले.