वनडे मालिकेसाठी मात्र पुन्हा परतणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
ऑस्ट्रेलियाचा अनुभवी सलामीवीर डेव्हिड वॉर्नर भारताविरुद्ध सुरू असलेल्या मालिकेतील उर्वरित दोन सामन्यात खेळू शकणार नसल्याचे ऑस्ट्रेलियाने सांगितले. फॉर्मसाठी संघर्ष करणाऱया वॉर्नरला दुसऱया कसोटीवेळी हाताच्या कोपराला स्ट्रेस प्रॅक्चर झाले असल्याने तो उर्वरित दोन कसोटीत खेळू शकणार नसल्याचे स्पष्ट झाले.
वॉर्नर आता उपचार व रिहॅबसाठी मायदेशी सिडनील परतणार आहे. मात्र तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी तो भारतात पुन्हा येणार आहे. चार कसोटींची मालिका संपल्यानंतर वनडे मालिका खेळविली जाणार आहे. या मालिकेची सुरुवात 17 मार्च रोजी मुंबईतील सामन्याने होईल. ‘डेव्हिड वॉर्नरला उर्वरित दोन कसोटीसाठी अनफिट ठरविण्यात आले असून तो मायदेशी परतणार आहे,’ असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने सांगितले. ‘दिल्लीतील दुसऱया कसोटीवेळी हाताच्या कोपराला चेंडू लागून दुखापत झाली. त्याला स्ट्रेस प्रॅक्चर झाल्याचे नंतर तपासणीत दिसून आले. त्याच्या दुखापतीचा आढावा घेतल्यानंतर रिहॅबसाठी त्याला काही कालावधी लागणार असल्यामुळे तो दोन कसोटीत खेळू शकणार नाही. वनडे मालिकेसाठी तो भारतात परत येईल, अशी शक्यता आहे,’ असेही त्यांनी म्हटले आहे.
दिल्ली कसोटीतील ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजचा चेंडू हेल्मेटच्या ग्रिलला लागल्यानंतर वॉर्नरला उशिराने कॉन्कशनची लक्षणे दिसल्याने त्याच्या जागी मॅथ्यू रेनशॉला खेळविण्यात आले होते. त्याआधी त्याच्या हाताला उसळता चेंडू लागला होता. त्याची नंतर क्ष-किरण तपासणी केल्यानंतर हाताला स्ट्रेस प्रॅक्चर झाल्याचे स्पष्ट झाले. 3ग्न6 वर्षीय वॉर्नरला पहिल्या दोन्ही कसोटीत फॉर्मसाठी संघर्ष करावा लागला असून त्याला तीन डावांत केवळ 26 धावा जमविता आल्या.
दोन कसोटी गमावलेल्या ऑस्ट्रेलियासाठी हा आणखी एक धक्का असून वेगवान गोलंदाज जोश हॅझलवुडही टाचेच्या दुखापतीमुळे मालिकेबाहेर झाला आहे. मात्र कसोटी संघाचे सदस्य मिचेल स्टार्क व कॅमेरॉन ग्रीन आता पूर्ण फिट झाले असून ते उर्वरित कसोटीसाठी उपलब्ध झाले आहेत, ही त्यांच्यासाठी दिलासा देणारी बाब आहे. ग्रीन इंदोर कसोटीत खेळणार हे निश्चित झाले असून दुसऱया कसोटीतच तो खेळणार होता. त्यासाठी सरावावेळी त्याने वेगवान गोलंदाजीही खेळली होती. या संघातील लेगस्पिनर मिचेल स्वेप्सन संघात पुन्हा दाखल होणार असून पहिल्या कसोटीआधी तो मुलाच्या जन्मासाठी मायदेशी परतला होता.