Tarun Bharat

महिलांसाठी सुदृढ आरोग्याची पहाट

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षी नवरात्रौत्सवापासून राज्यात आरोग्य विभागाने राबवलेल्या ‘माता सुरक्षित तर कुटुंब सुरक्षित’ या अभियानातून महिलांची आरोग्य तपासणी झाली. मात्र या अभियानातून महिलांची आरोग्य माहिती समोर येत असताना महिलांच्या सुदृढ आरोग्याची पहाट नुकतीच होताना दिसून येते. कोणत्याही महिलेने स्वतःच्या आरोग्याप्रति सजग राहण्याचा धडा अभियानाने नक्कीच दिला असून तिच्या कुटुंबानेदेखील तिच्या आरोग्याप्रति सजग राहण्याची गरज असल्याचेही ध्यानात आणून दिले. तरच खऱया अर्थाने ‘माता सुरक्षित तर कुटुंब सुरक्षित’ होऊ शकते….

कोणी मुंबईतील कॉर्पोरेट कार्यालयातील स्पर्धेत धावणारी कॉर्पोरेट स्वागतिका… कोणी रिक्षा चालवून चरितार्थ चालविणारी रिक्षावाली… कोणी शेतात गेल्यावर मानसिक तणाव दूर करण्यासाठी तंबाखूची मशेरी लावणारी… तर कोणी बेरोजगार मुलाला नोकरी कधी मिळेल या चिंतेने ग्रासणारी शेतकरीण… तर कोणी दुसऱयांच्या आरोग्याची काळजी घेता घेता स्वतः कुपोषितांमध्ये मोडणारी अंगणवाडी सेविका… ती कोणीही असू शकते. माता सुरक्षित तर कुटुंब सुरक्षित या अभियानातून महिलांच्या आरोग्य तपासण्यातून एकसुरीच माहिती समोर येत आहे. महिलांनी आरोग्याची केलेली हेळसांड हे यातून दिसून येत आहे. महिलांच्या आरोग्य तपासणी अहवालातून महिला आरोग्य अद्याप थबकल्याचे दिसून येते. रांधा वाढा उष्टी काढा गृहिणीपासून ते कॉर्पोरेटक्षेत्रातील उच्च हुद्यावरील सुशिक्षित महिलांच्या आरोग्याचा प्रश्न दुर्लक्षित असल्याचे जाणवते. काही महिला बाळंतपणातील काळ सोडल्यास इतर वेळी आरोग्याच्या समस्यांकडे स्वतःहून दुर्लक्ष करताना दिसून येतात. तसेच काही घरांमध्ये महिला आरोग्य समस्यांना प्राधान्य दिले जात नसल्याचे दिसते. आरोग्य विभागाच्या माता सुरक्षित तर कुटुंब सुरक्षित या अभियानाने महिलांना आपल्या आरोग्याप्रती सजग राहण्याचा संदेश दिला आहे. या अभियानातून आरोग्य समस्यांचे निदान करण्यास पुढे येणाऱया महिलांची आकडेवारी समाधानकारक आहे. म्हणून या अभियानामुळे हे वर्ष महिलांना आरोग्यासाठी आशादायी ठरेल. मुंबईसारख्या शहरांपासून ते राज्यातील दुर्गम, अतिदुर्गम, आदिवासी, डोंगराळ भागातील महिलांची आरोग्य तपासणी होत आहे. यातून खेडी, अतिदुर्गम, आदिवासी पाडे, तांडे असे कोणतेच भाग सुटले नाहीत. गावातून प्राथमिक आरोग्य पेंद्रापर्यंत वाहनातून ने-आण करण्याची सुविधा असून आशाताई, अंगणवाडी सेविकांच्या साहाय्याने या मोहिमेचा प्रतिसाद वाढला आहे. शिवाय, शेवटच्या महिलेची तपासणी होईपर्यंत ही मोहिम सुरु राहणार असल्याने आश्वासक चित्र निर्माण झाले. अभियानाच्या सुरुवातीच्या टप्प्यात एक कोटी महिलांची आरोग्य तपासणी झाल्याने आशादायी चित्र निर्माण झाले. या अभियानातून महिलांची चोर दुखणी, जुने विकार आणि नुकत्याच जडलेल्या व्याधी सर्व काही समोर येत आहे. यात विविध आजाराशी संबंधित 14 पेक्षा जास्त मोफत चाचण्या त्यांचा तपासणी अहवाल पुढील उपचारांसाठी महिला रुग्ण, त्यांचे  नातेवाईक आणि आरोग्य यंत्रणा यांच्या समन्वयातून पुढील औषधोपचार आणि गरज भासल्यास आरोग्य योजनांमधून शस्त्रक्रियाही हे प्रमुख वैशिष्टय़.

दरम्यान मुंबईतील महिलांमध्ये मधुमेह, रक्तदाबा पासून मानसिक आजार दिसून आले. अभियानाच्या सुरुवातीच्या टप्प्यात सण उत्सव सुरु होते. असे असूनही 18 वर्ष व त्यावरील 2 लाख 26 हजार महिलांची तर 57 हजार 210 गर्भवती महिलांची तपासणी केली. तर असंसर्ग आजारांसाठी 1 लाख 90 हजार 29 महिलांची तपासणी केली गेली. 25 हजारांहून अधिक महिलांच्या रक्ताच्या तपासण्या केल्या गेल्या. यातील 2955 महिलांमध्ये हायपरटेंशन तर, 2272 महिलांमध्ये मधूमेहाचे निदान करण्यात आले. ही आकडेवारी तपासणीला आलेल्या महिलांच्या नोंदीतील आहे. मुंबईची ही स्थिती असताना राज्यातील म†िहला आरोग्य तपासणीतून 18 वर्षाहून अधिक वयाच्या सुमारे 2 टक्के महिला तीव्र कुपोषित गटात मोडत असल्याची मा†िहती मिळत आहे. राज्यातील तब्बल 4.01 कोटी महिलांच्या तपासणीतून 7.34 लाख महिलांमध्ये (म्हणजे 1.8 टक्के) लोहाची कमतरता असल्याचे निदान झाले. तर 4,01,86,717 महिलांच्या विविध आरोग्य पातळ्यांवर तपासण्यातून 7,34,679 महिलांमध्ये गंभीर अशक्तपणा असल्याचे निदान झाले. गर्भवती महिलांमध्ये लोहाची कमतरता आढळल्याने मुदतपूर्व प्रसूती, कमी वजनाची अर्भकं आणि बाळासाठी लोहाचे साठे कमी होणे, बाळाचा विकास खुंटणे अशा सारखे अनेक परिणाम होण्याची शक्यता यावेळी वर्तविण्यात आली. म्हणूनच महिलांनी संतुलित आहार घेण्याचा वैद्यकीय सल्ला देण्यात येत आहे. शिवाय म†िहलांमधील असलेल्या अशक्तपणासाठी कारणीभूत असलेल्या कारणात जंत संसर्ग, गंभीर मलेरिया, लघवी किंवा मलातील रक्तस्त्राव, मासिक पाळीत जास्त रक्तस्त्राव आणि अयोग्य आहार यासारखी अनेक कारणे मांडली आहेत. त्यात महिलांमधील कुपोषण मुद्दा ठसठसून दिसून येतो. त्यामुळे थकवा येणे, लक्ष पेंद्रित करण्यास अडथळा, पाय सुजणे, चक्कर येणे आणि चिडचिड होणे. तसेच लोह घटणे आणि कमी हिमोग्लोबिनचे प्रमाण असल्यास कोविड संसर्ग झाल्यास श्वास घेण्यास त्रास सारख्या आरोग्य तक्रारी महिला करत आहेत.

44 टक्के महिलांना मानसिकआरोग्याच्या समस्या

तपासण्यांमधून राज्यातील 30 वर्षे तसेच त्यावरील वयाच्या 44 टक्के महिला मानसिक आरोग्याच्या समस्यांनी ग्रस्त असल्याचे समोर येत आहे. 30 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या सुमारे 69,40,299 महिलांनी मानसिक आरोग्य समस्यांग्रस्त आढळून आल्या. त्यांच्यावर उपचार सुरु झाले असून या पातळीवर त्यांना समुपदेशनाची गरज असल्याचे मानसोपचार तज्ञ सांगत आहेत. ग्रामीण भागातील महिलांमध्ये ज्ञानाचा अभाव असल्याने त्या त्यांच्यातील नैराश्य किंवा चिंता ओळखण्यास कमी पडत असल्याची कबुली या अभियानातील एका  डॉक्टरने दिली. महिलांना असलेला त्रास जसे निद्रानाश, श्वास लागणे, तळवे आणि मानेमध्ये प्रचंड घाम येणे सारख्या सामान्य वाटणाऱया आरोग्य तक्रारी घेऊन बऱयाचदा त्या प्राथमिक आरोग्य दवाखान्यात जातात. मात्र या तक्रारींची समस्या मानसिक आजाराशी असू शकतो. शिवाय मानसोपचार तज्ञांचा तुटवडा असल्याने अशा विकारांचे निदान करण्यास विलंब होत असल्याचा इशारादेखील त्या अधिकाऱयाने दिला.

‘माता सुरक्षित तर कुटुंब सुरक्षित’ हे अभियान महिला आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे राहिले. आरोग्य विभाग त्यांच्या पातळीवर हे काम करत आहे. महिलांना आरोग्य तपासणीसाठी आवाहन केले जात आहे. तपासणीला आलेल्या महिलांची आकडेवारी तुर्तास मोठी दिसली तरी अद्यापही कित्येक महिला आरोग्याबाबत सजग नाहीत. तर कित्येकींना त्या केवळ महिला असल्याने आरोग्य तपासणीला घरातून अटकाव केला जात असावा. यामुळे महिला तपासणीवाचून वंचित राहू शकतात. त्यातून एखादी महिला एखाद्या व्याधीची बळी ठरू शकते. मात्र महिलांना आरोग्य तपासणीसाठी कुटुंबियांनी देखील पाठबळ देण्याचा संदेश या अभियानाने दिला. तिच्या नातेवाईकांनी तिच्या आरोग्याप्रति सजग राहणे गरजेचे आहे.

राम खांदारे

Related Stories

देवाचा वास माणसाच्या हृदयातच असतो

Patil_p

मुलांसाठी “ऑनलाईन’’ असणे…..किती घातक?

Patil_p

‘टाटा कॉफी’चे ‘टीसीपीएल’सोबत विलीनीकरण

Patil_p

‘मातोश्री’ची कोंडी

Patil_p

मुलांच्या भवितव्याशी खेळ

Patil_p

दंतकथा

Patil_p