Tarun Bharat

बीते हुए दिन…

मेरे बीते हुए दिन, कोई लौटा दे

मेरे बीते हुए दिन,  बीते हुए दिन वह

मेरे प्यारे पलछिन, कोई लौटा दे

मेरे बीते हुए दिन

लहान मुलांचं एक बरं असतं. त्यांच्यावर रागावलं किंवा त्यांना मारलं जरी, तरी ती दुसऱया दिवशी विसरून जातात. त्याच व्यक्तीला जाऊन बिलगतात. त्याच्या गळय़ात आपले इवले हात टाकून गोड बोलतात. माणूस जसा मोठा होत जातो तसतशी त्याला समज येत जाते आणि कोण कसं वागतं, आपल्याशी चांगलं कोण वागतं आणि वाईट कोण वागतं या सगळय़ाचं एक रेकॉर्ड त्याच्या मनात तयार होतं. मेंदूमध्ये राग, लोभ, द्वेष सगळय़ा सगळय़ा भावना ठासून भरल्या जातात. आयुष्य वयात येताना शहाणं करून सोडणारे अनेक प्रसंग घडतात. त्यातले कित्येक कटु अनुभव असतात. ते सहजासहजी विसरले जात नाहीत. यशासारखं दुसरं यशस्वी काहीच नाही असं म्हणतात. त्यामुळे यशस्वी होण्यासाठी माणूस धावायला लागतो. हे धावणं संपतच नाही. त्या नादात आपल्या आसपास काय घडतंय, काय घडून गेलंय, काळ किती पुढे गेलाय आपण काय गमावलंय हेही दुर्लक्षित होतं. पण कधीकधी या धावत्या गाडीला जोरदार ब्रेक लागतो. कुणीतरी आपल्याला अचानक सोडून जातं. एखाद्या अपयशाचा सामना करावा लागतो. एखादी अनपेक्षित गोष्ट घडते. त्यावेळी काही काळासाठी चाकोरीतून माणूस बाहेर फेकला जातो. किंवा त्याला बाहेर पडावं लागतं. अशावेळी जो अनियोजित मोकळा वेळ मिळतो तेव्हा अनेक आठवणी मनात गर्दी, गोंधळ मांडतात. आणि मग लक्षात येतं की अरे, आपण कशासाठी धावतोय? गळेकापू स्पर्धा, आणखी उंच आणखी उंच जाण्याच्या नादात गमावलेली जमीन आणि समाजातील असलेलं स्थान टिकवण्यासाठी केलेला आटापिटा, या सर्वांचा परिणाम म्हणून डोक्मयावर टांगलेल्या सततच्या चिंता यात आपलं निरागस बालपण केव्हाच हरवून गेलेलं असतं. आणि मग शांत बसलेला माणूस मनाशीच म्हणतो,

मेरे ख्वाबों के महल, मेरे सपनो के नगर

पी लिया जिनके लिए, मैंने जीवन का जहर

आज मैं धुंडु कहा, खो गए जाने किधर

 आज मैं धुंडु कहा, खो गए जाने किधर

माचिस चित्रपटातलं ‘चप्पा चप्पा चरखा चले’ हे गाणं असंच भूतकाळात घेऊन जाणारं. त्यातल्या छळणाऱया आठवणींचं गाणं!

झूठी मुठी मोई ने रसोई में पुकारा था

लोहे के चिमटे से लिपटे तो मारा था

झूठी मुठी मोई ने रसोई में पुकारा था

लोहे के चिमटे से लिपटे तो मारा था

ओह बिबा तेरा चुला जले

चप्पा चप्पा चरखा चले

या खरं तर जुन्या खेडय़ातल्या स्वयंपाकघरातल्या काही आंबटगोड नाजूक आठवणी आहेत. हातातली फुलं सांडून जाऊन त्या जागी हत्यार आलेल्या आणि ते चालवायला लागून हात निबर झालेल्या एकाच्या या आठवणी. हरिहरन आणि सुरेश वाडकर या दोघांचेही आवाज फारच बोलके. त्यातले चढउतार जीवघेणे. गाणं आधी चढत जातं आणि मग मनात उतरत जातं. अगदी दोन मित्रांच्या गाण्यातल्या गप्पाच या! पण बऱयाच गोष्टी आयुष्याच्या कठोर वास्तवात भाजल्या जाऊन त्यांचा कोळसा झाल्याचं दर्शवणारं असं एखादं गाणं आरसा दाखवतं ते असं!

 एखाद्या गोष्टीचा आयुष्यातील काळ हा ठरलेला असतो. एकदा का ती गोष्ट, संधी किंवा मनुष्य आपण गमावलं की पुन्हा कधीही ते आपल्या आयुष्यात येत नाही. याचं माझ्यामते सर्वोत्तम उदाहरण म्हणजे गोकुळ सोडून गेलेला कृष्ण. जन्मल्यापासून किशोरवयात येईपर्यंतच तो गोकुळात वास्तव्य करून होता. त्यानंतर त्यानं जे गोकुळ सोडलं ते कायमचंच. पुन्हा कधीही तो गोकुळात गेला नाही. पण गोकुळ भाग्यवान असं, की कृष्णाच्या आयुष्यातल्या सर्वात मनोहारी आठवणी गोकुळाकडे होत्या. ज्या कुणाकडे कधीच नव्हत्या. गवळणींना आयुष्यभर पुरणारी ती आनंदाची पुरचुंडी होती. असंख्य स्तोत्र, श्लोक, गाणी, चिजा त्यावर आधारित आहेत. त्याच्या बालपणीचे कपडे, दागिने, त्याला ज्या उखळाला बांधलं होतं ते‌ उखळ, देवाला दाखवण्याआधी त्याच्या मुखी लागणारं दही लोणी, तो रांगला ती अंगणातली माती हे सगळं काही यशोदामाईला जन्मोजन्मी पुरून उरेलसं होतं. पण एखाद्या दुपारी सगळी कामधामं आवरून माजघरात किंवा पाठल्यादारी शांतपणे पळभर टेकलेल्या यशोदेच्या तोंडी अभावितपणे हाक येत नसेल का? तिच्या आसपास तो घरभर फिरतोय असे भास कधीच नसतील होत? धसक्मयासरशी अर्धवट डुलकी सोडून ती उठून घरभर त्याला शोधतही असेल. तो मथुरेला गेला हे वास्तव पचवीत जेव्हा ती दुखऱया मनाने थकून भागून बसत असेल तेव्हाची तिची मनोवस्था जाणलीय?

घननीळा लडिवाळा, झुलवू नको हिंदोळा

सांजवेळ ही आपण दोघे, अवघे संशय घेण्याजोगे

चंद्र निघे बघ झाडामागे, कालिंदीच्या तटी   खेळतो गोपसुतांचा मेळा

अशा आठवणी असणारी गवळण तर काय काय भोगत असेल ते तिचं तिलाच ठाऊक! सासरच्या आयुष्यातले चटके भोगणाऱया तिला उपभोग म्हणजे काय, विशुद्ध निरपेक्ष प्रेम म्हणजे काय हे त्यानेच तर शिकवलं होतं! नुसत्या दर्शनाने इतकं आनंदविभोर व्हायला होतं, गोकुळात उतरत जाणारी काजळदाट संध्याकाळ साधून झालेल्या चोरटय़ा भेटी, केवळ तिच्यासाठी असणारी त्याची ती बासरी, शारदीय चांदण्यात खुललेल्या त्या रासरात्री, या सगळय़ा केवढय़ा धनवंत आठवणी! आणि आता? पाण्याने भरलेली घागर आणि रितेपणाने भरलेलं मन घेऊन कशी जगत असेल ती? उन्हाचे कवडसे, सांजसावल्या, पहाटेचा वारा आता चटके देत असेल तिला! आयुष्यात अशी एखादी जागा असते की ती कुणीच भरून काढू शकत नाही. एकदा तिथला चिरा निखळला की ती रिकामीच रहाते. सगळं काही असतं पण त्यात ही रिकामी जागा माणसाला त्याच्या समृद्धीतल्या भणंग आयुष्याची जाणीव आतून सारखी करून देत असते. एरवी आपण शिताफीने ती लपवत असतो पण आयुष्य एकाएकी थांबलं की ती रिकामी जागा आपल्याला छळायला लागते. आपलं आजवरचं सो कॉल्ड यशस्वी आयुष्य व्यर्थ आहे. आपल्या आवडीच्या गोष्टींचा, आपल्या एकेकाळच्या पॅशनचा बळी देऊन उभारलेलं आहे हे अशावेळी नाही पचवता येत आपल्याला.

हीच वेळ असते गाडून टाकलेल्या इच्छांना पुन्हा अंकुर फुटण्याची. डोळय़ातल्या पाण्याचे काही थेंबही पुरतात त्यासाठी! सांभाळावं त्या क्षणांना. नाहीतर घरातल्या भिंतीनाही पालवी फुटायची शक्मयता असते आणि मग घर रानभरी होण्याचीही! मग मन आक्रंदत रहातं.

कोई लौटा दे मेरे बीते हुए दिन..

-ऍड. अपर्णा परांजपे-प्रभू

Related Stories

खाशाबांचे वारस घडवा!

Patil_p

उन्हाच्या अंतरंगात…

Patil_p

गोंडस व्यक्तीने लावलेला गोड सापळा….हनी ट्रप

Patil_p

दोन नारी राजकारण्यांपेक्षा भारी!

Amit Kulkarni

‘नवे केंद्रीय ई चलन- नवी चलन पहाट’

Amit Kulkarni

मानसिक आरोग्यः दीर्घ पल्ल्यांचे नियोजन हवे

Amit Kulkarni