चमत्कारापेक्षा कमी नाही ही योजना
वृत्तसंस्था /न्यूयॉर्क
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) भारताच्या डायरेक्ट बेनेफिट ट्रान्सफर (डीबीटी) स्कीमचे कौतुक केले आहे. याचबरोबर याला एक ‘लॉजिस्टिकल मार्व्हल’ संबोधिले आहे. भारतासारख्या मोठय़ा देशात अशाप्रकारची योजना यशस्वीपणे लागू करणे मोठी गोष्ट असल्याचे आयएमएफने म्हटले आहे.
भारताकडून आम्हाला खूप काही शिकण्याची गरज आहे. जगातील प्रत्येक खंडात सर्व स्तराच्या उत्पन्नपातळीचे लोक आहेत. शासकीय योजनांचा लाभ लोकांपर्यंत पोहोचविण्याची कामगिरी पाहिल्यास भारताची स्थिती अत्यंत प्रभावी असल्याचे उद्गार आयएमएफमधील वित्तीय विभागाचे उपसंचालक पाओलो मॉरो यांनी पत्रकार परिषदेत काढले आहेत.
भारताचा मोठा आकार पाहता कमी उत्पन्न गटातील कोटय़वधी लोकांपर्यंत शासकीय योजनांचा थेट लाभ पोहोचविण्यात आल्याचे पाहून हा चमत्कारच म्हणावा लागणार आहे. भारतात अशाप्रकारच्या योजनांमध्ये लाभार्थ्यांमध्ये महिला, वृद्ध आणि शेतकऱयांना प्राथमिकता देण्यात आली आहे. तसेच लाभार्थ्यांची ओळख पटविण्यासाठी तंत्रज्ञानाचा मोठय़ा प्रमाणावर वापर करण्यात येतो. सरकारकडून निधीवाटपासाठी देखील तंत्रज्ञानाची मदत घेतली जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
आधारकार्डचा मोठा लाभ
युनिक आयडेंटिफिकेशन सिस्टीम यासारख्या तंत्रज्ञान नवोन्मेषामुळे सरकारला लोकांपर्यंत थेट मदत पोहोचविण्यास मदत झाली आहे. आधार कार्डचे थेट लाभ हस्तांतरण योजना यशस्वी करण्यात मोठे योगदान असल्याचे पाओलो मॉरो यांनी म्हटले आहे.