ऑनलाईन टीम/तरुण भारत
कोरोनावर मत करण्यासाठी लसीकरण हा एकमात्र पर्याय आहे. त्यामुळे कोरोना रुग्णवाढीच्या पार्श्वभूमीवर लसीकरणाचा वेगही वाढवा यासाठी कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या देशातील दोन कोरोना प्रतिबंधक लसींना DCGI नं खुल्या बाजारात विक्रीसाठी मंजुरी दिली आहे. या दोन्ही लसींच्या निर्मिती कंपन्या सीरम आणि भारत बायोटेकनं यासाठी परवानगी मागितली होती.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोन्ही लसी दुकानात उपलब्ध होणार नाहीत. केवळ खासगी रुग्णालये आणि दवाखान्यांमध्ये लस खरेदी करू शकतील आणि त्या तिथेच टोचल्या जातील. नवीन औषधे आणि क्लिनिकल चाचण्या नियम, २०१९ अंतर्गत ही मान्यता देण्यात आली आहे. अटींनुसार, कंपन्यांनी चालू असलेल्या क्लिनिकल चाचण्यांमधून डेटा सबमिट करणे आवश्यक आहे. लसीकरणानंतर प्रतिकूल परिणामांवर लक्ष ठेवण्यात येईल.
सीरम इन्स्टिट्यूटचे संचालक (सरकारी आणि नियामक व्यवहार) प्रकाश कुमार सिंग यांनी 25 ऑक्टोबर रोजी DCGI कडे कोविशिल्डला खुल्या बाजारात विक्रीच्या मंजुरीसाठी अर्ज केला होता. तसेच भारत बायोटेकचे संचालक व्ही. कृष्णमोहन यांनी देखील कोवॅक्सिनला खुल्या बाजारात विक्रीसाठी मंजुरी मिळावी याासाठी प्री-क्लिनिकल आणि क्लिनिकल डेटासह माहिती सादर केली होती.