अंत्यसंस्काराची अजब पद्धत, आत्मा घरात परत येऊ नये म्हणून…
आफ्रिका खंडातील संस्कृती उर्वरित जगाच्या तुलनेत खूपच वेगळी आहे. आफ्रिकेत मृत्यू आणि अंत्यसंस्काराच्या पद्धती या खंडातील सांस्कृतिक मान्यता, परंपरा आणि धर्मांशी निगडित आहेत. काळानुसार जगात अनेक गोष्टी बदलल्या आहेत, परंतु येथे अद्याप जुन्या प्रथा-परंपरांना महत्त्व दिले जाते.
मॅकमिलन इन्सायक्लोपीडिया ऑफ डेथ अँड डाइंगनुसार आफ्रिकेत मृताच्या आत्म्याला शांती मिळावी आणि त्याला पूर्वजांदरम्यान स्वतःचे स्थान मिळावे म्हणून विधी केले जातात. योग्य पद्धतीने दफन केल्यास मृत व्यक्तीचा आत्मा कुटुंबाचे रक्षण करतो असे तेथील लोकांचे मानणे आहे.
अंत्यसंस्कार करण्यापूर्वी येथील घराच्या भिंतींवरील तसवीरींना झाकण्यात आले. याचबरोबर घरातील आरशांना कपडय़ांनी झाकले जाते. खिडक्या बंद केल्या जातात, जेणेकरून मृत व्यक्तीचा आत्मा स्वतःला पाहू शकणार नाही. मृत व्यक्तीच्या खोलीतील बिछाना हटविण्यात येतो.
इनसायक्लोपीडिया ऑफ डेथ अँड डाइंगनुसार मृतदेह दफनभूमीत नेण्यासाठीचे विधी गोंधळात टाकणाऱया असतात. मृत व्यक्तीचा आत्मा घरात परत येऊ नये म्हणून हे विधी आयोजिले जातात. मृतदेह दरवाजाऐवजी भिंतीत छिद्र पाडून घराबाहेर काढला जातो. त्यानंतर हे छिद्र बुझविण्यात येते. सर्वप्रथम मृतदेहाचा पाय घराबाहेर काढला जातो. दफनभूमीत जाण्यासाठीचा मार्ग आडवळणाचा निवडण्यात येतो, जेणेकरून मृताच्या आत्म्याने घरात परतण्याचा प्रयत्न करू नये. वाटेत काटे, फांदय़ा किंवा अन्य अडथळे टाकले जातात.